प्रभाग अधिकाऱ्याची उद्यान विभागात लुडबुड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:28 AM2021-06-16T04:28:33+5:302021-06-16T04:28:33+5:30
--------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीमुळे वादग्रस्त ठरलेले आस्थापना प्रमुख मेहर लहारे यांची महापालिकेने उद्यान ...
---------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीमुळे वादग्रस्त ठरलेले आस्थापना प्रमुख मेहर लहारे यांची महापालिकेने उद्यान विभागात वर्णी लावली आहे. शैक्षणिक पात्रता नसतानादेखील त्यांची प्रभारी उद्यान अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शेतीची कोणतीही माहिती नसताना निविदांच्या अटी व शर्तीही मेहर हेच ठरवीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे तेच ते अधिकारी एका पदावर काम करत आहे. अन्य महापालिकेतून अधिकारी बदलून येत नाहीत, असे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र मेहर लहारे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतून बदलीने अहमदनगर महापालिकेत रुजू झाले आहे. एकट्या लहारे यांची बदली कशी होते, हा आश्चर्यकारक आहे. लहारे प्रभाग अधिकारी म्हणून रुजू झाले होते. परंतु, सक्षम अधिकारी नसल्याने त्यांच्याकडे अस्थापना प्रमुख पदाची जबाबदारी साेपविण्यात आली होती. आस्थापना प्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांच्याविरोधात एका महिला कर्मचाऱ्याने तक्रार केली होती. या प्रकरणाची महिला अत्याचार समितीने चौकशी करून लहारे यांची आस्थापना विभागातून अन्य विभागात बदली करावी, असा प्रस्ताव दिला. समितीच्या अध्यक्ष डॉ. नलिनी थोरात यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार लहारे यांची बदली करण्यात आली. उद्यान विभागात सक्षम अधिकारी नाही, असे कारण पुढे करत लहारे यांची उद्यान अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. या विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लहारे यांनी अनेक निविदा काढल्या. बुरुडगाव येथील वृक्षारोपणही त्यांच्याच कार्यकाळात झाले. सावेडी कचरा डेपोतील वृक्षलागवडीची निविदाही लहारे यांनीच काढली असून, या दोन्ही ठिकाणी लावलेले झाडे नियमबाह्य आहेत.
उद्यान अधीक्षक म्हणून यू. जी. म्हसे हे काम पाहत होते. त्यांच्याकडे कृषीची पदवी होती. त्यामुळे त्यांची नियुक्ती उद्यान विभागात करण्यात आलेली होती. म्हसे हे सेवानिवृत्त झाले आहेत. उद्यान विभागात वृक्ष अधिकारी हेही एक पद मंजूर आहे. परंतु, हे पद रिक्त असल्याने या विभागाचे कामही लहारे हेच पाहत असून, संपूर्ण उद्यान विभागाचा कारभार सध्या लहारे यांच्याकडे आहे. उद्याने विकसित करणे, वृक्षारोपण करणे हरित पट्टे तयार करणे, यासारखी कामे उद्यान विभागामार्फत केली जातात. शेतीशी संबंधित हा विभाग आहे. त्यामुळे या पदासाठी कृषी क्षेत्राची माहिती असणे गरजेचे आहे. परंतु, महापालिकेने या विभागातही प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
.................
उद्यानांची दुरवस्था
शहरातील सर्वच उद्यानांची दुरवस्था झाली आहे. सक्षम अधिकारी नसल्याने वृक्षरोपणाचीही बोंबाबोंब आहे. या विभागातही प्रभारी राज सुरू आहे. त्याचा परिणाम या विभागाच्या कामकाजावर होत असून, उद्याने ओसाड झाली आहे. महापालिकेने यावर ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. परंतु, मनपाने उद्यानेच भाडेतत्त्वावर देण्याचा घाट घातला आहे.
...