मांडवगणमधील पाणीपातळी ३०० वरून ३० फुटावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:21 AM2018-04-10T11:21:13+5:302018-04-10T11:26:14+5:30
मांडवगण. श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे १० हजार लोकवस्तीचं गाव. येथील वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या दारात स्वत:चा आड. गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत या आडातून मोठ्या मुश्किलीने घरगुती वापरासाठी दहा-बारा हंडे पाणी निघायचे. परंतु अलिकडेच गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हे आड पूर्ण क्षमेतेने भरले आहेत.
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : मांडवगण. श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे १० हजार लोकवस्तीचं गाव. येथील वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या दारात स्वत:चा आड. गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत या आडातून मोठ्या मुश्किलीने घरगुती वापरासाठी दहा-बारा हंडे पाणी निघायचे. परंतु अलिकडेच गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे हे आड पूर्ण क्षमेतेने भरले आहेत. शेतातही ३०० फुटांवरील पाणीपातळी चक्क ३०-४० फुटांवर आली आहे. विहिरी, कुपनलिका आजही भरलेल्या आहेत. शासनाचे जलयुक्त शिवार, जनकल्याण संस्था व लोकसहभाग या त्रिसूत्रीच्या मेहनतीने आज गाव पाणीदार झाले आहे.
श्रीगोंद्यापासून उत्तरेला सुमारे ३० किलोमीटरवर मांडवगणचा सहा ते सात हजार हेक्टरचा भौगोलिक पसारा आहे. त्यात चार हजार हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र आहे. श्रीगोंदा तालुका सधन मानला जात असला तरी मांडवगणला कोणत्याही जलसिंचनाची सोय नाही. गाव केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसाळी पिके केवळ हाती लागायची. उन्हाळ्यात नेहमीप्रमाणेच टँकर ठरलेला. गाव टंचाईग्रस्त असल्याने शासनाने २०१४-१५मध्ये जलयुक्त शिवारमध्ये गावचा समावेश केला. लोकांनाही पाण्याचे महत्व समजल्याने जलसंधारणाच्या कामात श्रमदान वाढले. जनकल्याण खासगी संस्थेने गावाला मदत केली. या सर्वांनी मिळून गावचे दुष्काळी चित्र केवळ बदललेच नाही, तर गावाला पुन्हा दुष्काळ शिवणार नाही, याची तजवीज केली. गावातून जाणाऱ्या नदीवर सुमारे २२ फूट खोलवर बंधारे गावकºयांनी उकरले. जि. प. लघूसिंचनाद्वारे सिमेंट नालाबांधमधील गाळ गाढल्याने पाणीसाठवण क्षमता वाढली. या सर्व कामांमुळे सुमारे ८०० टीसीएम नवीन पाणी उपलब्ध झाले. सध्या गावात लिंबू, डाळिंबाच्या बागा, ऊस, तसेच इतर नगदी पिकांसाठी पाणी उपलब्ध आहे.
‘‘जलसंधारणाच्या कामांमुळे गावाला नवीन दिशा मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासूनची पाण्याची समस्या चुटकीसरशी सुटली. केवळ पावसावर अवलंबून असणारी बाजरी, मूग, हुलगा, मटकी ही पिके जाऊन आता रब्बीतील ज्वारी, मका, कांदा, ऊस ही पिके, तसेच फळबागा लोकांना पहायला मिळत आहेत.’’
- प्रताप चव्हाण, ग्रामस्थ, मांडवगण
‘‘जलयुक्त शिवार, जनकल्याण व लोकसहभागातून एकेकाळी असणारा दुष्काळी गाव हा शिक्का गावाने पुसला आहे. गावात पूर्वी ३०० फूट कुलनलिका घेतली तरी कोरडी जायची, आज तिथेच केवळ ३०-४० फुटांपर्यंत पाणी आहे. एकूणच सिंचन क्षेत्र वाढले आहे. अजूनही गावातील दोन नद्यांवर बंधाºयांची संख्या वाढवता येऊ शकते. ’’
- सुरेश लांडगे, उपसरपंच, मांडवगण
‘‘गावात १२ वाड्यांचा समावेश असून काही बाजूंनी डोंगर आहे. आतापर्यंत पावसाचे पाणी वाहून जायचे. फेब्रुवारी, मार्चमध्ये टँकरने पाणीपुरवठा ठरलेला होता. मात्र यंदा टँकरची गरजच लागणार नाही. सर्वांचे आड, विहिरी, कुपनलिका, बंधाºयांत समाधानकारक पाणीसाठा आहे.’’
- विनोद देशमुख, ग्रामस्थ, मांडवगण
जलयुक्तमधून झालेली कामे
कंपार्टमेंट बंडिंग (बांधबंदिस्ती) १६६० हेक्टरवर.
सिमेंट नालाबांध - १०
शेततळे - २
गॅबीयन बंधारे - ५
वनराई बंधारे -६
खोल सलग समतल चर - ८०
लोकसहभाग गाळ काढणे -२
पाझर तलाव दुरूस्ती - १
विहीर पुनर्भरण - ३