लोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : महाराष्ट्र राज्याचे जलसंधारणमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा आज निसटता पराभव झाला. कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत व भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर यांची खेळीने पालकमंत्री राम शिंदे यांना निसटता पराभव स्विकारावा लागला. निमित्त होते कर्जतमधील गोदड महाराज क्रीडानगरीत छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचे. पालकमंत्री राम शिंदे विरुद्ध नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संघात शनिवारी सायंकाळी प्रदर्शनीय सामना रंगला. यामध्ये पालकमंत्री शिंदे यांच्या संघाला पाच गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. सायंकाळी रंगलेल्या सामन्यात नगराध्यक्ष राऊत यांच्या संघाने नाणेफेक जिंकली. पहिल्या हाफपासून नगराध्यक्ष राऊत यांचा संघ आघाडीवर होता. दुस-या हाफमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांच्या संघाने आक्रमक खेळ केला. परंतु त्यांना पराभव टाळता आला नाही. आप्पासाहेब घनवट यांनी पालकमंत्र्यांना बाद केले. नगराध्यक्ष राऊत संघाने २१, तर पालकमंत्री संघाने १६ गुण मिळविले. पालकमंत्री शिंदे यांच्या संघात शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाषचंद्र तनपुरे, बापूराव तोरडमल, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष महेंद्र गुंड, क्रीडाशिक्षक सुनील नेवसे, रेल्वे अधिकारी प्रशांत पाटील, गणेश जेवरे, शिवाजी धांडे, प्रकाश धांडे, राजेंद्र खराडे यांचा समावेश होता. नगराध्यक्ष संघात रावसाहेब गरड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, चापडगावचे सरपंच आप्पासाहेब घनवट, सचिन धोदाड, राम ढेरे, अनिल गदादे, व्यापारी अभय बोरा यांचा समावेश होता.
|