जिल्ह्याला पाजले ४६ कोटींचे पाणी
By Admin | Published: July 31, 2016 01:01 AM2016-07-31T01:01:38+5:302016-07-31T01:03:21+5:30
अण्णा नवथर, अहमदनगर दुष्काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती़ दुष्काळात जिल्ह्यातील १३ लाख नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला
अण्णा नवथर, अहमदनगर
दुष्काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती़ दुष्काळात जिल्ह्यातील १३ लाख नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला असून, विविध संस्थांनी पुरविलेल्या पाण्यावर ४६ कोटींचा खर्च झाला असल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाले आहे़ गेल्या तीन वर्षांतील टँकरवरील खर्चाने यंदा उच्चांक गाठला आहे़
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात कमी पाऊस पडतो आहे़ त्यामुळे यंदाचा दुष्काळ भयावह होता़ दुष्काळ काळात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भीषण स्थिती निर्माण झाली होती़ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर होता़ सरकारने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत मागेल तिथे टँकर देण्याची घोषणा केली होती़ मागील मार्च, एप्रिल, मे आणि जून हे चार महिने अत्यंत कठीण गेले होते़ या काळात जिल्ह्यातील टँकरनेही उच्चांक गाठला होता़ सर्वाधिक एप्रिलमध्ये ८२६ टँकर सुरू होते़
टँकरला मंजुरी जिल्हा प्रशासनाकडून दिली जाते़ परंतु प्रत्यक्ष कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत होते़ जिल्हा परिषदेने टँकरवर झालेल्या खर्चाचा अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनास सादर केला़ त्यानुसार एप्रिल ते १५ जुलै, या काळात टँकरसाठी ४२ कोटी खर्च झाले आहेत़ त्याचबरोबर नगरपालिका परिसरातील टँकरवर चालकांची ४ कोटींची उधारी झाली आहे़ शहर व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यावर ४६ कोटी रुपये खर्च झाले आहेत़
टँकर चालकांची देयके देण्यासाठी प्रशासनाने सरकारकडे निधीची मागणी केली होती़ त्याची दखल घेऊन सरकारने पहिला २४ कोटींचा हप्ता जिल्हा प्र्रशासनाकडे वर्ग केला आहे़ जिल्हा प्रशासनाने हा निधी जिल्हा परिषद व नगरपालिकांकडे सुपूर्द केला आहे़ जिल्हा परिषदेची ४२ कोटींची मागणी आहे़ त्यापैकी २० कोटी जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे़
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा टँकरवर सर्वाधिक खर्च झाला आहे़ दुष्काळात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असते़ परंतु एखाद्या गावात दरवर्षीच पुन्हा टँकर देण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने उपाययोजना राबविणे अपेक्षित आहे़ टँकर हा अखेरची उपाययोजना आहे़ परंतु इतर उपायोजनांना फाटा देवून टँकरवर भर देवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणांकडून होत आहे़ त्यामुळे एकाच गावात पुन्हा पुन्हा टँकर देण्याची वेळ आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे़