उसाच्या नावाखाली ‘मुळा’ धरणाच्या पाण्याचा सुकाळ; आणखी एक शेतीसाठी मिळणार आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 03:17 PM2020-05-09T15:17:08+5:302020-05-09T15:17:36+5:30
मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखालील आवर्तन ४७ व्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यत साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ऊस लागवडीमुळे पाण्याचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी सदोष चा-यामुळे सर्वत्र पाण्याचा सुकाळ असल्याचे चित्र आहे.
भाऊसाहेब येवले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखालील आवर्तन ४७ व्या दिवशीही सुरू आहे. आतापर्यत साडेसहा हजार दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ८० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ऊस लागवडीमुळे पाण्याचा वापर वाढल्याचे सांगण्यात येत असले तरी सदोष चा-यामुळे सर्वत्र पाण्याचा सुकाळ असल्याचे चित्र आहे. उन्हाळी हंगामातील आणखी एक पाण्याचे आवर्तन शेतीसाठी मिळण्याची चिन्हे आहेत.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये यंदा तब्बल ४१ हजार दशलक्ष घनफूट इतके पाणी नव्याने दाखल झाले होते. या आवर्तनामध्ये उजव्या कालव्यात खाली साडेचार हजार दशलक्ष घनफूट पाणी वापर होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात पाणी वापर वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आणखी किती दिवस पाणी चालणार याबाबतही सर्वजण अनभिज्ञ आहेत. मुळा धरणाची पाण्याची पातळी घटल्याने वांबोरी चारी पाण्याचे आवर्तन बंद झाले आहे. ४० लाख रुपये पाणीपट्टी वसुली असताना प्रत्यक्षात ३५ हजार रुपये पाणीपट्टी वसूल झाल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. उजव्या कालव्यात खालील पाणीपट्टी थकीत असतानाही पाण्याचे आवर्तन सुरू आहे.
उजवा कालवा कधी बंद होणार?
मुळा धरणाच्या भरवशावर शेतक-यांनी ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढविले आहे, असा दावा पाटबंधारे खात्याने केला आहे. राहुरी तालुक्यात १२ हजार हेक्टर, नेवासा तालुक्यात ३५ हजार हेक्टर तर शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात २० हजार हेक्टर ऊस लागवड झाली असल्याची माहिती पाटबंधारे खात्याने दिली आहे. उजव्या कालव्यात खाली २७९ पाणीवापर संस्था तर डाव्या कालव्याखालील १६ पाणीवापर संस्था आहेत. डाव्या कालव्याचे आवर्तन सहाशे क्युसेकवरून २० क्युसेक करण्यात आले आहे. डावा कालवा लवकरच बंद होत असून उजवा कालवा कधी बंद होणार याबाबत उत्सुकता आहे.