वार्डबॉयनेच केला रेमडेसिविरचा काळाबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:20 AM2021-04-27T04:20:49+5:302021-04-27T04:20:49+5:30
श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील रेमडेसिविरच्या काळाबाजार प्रकरणात रुग्णालयातील वार्डबॉय व मेडिकल दुकानातील नोकरांनीच गुन्हा केल्याचे शहर पोलिसांचे म्हणणे आहे. ...
श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील रेमडेसिविरच्या काळाबाजार प्रकरणात रुग्णालयातील वार्डबॉय व मेडिकल दुकानातील नोकरांनीच गुन्हा केल्याचे शहर पोलिसांचे म्हणणे आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
शहरातील एका गरजू रुग्णाच्या कुटुंबियांना चार हजार ८०० रुपयांच्या दोन रेमडेसिविरची २० हजार रुपये दराने ते विक्री करत होते. त्याचवेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. संजय रुपटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी याप्रकरणी शुभम श्रीराम जाधव (रा. आंबेजोगाई, जि. बीड), प्रवीण प्रदीप खुने (रा. बार्शी, सोलापूर), दिनेश उर्फ रेवन्नाथ संजय बनसोडे यांना अटक केली होती. यातील जाधव व खुने हे एका रुग्णालयात वार्डबॉय होते तर बनसोडे हा मेडिकल दुकानात कामगार होता. जाधव व खुने हे तालुक्यातील एका महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपींकडून केलेल्या चौकशीनंतर नाशिक येथून राजू कलामी याला अटक केली. तो देखील वार्डबॉय असल्याचे तपासी अधिकारी संभाजी पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
---------
तरुणांनीच गुन्हा केला
सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी संभाजी पाटील यांनी गुन्ह्यात कोणीही अन्य सूत्रधार व्यक्तीचा समावेश नाही. याच तरुणांनी रुग्णांकरिता आलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनची परस्पर काळ्या बाजारात विक्री केल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
----------
रेमडेसिविर कोणी मागवले?
वार्डबॉय व मेडिकल दुकानातील कामगाराने रेमडेसिविरचा काळ्या बाजारात विक्रीचा प्रयत्न केला असला, तरी मुळात हे इंजेक्शन कोणी मागवले होते? हे मात्र समजू शकलेले नाही. इंजेक्शन थेट रुग्णांना मिळत नाहीत. डॉक्टर अथवा मेडिकल एजन्सीला ते औषध कंपन्या व जिल्हा प्रशासनाकडून दिले जाते. त्यामुळे श्रीरामपुरातील गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेले इंजेक्शन कोणी मागवले होते? याबाबत पोलिसांनी खुलासा केलेला नाही. त्यावरील बॅच नंबरवरूनही हे सहज समजू शकते.
-------------