‘भोसे’ तून ‘सीना’त पाणी
By Admin | Published: August 9, 2016 11:56 PM2016-08-09T23:56:44+5:302016-08-10T00:24:31+5:30
मिरजगाव : कुकडी प्रकल्पाच्या ओव्हरफ्लोचे पाणी भोसे खिंडीतून सीना धरणात सोडण्याचे आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधीकरणाने दिले आहेत.
यामुळे याबाबतच्या न्यायालयीन लढाईला मोठे यश आले आहे. या आदेशामुळे दरवर्षी हक्काचे ओव्हरफ्लोचे पाणी सीना धरणात येणार आहे.
भोसेखिंड बहुचर्चित प्रकल्प मंजूर झाल्यानंतर कुकडीचे १.२ अश्व घनफूट पाणी सीना धरणात सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने घेऊन २० नोव्हेंबर २००० मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. पण त्यानंतरही हे हक्काचे पाणी मिळत नसल्याने अॅड. शिवाजी अनभुले यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यात अॅड. कैलास शेवाळे, जलतज्ज्ञ मिलिंद बागल सहयाचिकाकर्ते म्हणून नंतर सहभागी झाले.
सोमवारी सुनावणी होऊन ४०० क्युसेकने सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार आजपासून भोसे खिंडीत पाणी सोडण्याचे आदेश प्राधीकरणाचे प्राथमिक विवाद निवारण अधिकारी खलील अन्सारी यांनी दिले. त्यानुसार मंगळवारी सकाळी ७ वाजता भोसे खिंड बोगद्यातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडले. या निर्णयाने १६ वर्षांनी या भागातील लोकांना हक्काचे १.२ अ. घ. फू. ओव्हरफ्लोचे हक्काचे मिळाले. आता दरवर्षी हे पाणी मिळणार आहे. या याचिकेच्या माध्यमातून अॅड. अनभुले यांनी या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. ओव्हरफ्लोचे पाणी १५ दिवस सोडण्याचे आदेश असल्याने धरणात १४०० दशलक्ष घनफूट पाणी येणे अपेक्षित आहे. यामुळे या भागातील खरीप पिकांना एक आवर्तन मिळू शकेल.
सीना धरणात भोसे खिंडीतून कुकडीचे नियमित आवर्तन मिळण्यासाठी १० नोव्हेंबर २०१५ ला दाखल याचिकेची सुनावणी होणे बाकी आहे. (वार्ताहर)