कुकडीतील पाणीसाठा खालावला : आवर्तन पाच दिवसात होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 04:46 PM2018-06-29T16:46:55+5:302018-06-29T16:47:14+5:30
कुकडी लाभक्षेत्रात ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, मात्र कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे.
श्रीगोंदा : कुकडी लाभक्षेत्रात ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, मात्र कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात धरणातील पाणी पातळीत घट होऊ लागली आहे. मान्सूनने गुजरात, राजस्थानकडे आगेकूच केली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पाऊस केव्हा सुरू होणार ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे भात लागवडीसाठी पाणलोट क्षेत्रातील शेतकरी पावसाला साकडे घालू लागले आहेत.
येडगाव धरणात १ हजार १५६ एमसीएफटी (४१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पिंपळगाव जोगे धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले असून येडगाव धरणातून सोडण्यात येत असलेले आवर्तन चार ते पाच दिवसात बंद करण्यात येईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माणिकडोह धरणात ७३३ एमसीएफटी (५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणात ९७ मिलिमीटर (८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
डिंबे धरणात ५८९ एमसीएफटी (५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. पिंपळगाव जोगे धरणात शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पात २ हजार ५७५ एमसीएफटी (८ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी १ हजार ६०५ एमसी एफटी (५ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता. घोड धरण रिकामे झाले असून विसापूर तलावात ४२ एमसीएफटी (५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. सीना धरणात १४९ एमसीएफटी (८ टक्के) तर खैरी तलावात ५७ एमसीएफटी (१२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.