प्रभागवार रॅपिड अँटिजन कोरोना चाचणी मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:20 AM2021-05-19T04:20:19+5:302021-05-19T04:20:19+5:30
मंगळवारी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने महात्मा फुले चौकात मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजन चाचणी सुरू केली असून, अर्ध्या तासात ...
मंगळवारी पोलीस व नगरपंचायत प्रशासनाने महात्मा फुले चौकात मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजन चाचणी सुरू केली असून, अर्ध्या तासात १६ नागरिकांची चाचणी केली. त्यात दोघे बाधित आढळून आले आहेत.
शहर व तालुक्यात कोविड रुग्ण दिवसागणिक वाढत असले तरी या आठवड्यात बाधितांचा आकडा थोडा कमी रोडावला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरात सुरू असलेली कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी व प्रशासकीय अधिकारी यांनी हाती घेतलेली धाकाची काठी याचा परिणाम म्हणून कोविडबाधितांचा दर घटला आहे. शहरात कडक लाॅकडाऊनला नागरिकांचे असेच १२ ते १५ दिवस सहकार्य मिळाले तर कोरोना शहरातून हद्दपार होण्यास मदत होईल, असा विश्वास तहसीलदार मुकेश कांबळे व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी व्यक्त केला.
शहरात कमानवेस येथे ६५ अँटिजन टेस्टपैकी ६, मराठी शाळेत २३३ पैकी ४३ व आयटीआयजवळ ६९ चाचण्यांपैकी ११ जण बाधित आढळून आले आहेत. लागलीच त्यांची कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
सोमवारी तालुक्यात अँटिजन टेस्टमध्ये ८० कोरोनाबाधित आढळून आले. शासकीय प्रयोगशाळांचा अहवाल प्राप्त झाला नाही. ३८३ कोरोना चाचणी अहवाल नगर येथे प्रलंबित आहेत. सोमवारी तालुक्यात ६१७ अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या, पैकी ६७ बाधित आढळले. सध्या तालुक्यात तेराशेच्या पुढे सक्रिय कोविड रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा दहा हजार शंभरच्या पुढे गेला असून, पावणेनऊ हजार बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान, तालुक्यात निंब्रळ येथे एक व रुंभोडी-इंदोरी परिसरात एक असे दोन म्युकरमाकोसिसचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर नगर व धामनखेल (जि. नाशिक) येथे उपचार सुरू आहेत. या वृत्तास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांनी दुजोरा दिला आहे.
तसेच पोलीस व नगरपंचायतीने शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी मोहीम सुरू केल्याने शहरात चांगलाच शुकशुकाट आहे.