पाणी अडले... गळती कधी थांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:20 AM2021-03-31T04:20:38+5:302021-03-31T04:20:38+5:30
पाचेगाव : गेल्या तीन वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडे शेतकरी बंधारा दुरुस्तीची मागणी करीत आहेत. दोन वर्षांत दोन वेळा दुरुस्तीचे प्रस्ताव ...
पाचेगाव : गेल्या तीन वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडे शेतकरी बंधारा दुरुस्तीची मागणी करीत आहेत. दोन वर्षांत दोन वेळा दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. मात्र, हे दोन्ही दुरुस्ती प्रस्ताव रद्द करून पुन्हा तिसरा सुधारित प्रस्ताव तयार करून पाठविण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली. बंधारे दुरुस्तीच्या प्रस्तावाचा लांबचा प्रवास बघता बंधाऱ्यात पाणी अडणार, मात्र गळती केव्हा थांबणार हाच सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगाव, मधमेश्वरसह प्रवरेवरील चौदा बंधारे भरण्यासाठी भंडारदरा धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. यासाठी धरणातील जवळपास १५०८ दलघफू पाणी खर्च झाले. वरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, पाचेगाव बंधाऱ्याच्या झडपातील आणि पायथ्याला असणाऱ्या गळतीतून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. मागील चार-पाच दिवसांपूर्वी पुनतगाव बंधाऱ्यातून झडप निसटून अडवलेले पाणी वाहून गेल्याची घटना घडली. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी अडवूनही गळतीचे पाणी रोखायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडू लागला आहे.
अहमदनगर पाटबंधारे विभागाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी नोव्हेंबर २०१८ च्या अखेरीस या बंधाऱ्याची पाहणी केली होती. त्यांनी बंधारा दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरू करू, असे आश्वासनही दिले होते.
साहित्याच्या कमीअधिक दरामुळे हा प्रस्ताव रद्द करण्याची नामुष्की पाटबंधारे विभागावर आली होती. गेल्या वर्षी दुसरा प्रस्ताव पाठविण्यात आला तोही रद्द झाला. आता पुन्हा तिसरा सुधारित नवीन प्रस्ताव पाठविण्यात आला असून, तो सध्या अहमदनगर येथील कार्यालयात पडून आहे. पुढे त्याचा नाशिक, औरंगाबाद आणि मंत्रालय असा प्रवास पाहता या बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी प्रत्यक्षात किती काळ प्रतीक्षा करावी लागेल. आता हे पाहावे लागेल.
राज्य शासन पाणी अडविण्यासाठी दरवर्षी अनेक नवीन योजना राबवून करोडो रुपये खर्च करते. मात्र, ज्या जुन्या योजना आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी मात्र निधी दिला जात नाही. पाचेगाव बंधाऱ्याच्या निर्मितीला जवळपास पस्तीस वर्षे उलटून गेली आहेत. पाणी गळतीमुळे येथील पाचेगाव, इमामपूर, गोणेगाव, निंभारीसह तिळापूर, खिर्डी या गावातील शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा कधी संपणार, हाच खरा प्रश्न आहे.
.......
पाचेगाव, पुनतगाव, मध्यमेश्वर या तीन बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी वीस लाखांच्या एकत्रित कामाचा सुधारित प्रस्ताव आहे. पाचेगाव बंधाऱ्यासाठी साधारण तीस ते पस्तीस लाख रुपये मिळतील. नवीन प्रस्ताव नगरला असून, येत्या काही दिवसांत नाशिक येथील लाभ विकास प्राधिकरण कार्यालयाकडे जाईल. प्रस्तावात रेलिंग, दोन्ही साइड भिंती आणि पायाचे बांधकाम, क्वार्टर, मोऱ्यांची दुरुस्ती आदी बाबींचा प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे.
-
महेश शेळके, कनिष्ठ अभियंता, श्रीरामपूर, पाचेगाव.
............