माळेगावची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:37 PM2019-01-30T12:37:45+5:302019-01-30T12:38:37+5:30
नाथसागर जलाशयातून तालुक्यातील माळेगाव, दुलेचांदगावसह आणखी काही गावाला पेयजल पुरवठा करणारी वाहिनी मंगळवारी सकाळी माळेगाव शिवारात फुटली.
पाथर्डी : नाथसागर जलाशयातून तालुक्यातील माळेगाव, दुलेचांदगावसह आणखी काही गावाला पेयजल पुरवठा करणारी वाहिनी मंगळवारी सकाळी माळेगाव शिवारात फुटली. त्यामुळे गेल्या दोन दिवसा पासून दुरुस्ती अभावी हजारो लीटर पाणी वाया गेले.
तालुक्यातील दुलेचांदगांव, माळेगांव खेर्डे या गावांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी मंगळवारी सकाळी फुटली. दोन दिवसात याठिकाणी माहिती देवूनही दुरुस्तीसाठी फिरकले नाहीत. यामुळे रस्त्यावर पाणी साचले असून त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थिती मध्ये पाण्याअभावी गावोगावी पाण्याची टंचाई भासत असताना पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.
दुलेचांदगाव, माळेगाव, खेर्डे गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे ठिकठिकाणी फुटत असल्याने गावातील उंचावर असलेल्या पाण्याच्या टाक्यात पुरेसे पाणी पोहचत नसून अपु-या पाणीपुरवठ्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. जलवाहिनी जुनाट झाल्याने व काही ठिकाणी उपद्रवी लोकांनी वाहिनीला छिद्र पाडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे.