देर्डे-चांदवडच्या विद्यार्थ्यांनी बनवली पाण्यावर चालणारी सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 03:12 PM2020-02-05T15:12:23+5:302020-02-05T15:13:34+5:30
जुनी सायकल घेऊन त्याला प्लास्टिकचे ड्रम बसवून चक्क पाण्यावर चालणारी सायकल कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड गावातील चंद्रशेखर शिलेदार व अंकुश पवार या दहावीच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे.
पारनेर : जुनी सायकल घेऊन त्याला प्लास्टिकचे ड्रम बसवून चक्क पाण्यावर चालणारी सायकल कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड गावातील चंद्रशेखर शिलेदार व अंकुश पवार या दहावीच्या विद्यार्थ्यांनी बनवली आहे. पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री संकुलात सुरू असलेल्या नगर जिल्हा गणित-विज्ञान प्रदर्शनात प्रमुख आकर्षण ठरत आहे.
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री संकुलात अहमदनगर जिल्हा गणित विज्ञान प्रदर्शन सुरू आहे. यावेळी लोकमत प्रतिनिधीने मंगळवारी प्रदर्शन पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनव प्रयोग दिसून आले. यामध्ये राळेगणसिद्धीचा सिद्धेश पळसकर-शेतक-यांचा उपयोगी रोबोट,शिर्डीचा हर्षवर्धन गोदकर याचा भविष्यातील वाहतूक व्यवस्था, शेवगावच्या सिद्धार्थ शेळके याने अंडीतून पक्षी तयार करणारे यंत्र, श्रेयस कोथिंबीरे (श्रीगोंदा) याने हालचाल आयसीयू, पिंपळगाव माळवीच्या गणेश पोटे याने रोबोट, खेडच्या भूषण शिंदे याने एकत्रित शेती, सोनईच्या कौशिक वेल्हेकर याने जलशुद्धीकरण, राहुरीच्या रोहित लहारे याने सौरऊर्जा फवारणी यंत्र, जामखेडच्या प्रभा गांधी याने काचेच्या ऊर्जेतून भात शिजवणे, श्रीरामपूरच्या सोहम बडाख याने सोलर वॉटर अशी उपकरणे प्रदर्शनात मांडली आहेत.
मातोश्रीचे प्रमुख किरण आहेर, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, बापूसाहेब तांबे, शिक्षण विस्तार अधिकारी विनेश लाळगे, संभाजी झावरे, जिल्हा गणित-विज्ञान संघटना मार्गदर्शक मधुकर बर्वे, जालिंदर आहेर आदींनी भेट देऊन पाहणी केली.
...अशी बनवली सायकल
देर्डे-चांदवड येथील चंद्रशेखर शिलेदार व अंकुश पवार यांनी शिक्षक रमेश हिंगे यांच्या मार्गदर्शनानुसार पाण्यावर चालणारी सायकल तयार केली आहे. आधी पाण्यात टायरच्या ट्यूबने शेततळे किंवा कालव्यात हे पोहत होते. परंतु ट्यूब फुटण्याचा धोका आहे. विद्यार्थ्यांनी सायकल बनविण्याचा निर्णय घेतला. सायकलचे चाके काढून ३५ लिटरचे चार मोकळे ड्रम घेऊन मागे दोन व पुढे दोन ड्रम लावून तीच चाके तयार केली. ती पाण्यावर जोरदार चालत आहे.