शिर्डीतील पाणी संपले
By Admin | Published: June 27, 2016 12:48 AM2016-06-27T00:48:39+5:302016-06-27T00:56:42+5:30
शिर्डी : साई संस्थानच्या तलावापाठोपाठ नगरपंचायतच्या साठवण तलावानेही मान टाकली़ रविवारी या तलावातून अखेरचे पाणी उपसून नागरिकांना देण्यात आले़
शिर्डी : साई संस्थानच्या तलावापाठोपाठ नगरपंचायतच्या साठवण तलावानेही मान टाकली़ रविवारी या तलावातून अखेरचे पाणी उपसून नागरिकांना देण्यात आले़ त्यामुळे आगामी काही दिवस शिर्डीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शिर्डीत प्रथमच एवढी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़
गेल्या पंधरवाड्यात संस्थानने पाण्याअभावी भक्तनिवास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला़ नगरपंचायत गेले काही दिवसांपासून दर दहा दिवसांनी पाणी पुरवठा करत होती, ते पाणीही आता संपले़ शिर्डीतील कूपनलिका दोन महिन्यांपूर्वीच कोरड्या पडल्या आहेत़ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील पाणीही संपुष्टात आले़ पैसे देऊनही पाणी मिळेनासे झाले आहे़ आपापल्या प्रभागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या नेतेमंडळींचीही पाण्याच्या उपलब्धतेसाठी दमछाक होत आहे़ डॉ़ सुजय विखे यांनी लोकसहभागातून राबवलेल्या जलक्रांती योजनेतून ओढे, नाल्यांचे खोलीकरण झाले़ मात्र आता या योजनेलाही पावसाची प्रतीक्षा आहे़
या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने शहरात तातडीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक गोंदकर यांनी केली आहे. गेल्या १४ जून रोजी नगरपंचायतने विशेष सभा घेऊन याबाबत ठराव केल्याचेही गोंदकर यांनी सांगितले़
नव्यानेच रूजू झालेले मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करावी व टँकरने थेट मुळा धरणातून पाणीपुरवठा करावा, अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा गोंदकर यांनी दिला आहे़
(तालुका प्रतिनिधी)
नगरपंचायतच्या साठवण तलावाची क्षमता मोठी असली तरी ६५ टक्क्याहून अधिक पाण्याची गळती होत असल्याने या तलावात तातडीने प्लॅस्टिक कागद टाकावा किंवा कायम स्वरूपी काँक्रिटीकरण करावे, शहरासाठी मंजूर झालेल्या २२ कोटींच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करावे, थेट निळवंडे धरणातून बंद पाईपने पाणी आणावे आदी मागण्याही गोंदकर यांनी केल्या आहेत़