‘भंडारदरा’तून पाणी सोडले

By Admin | Published: September 5, 2014 11:39 PM2014-09-05T23:39:29+5:302014-09-05T23:48:40+5:30

संगमनेर : भंडारदरा धरणातून शुक्रवारी दुपारी सुमारे साडेसात हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले़

Water released from 'Bhandardara' | ‘भंडारदरा’तून पाणी सोडले

‘भंडारदरा’तून पाणी सोडले

संगमनेर : भंडारदरा धरणातून शुक्रवारी दुपारी सुमारे साडेसात हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे प्रवरा नदीच्या पातळीत कमालीची वाढ होवून गंगामाई घाटावर पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली़ रात्रीतून पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे़
गेल्या तीन-चार दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. धरण ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने सुरूवातीला सांडव्यावरून पाणी झेपावत होते. मात्र रात्रीपासून पावसाचा जोर राहिल्याने शुक्रवारी दुपारी साडे तीन वाजता धरणातून साडे सात हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले. निळवंडे धरणात प्रचंड प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. निळवंडे धरणही ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने त्यातून ६ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही धरणातील पाण्यामुळे प्रवरा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे. संगमनेर शहराजवळ गंगामाई घाटाच्या तीन पायऱ्या पाण्यात बुडाल्या आहेत. घाटाचा परिसर पाण्याच्या वेगाने खचत असून काही भागाची पडझड झाल्याने धोका निर्माण झाला आहे. नदी पात्रातील पाण्याची वाढ झपाट्याने होत असून, बघ्यांचीही गर्दी वाढली आहे. केवळ दोन दिवसांवर गणेश विसर्जन येवून ठेपले आहे. मागील वर्षी प्रवरेला पाणी न सोडल्याने पाच दिवस उशिरा गणेश विसर्जन झाले होते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदीला पाणी आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी प्रवरेत झेपावत असल्याने रात्रीतून पूर सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी गंगामाई घाटावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून पाणी पातळी कायम ठेवण्यासाठी दुपारी साडे सात हजार क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. निळवंडे धरणातूनही सहा हजार क्युसेकने पाणी नदीत पडत आहे.
-किरण देशमुख,
अभियंता.

Web Title: Water released from 'Bhandardara'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.