रुईछत्तीसीच्या कोरोनामुक्तीसाठी वॉर्डनिहाय बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:15 AM2021-05-03T04:15:59+5:302021-05-03T04:15:59+5:30
रुईछत्तीसी : नगर तालुक्यातील रुईछत्तीशी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावकरी एकवटले आहेत. ग्रामस्थ व नोकरदारांनी कोरोनामुक्तीसाठी वाॅर्डनिहाय बक्षीस योजना जाहीर ...
रुईछत्तीसी : नगर तालुक्यातील रुईछत्तीशी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावकरी एकवटले आहेत. ग्रामस्थ व नोकरदारांनी कोरोनामुक्तीसाठी वाॅर्डनिहाय बक्षीस योजना जाहीर केली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या वॉर्डला बक्षीस दिले जाणार आहे.
गावात मागील लॉकडाऊन काळात सहा आणि आताच्या लॉकडाऊन काळात दहा व्यक्तींचे कोरोनाने निधन झाले. गावचे दळणवळण मोठे असल्याने कोरोनाबाबत परिस्थिती हाताबाहेर चालली होती. जवळपास २५० लोक कोरोनाबाधित होते. काही रुग्ण कोविड सेंटर, काही खासगी दवाखाने तर काही घरीच विलगीकरणात राहत होते. आजही जवळपास ५० ते ७० रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. गावात वेळोवेळी अँटिजेन रॅपिड चाचणीचे आयोजन करून बाधित रुग्ण शोधण्यात आले. त्यांच्यावर लगेच उपचार करून परिस्थिती आटोक्यात आणण्यास मदत झाली. ४५ वर्षांवरील व्यक्तींचे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण करण्यात आले.
पंचायत समितीचे सदस्य रवींद्र भापकर यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन चांगले सहकार्य केले. गावची परिस्थिती आटोक्यात येऊन कोरोनामुक्तीकडे गावची वाटचाल सुरू आहे. परंतु, एकाएकी ही परिस्थिती नियंत्रणाखाली येणार नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोनाची कडक नियमावलीचे पालन करून घरीच सुरक्षित रहावे, असे आश्वासन सरपंच विलास लोखंडे यांनी केले आहे.
--
..अशी मिळणार बक्षिसे
गावातील जो वाॅर्ड प्रथम कोरोनामुक्त होईल त्यांना अकरा हजार बक्षीस बाबासाहेब पाडळकर यांनी जाहीर केले आहे. दुसरे बक्षीस सात हजार ५०१ झुंबर श्रीपती भांबरे हे देणार असून, पाच हजार ५०१ रुपयांचे तिसरे बक्षीस ग्रामसेवक अशोक जगदाळे हे देणार आहेत. उत्तेजनार्थ बक्षीस आणि ट्रॉफी जालिंदर खाकाळ, संतोष भवर, दत्तात्रय काळे यांच्याकडून देण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी योगदान देणाऱ्यांना ‘कोविडयोद्धा’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.