गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचे काम प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:57 AM2021-02-20T04:57:50+5:302021-02-20T04:57:50+5:30
भेंडा : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्रात जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यांतून पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी ३० प्रवाही वळण योजना ...
भेंडा : सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्रात जाणारे पाणी पश्चिम वाहिनी नद्यांतून पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी ३० प्रवाही वळण योजना व दोन नद्या जोड प्रकल्पातून १९.१८ द.ल.घ.मी (टीएमसी) पाणी देण्याची महत्त्वपूर्ण योजना प्रगतिपथावर असल्याचे पत्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सहाय्यक अधीक्षक अभियंत्यांनी नेवासा तालुका भारतीय जनसंसदेला पाठविले आहे.
नेवासा तालुका भारतीय जनसंसदचे अध्यक्ष रामराव भदगले, ॲड. विठ्ठलराव जंगले, डाॅ. अशोक ढगे, कारभारी गरड यांनी या महत्त्वाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री, राज्य शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार, आंदोलन करून पाठपुरावा केला होता. त्यामुळे योजनेची सद्य:स्थिती सविस्तर कळविली आहे. ३० प्रवाही वळण योजनेपैकी १२ योजना पूर्ण झाल्या आहेत. ७ प्रवाही योजना प्रगतिपथावर आहेत. भविष्यकालीन ११ प्रवाही योजनांपैकी काहींचे सर्वेक्षण झाले असून अंदाजपत्रक डिसेंबर २०२० अखेर सादर केले आहे. त्यातील निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर आहेत. काही योजनांचे सर्वेक्षण निविदा प्रगतिपथावर आहेत.
पूर्ण झालेल्या १२ प्रवाही योजना- रानपाडा, चाफ्याचा पाडा, हट्टीपाडा, पळसविहीर, चिल्लरपाडा, गोळशी, झालापाडा, आंबेगण संकुल, पिंपरज, अंबोली बोंबिलटेक, वाघेरा, वळुंजे. प्रगतिपथावरील ७ प्रवाही वळण योजना- मांजरपाडा, धोंडाळपाडा, ननाशी, पायरपाडा, गोळशी महाजे, पँगलवाडी, वैतरणा सॅडल. भविष्यकालीन ११ प्रवाही वळण योजना- अंबाड, चिमणपाडा, कळमुस्ते, अंबोली वेळुजे, कापवाडी, हिवरा, साभद, तोलारखिंड, खिरेश्वर, सादडापाट, पाथरपाट.
राज्यांतर्गत नदीजोड योजनेच्या दोन प्रवाही वळण योजना : दमणगंगा- एकदरे - गोदावरी आणि दमणगंगा. वैतरणा- कडवा - गोदावरी. या दोन योजनेचे १२.१८ टीएमसी पाणी दमणगंगा, वैतरणा खोऱ्यातून वाघाड धरण व उर्ध्व वैतरणा धरणात येणार आहे. यांचे सर्वेक्षण व अन्वेषण अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता असून हे काम राष्ट्रीय जलविकास अभिकरणामार्फत प्रगतिपथावर आहे.
-----
मुळा, भंडारदऱ्यात वळविणार पाणी..
दमणगंगा, पार, वैतरणा व उल्हास या ४ पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. भंडारदरा, मुळा धरणात हे पाणी येणार आहे. यामुळे नगर जिल्ह्यासह औरंगाबाद, बीड, नांदेड आदी जिल्ह्यातील शेतीसिंचन, पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.