साईसमाधी मंदिराखालील तळघरात पाण्याचा पाझर; रोज पाचशे लीटर पाणी पडतेय बाहेर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 11:14 AM2020-08-02T11:14:02+5:302020-08-02T11:14:43+5:30
पावसामुळे साईसमाधी मंदिरात समाधीलगत असलेल्या तळघरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत आहे़ मंदिर बंदमुळे अगोदरच आर्थिक समस्येचा सामना करीत असलेल्या साईसंस्थानची या झिरपणा-या पाण्याने चिंता वाढवली आहे़
शिर्डी : पावसामुळे साईसमाधी मंदिरात समाधीलगत असलेल्या तळघरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत आहे़ मंदिर बंदमुळे अगोदरच आर्थिक समस्येचा सामना करीत असलेल्या साईसंस्थानची या झिरपणा-या पाण्याने चिंता वाढवली आहे़
गेल्या आठवडाभरात आठ-दहा ठिकाणी ड्रिल मारून त्यात केमिकल भरून पाणी अडविण्याचा प्रयत्न विफल ठरला आहे. एका ठिकाणी पाणी बंद केल्यानंतर अन्य ठिकाणातून पाणी निघत आहे़ रोज जवळपास पाचशे लिटर पाणी बाहेर पडत आहे़
समाधी चौथºयावरील साईबाबांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूने समोरून येणाºया दर्शन रांगेखाली या तळघरात उतरण्यास दरवाजा आहे़ दर्शनरांगेतील या स्टीलच्या दरवाजावर पाय देवून भक्तांची रांग पुढे सरकत असते़ दर्शनरांग बंद असतांना हा दरवाजा उघडून पायºया उतरून तळघरात जाता येते़
मंदिराच्या जमिनीखालील भागात समाधी चौथºयालगत उत्तर बाजूला दोन तळघरे आहे़ यात दैनंदिन वापराची साईमूर्तीची आभूषणे व पूजेच्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतात़ शंभर वर्षापूर्वी वाडा बांधताना बुटींनी मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठीच हे तळघर बनवल्याचे दिसते़ सध्या याच तळघरात समाधी कडील भिंती, पाय-यांमधून पाणी पाझरत आहे़
पाण्याचा पाझर थांबवण्यासाठी संस्थानचे सीईओ रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मुख्य अभियंता रघुनाथ आहेर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदींसह कर्मचारी आठवड्यापासून प्रयत्नशील आहेत़