नगर जिल्ह्यात नद्यांना पाणी, शेतशिवार मात्र कोरडेच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 02:01 AM2018-08-24T02:01:08+5:302018-08-24T02:01:29+5:30
शेजारील जिल्ह्यात झालेल्या पावसाने धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड नद्या वाहत्या झाल्या आहेत.
अहमदनगर : शेजारील जिल्ह्यात झालेल्या पावसाने धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड नद्या वाहत्या झाल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील १४ पैकी ११ तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्केही पाऊस झालेला नसल्याने शेतशिवार कोरडीच असल्याचे चित्र आहे.
जूनच्या प्रारंभीच पावसाने ओढ दिल्याने खरीपाच्या पेरण्या लांबल्या. तुरळक पावसावर काही भागात मूग, बाजरी, सोयाबीन, तूर, भूईमूग, कपाशीची पेरणी झाली. मात्र पावसाने पुन्हा दडी मारली. पिकांना आवश्यक असणारा दुसरा पाऊस जुलैच्या मध्यावर न झाल्याने पिके सुकली. आॅगस्ट उजाडला तरी पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खुंटली. थेट १६ आॅगस्टला दोन दिवस झालेल्या भीज पावसावर पिकांना काही अंशी जीवदान मिळाले. पावसाचे सुरूवातीचे अडीच महिने कोरडे गेल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. गावोगावचे पाझर तलाव कोरडे पडत आहेत.
सीना, खैरी प्रलल्पांत केवळ २५ टक्के साठा
पुणे, नाशिक या शेजारच्या जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणे भरली. धरणांतील अतिरिक्त पाणी त्यांनी नदीपात्रात सोडले. त्यामुळे जिल्ह्यात नद्यांना पाणी आाले. संगमनेर (८७ टक्के) व श्रीरामपूर (८५) तालुक्यात पाऊस समाधानकारक असला, तरी कोपरगाव (६८), राहुरी (५५), नेवासा (४४), राहाता (६१), पाथर्डी (५१), शेवगाव (६९), जामखेड (५८), पारनेर (४८), श्रीगोंदा (४४), कर्जत (२७), अहमदनगर (४०) हे तालुके कोरडेच आहेत. सीना, खैरी, मांडओहळ प्रकल्पांत २५ टक्केही पाणीसाठा नाही.