अहमदनगरमधील मन्याळे गाव पाणीटंचाईने झाले ओसाड, पहावी लागते टँकरची वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 04:41 AM2019-05-05T04:41:52+5:302019-05-05T04:42:14+5:30

अकोले तालुक्यातील कोतूळ व ब्राम्हणवाड्याच्या मध्यावर दोन हजार लोकसंख्येचे मन्याळे गाव. पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना दरवर्षी टँकरची वाट पहावी लागते.

water scarcity in Manyale Village in Ahmednagar | अहमदनगरमधील मन्याळे गाव पाणीटंचाईने झाले ओसाड, पहावी लागते टँकरची वाट

अहमदनगरमधील मन्याळे गाव पाणीटंचाईने झाले ओसाड, पहावी लागते टँकरची वाट

- मच्छिंद्र देशमुख
कोतूळ (जि. अहमदनगर) : अकोले तालुक्यातील कोतूळ व ब्राम्हणवाड्याच्या मध्यावर दोन हजार लोकसंख्येचे मन्याळे गाव. पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना दरवर्षी टँकरची वाट पहावी लागते. धड गुरेही पाळता येत नाहीत. मुलांची लग्नही जमेनात. पाच वर्षापूर्वी ८५ लाख रूपयांची पाणी योजना परत गेली. लालफितीच्या कारभाराने गाव मरण यातना भोगतेय.

मन्याळे हे दरवर्षी टँकर मागणारे व शासकीय अनास्थेचे बळी ठरलेले गाव. गावातील तलाव डिसेंबरमध्येच आटतो. कूपनलिका देखील जानेवारीत कोरडी होते. फेब्रुवारीत दरवर्षी गावात टँकर येतो. गावात दोन हजारांवर बॅरल आहेत. पिण्यासाठी व जनावरांना हेच पाणी पाच महिने वापरावे लागते. गावात पाणी नसल्याने मुलांची लग्न होत नाहीत. मराठा समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले.

पिण्याच्या पाण्यासाठी खोल विहिरीत अक्रूर हांडे हा शेतकरी व एका दहा वर्षांच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला. मन्याळे गावासाठी २०१२ ला राष्ट्रीय पेयजल योजनेतून वाघापूर गावातील मुळा नदीवरून ८५ लाख रूपयांची योजना मंजूर झाली. पैसेही आले. मात्र अचानक वाघापूर गावातील काही लोकांनी योजना बंद केली. त्यात ग्रामसेवकाने वर्कआॅर्डर लवकर न दिल्याने योजना बंद पडली. पैसेही परत गेले.अनेकांना निवेदने दिली. तहसीलसमोर महिलांनी आंदोलन केले. मात्र गावाला पाणी मिळालेच नाही.

राज्यात १,२०७ चारा छावण्या झाल्या सुरू

पुणे : दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील १० जिल्ह्यांत एकूण १ हजार २०७ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यात लहानमोठ्या ८ लाख ४ हजार ३२० पशुधनाचे संगोपन केले जात आहे. काही भागात चारा उपलब्ध आहे. मात्र, पाणी उपलब्ध नसल्याने पशुधन छावण्यांमध्ये दाखल केले जात असून दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने पुढील काळात चारा छावण्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने महसूल विभाग, स्वयंसेवी संस्थांकडून आणि राहत शिबीर म्हणून चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
 

Web Title: water scarcity in Manyale Village in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.