पाथर्डी तालुक्यातील ५० गावांच्या पाण्याचा प्रश्न तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:36 AM2021-03-04T04:36:19+5:302021-03-04T04:36:19+5:30
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना मुळा धारणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी संयुक्तिक नसल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नाशिक येथील ...
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना मुळा धारणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी संयुक्तिक नसल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना पाणी उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना शेतीसाठी मिळावे याबाबतच्या मागणीचे निवेदन सन २०१८ मध्ये पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी दिले होते. त्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने जससंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून पाणी देणे संयुक्तिक नसल्याचे कळविले आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पाचे पाणी वापरामध्ये १,९७४ दशलक्ष इतकी तूट आहे. त्यामुळे मागणी केलेल्या पन्नास गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे प्रस्थापित मागणी तांत्रिकदृष्ट्या संयुक्त नाही, असे २८ डिसेंबर २०२० च्या पत्रात नमूद करण्यात आले होते.
त्यामुळे सानप यांनी गत आठवड्यात मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रईफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाइपलाइनच्या साह्याने मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील मौजे शिरसाटवाडी तलाव, मोहरी तलाव, घाटशीळ पारगाव मध्यम प्रकल्पामध्ये सोडून पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना शेतीसाठी पाणी द्यावे. सध्या मुळा धरणाचे पाणी साकेगाव (ता. पाथर्डी) येथे उपलब्ध आहे. तेथून मध्यम प्रकल्प पारगाव, शिरसवडी तलावांमध्ये मुळा धरणाचे पाणी पाइपलाइनने सोडले, तर तांत्रिकदृष्ट्या अडचण येणार नाही. मुळा धरणाच्या भिंतीची उंची दोन ते तीन फूट वाढवून मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना देण्याबाबतचा कार्यवाहीचा प्रश्न अधिवेशनामध्ये विशेष बाब म्हणून उपस्थित करावा. मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना शेतीसाठी देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला नाही, तर १० मे रोजी पाथर्डीत रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.