लालफितीत अडकली ३२ गावांची पाणी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:18 AM2021-03-22T04:18:37+5:302021-03-22T04:18:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोले : गेल्या पंधरा वर्षांपासून तालुक्यातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सरकारी लालफितीच्या कारभारात अडकले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले : गेल्या पंधरा वर्षांपासून तालुक्यातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सरकारी लालफितीच्या कारभारात अडकले आहे. चार वर्षे झाली तरी या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण होऊनही योजना कार्यान्वित झाली नाही.
ही योजना पूर्ण झाली आहे. केवळ दोन-तीन ठिकाणी किरकोळ पाईपलाईन जोडणे बाकी आहे. गेली चार वर्षे सुप्रमा प्रस्ताव दाखल आहेत. योजना चाचणीसाठी अडीच लाख रुपयांची वीज खर्च झाली. ती भरण्यासही जलसंपदा विभाग तयार आहे. दरम्यान, ठेकेदाराचे पैसे अडकल्याने योजना कार्यान्वित होण्यास दिरंगाई होत आहे. यामुळे ३२ गावांची तहान भागणार कधी? ३० कोटींच्या या योजनेला २००९ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. अकरा वर्षांत ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यात निळवंडे धरण हा उद्बोध धरुन थेट धरणात विहीर घेऊन संप, पंप, पाणी शुद्धीकरण यंत्रणा, सर्व गावांना जोडणारी नळयोजना जवळपास पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी किरकोळ नळ सांधे जोडणीचे काम बाकी आहे. काही भागात पाणी योजनेची चाचणीही घेण्यात आली आहे. या चाचणीसाठी अडीच-तीन लाख रुपयांची वीज खर्च झाली आहे. या योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ३० कोटी रुपये अदा झाले आहेत. अधिकच्या कामाचे ४ कोटी ३५ लाख रुपये ठेकदाराला सरकारकडून येणे बाकी आहेत. या योजनेचे काम सध्या बंद असून, योजनेची किंमत वाढल्याने ४४ कोटी ५० लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.
....
३२ गावांच्या पिण्याच्या पाणी योजनेबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी निळवंडे भेटीत चर्चा झाली. सुप्रमा संदर्भात मंत्री पातळीवर लवकर बैठक होईल. येत्या काही दिवसात योजना कार्यान्वित होईल.
- आमदार डाॅ. किरण लहामटे, अकोले.
...
फोटो-२१अकोले पाणी योजना
..
ओळी-अकोले तालुक्यातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या १५ वर्षांपासून सरकारी लालफितीच्या कारभारात अडकले आहे.