बदनामी करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा
By अरुण वाघमोडे | Published: June 23, 2023 04:23 PM2023-06-23T16:23:32+5:302023-06-23T16:29:59+5:30
या सर्व घटनांना स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.
अहमदनगर: कुठल्याही कागदपत्रांचा अभ्यास न करता जागा बळकावल्याचे खोटे आरोप करून बदनामी करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा ॲड. गणेश गोंडाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिला. जे जागा मालक असल्याचे सांगत आहेत त्यांनीच जागेच्या कागदपत्रात खाडाखोड करून बनावट दस्ताऐवज केलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध न्यायालयात कायदेशीर लढाई सुरु असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून नगर शहरात घरावर तसेच जमिनीवर ताबा मारण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या सर्व घटनांना स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता. तर या पत्रकार परिषदेत एका महिलेने ही प्रोफेसर कॉलनी परिसरातील आमच्या मालकीच्या जागेवर गुंडांच्या मदतीने काहींनी ताबा घेतला असल्याचा आरोप केला होता. त्या जागेच्या संदर्भात झालेल्या आरोपांबाबत ॲड. गणेश गोंडाळ यांनी पत्रकार परिषद घेत त्या जागेचे मालक असल्याचा दावा करणारे लोंढे नामक व्यक्तीच बनावट कागदपत्रे तयार करून जागा बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गोंडाळ यांनी केला आहे.
या बनावट कागदपत्रांबाबत आपण न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केल्यावर न्यायालयाने तोफखाना पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा चौकशी अहवालही न्यायालयात सादर केलेला आहे. त्यानुसार या व्यक्तींनी खोटया व बनावट कागदपत्रांच्या आधारे केलेल्या गंभीर गुन्ह्याबाबत न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ४१७,४२०,४६५,४६८,३४ नुसार कायदेशीर प्रक्रिया सुरु करून त्यांना न्यायालयासमोर हजर होण्याबाबत समन्स काढलेले आहेत. अशी सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरु असताना त्या व्यक्तींनी एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना चुकीची माहिती देत त्यांची दिशाभूल केली. त्या राजकीय पुढाऱ्यांनी ही कोणतीही शहानिशा न करता या प्रकरणाला राजकीय वळण देत आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आपली बदनामी केली आहे. या संदर्भात आपण कायदेशीर कारवाई सुरु केली असून त्याचा पाठपुरावाही करत असल्याचे ॲड. गोंडाळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्सही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत.