जलसंपदामंत्री महाजन अण्णांच्या भेटीला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:20 PM2018-09-14T12:20:38+5:302018-09-14T13:57:19+5:30

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या महात्मा गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. गिरीष महाजन आज राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्याशी शिष्टाईसाठी येत आहेत.

Water Resources minister, Mahajan, today's meeting with Anna | जलसंपदामंत्री महाजन अण्णांच्या भेटीला 

जलसंपदामंत्री महाजन अण्णांच्या भेटीला 

ठळक मुद्दे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णांचे मन वळवण्याचा प्रयत्न

राळेगणसिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या महात्मा गांधी जयंतीपासून (२ आॅक्टोबर) पुन्हा केंद्र सरकारच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. गिरीष महाजन आज राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्याशी शिष्टाईसाठी आले आहेत. मागील आंदोलनातही डॉ. महाजन हे राज्याचे दूत म्हणून हजारे यांच्याशी संपर्कात होते. 
 केंद्र सरकारच्या विरोधात शेतकºयांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्ती या प्रश्नी मार्च महिन्यात हजारे यांनी रामलीला मैदानावर उपोषण केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री डॉ. गिरीष महाजन यांनी केंद्र सरकारशी संपर्क साधून मागण्यांवर सर्वमान्य तोडगा काढून ११ मुद्यांवर लेखी आश्वासन दिले होते. 
अण्णा हजारे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी भ्रष्टाचारमुक्त भारत हेच त्यांचे लक्ष्य आहे. हजारे यांच्या मागण्या जनहिताच्या असून त्यांचे वय पाहता पुन्हा उपोषणाची वेळ त्यांच्यावर येऊ देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. उपोषण सोडताना अण्णांनी ६ महिन्यांत आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला होता. 
दरम्यान, गेल्या पाच महिन्यांनंतर लेखी आश्वासनांतील कोणत्याच मुद्यांवर कार्यवाही झाली नसल्याने हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांना उपोषणाचा इशारा दिला होता. जनतेला फसविणारे कृतघ्न सरकार असल्याचा संतापजनक टोलाही अण्णांनी मोदींना लगावला होता व येत्या गांधी जयंतीपासून उपोषण करणार असल्याचे म्हटले होते.  याच पार्श्वभूमीवर डॉ. महाजन राज्य सरकारच्या वतीने अण्णांशी चर्चा करण्यासाठी महाजन आले आहेत. या भेटीत ते नेमकी काय शिष्टाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Water Resources minister, Mahajan, today's meeting with Anna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.