पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 05:15 PM2019-04-05T17:15:37+5:302019-04-05T17:16:59+5:30

पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत, जामखेड मतदारसंघात सर्वाधिक जलयुक्त शिवार योजनेची कामे होऊनही दोन्ही तालुक्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे़

Water Reservation in the Constituency of Guardian Minister | पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघात पाण्याचा ठणठणाट

पालकमंत्र्यांच्याच मतदारसंघात पाण्याचा ठणठणाट

साहेबराव नरसाळे 
अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांच्या कर्जत, जामखेड मतदारसंघात सर्वाधिक जलयुक्त शिवार योजनेची कामे होऊनही दोन्ही तालुक्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे़ पाण्याचे उद्भव कोरडे पडल्यामुळे तब्बल १७७ पाणी योजना बंद पडल्या असून, दोन्ही तालुके टँकरच्या पाण्यावर जगत आहेत़
कर्जत तालुक्यात १२८ पाणी योजना असून, त्यापैकी तब्बल ११४ पाणी योजना बंद आहेत़ विशेष म्हणजे कर्जत शहरासाठी २८ कोटी ५० हजार रुपयांची पाणी योजना राबवूनही लोकांना अद्याप पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही़ या योजनेला पिवळसर पाणी येत असल्यामुळे नागरिक ते पाणी पीत नाहीत़ काही नागरिक जारचे तर काही नागरिक टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवत आहेत़ कर्जत तालुक्यात शासनाकडून ८५ टँकर सुरु असून, राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीकडून २५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो़
जामखेड तालुक्यात १०६ पैकी ६३ पाणी योजना बंद आहेत़ विशेष म्हणजे शहरालाही टँकरचेच पाणी पिण्याची वेळ आली आहे़ जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणी पुरवठा होत होता़ मात्र, तलाव कोरडा पडल्यामुळे ही योजनाही बंद आहे़ जामखेड शहरात २४ टँकरद्वारे पाणी पुरवठा योजनेच्या साठवण टाकीत पाणी सोडले जाते व नंतर ते नळाद्वारे शहरात पुरविले जाते़ शहराजवळील वाड्यांना १४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो़ जामखेड तालुक्यात एकूण ८६ टँकर सुरु आहेत़ त्याशिवाय बारामती अ‍ॅग्रो कंपनीकडूनही २५ टँकर सुरु करण्यात आले आहेत़जलयुक्त शिवार योजनेतून कर्जत, जामखेड तालुक्यात सर्वाधिक कामे केल्याचे पालकमंत्री राम शिंदे जाहीर सभांमधून सांगत आहेत़ पाऊस पडल्यानंतर ड्रोनद्वारे फोटो काढून कर्जत तालुका पाणीदार झाल्याचे दाखविण्यात आले होते़ हे जलयुक्त शिवार योजनेचे हे यश असल्याचे व पाणी पातळी वाढल्याचेही त्यावेळी पालकमंत्री सांगत होते़ मात्र, मार्च महिन्याच्या अखेरीसच कर्जत, जामखेडचे सर्वाधिक उद्भव कोरडे पडले आहेत़ त्यामुळे दोन्ही तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई जाणवत आहे़

Web Title: Water Reservation in the Constituency of Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.