पोलिस बंदोबस्तात येडगाव धरणात पाणी : कुकडीचे आवर्तन दोन दिवसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:04 AM2019-03-31T11:04:01+5:302019-03-31T11:05:12+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र यांनी नगरकरांना पाणी देणे आवश्यक आहे त्यामुळे आपण सहकार्य करावे असे दिलीप वळसे व शरद सोनवणे यांना सांगितले.
श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन हा कळीचा मुद्दा झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांचा विरोध मोडीत काढून माणिकडोहचे पाणी पोलिस बंदोबस्तात येडगाव धरणात सोडले आहे. पिंपळगाव जोगे धरणातूनही येडगावमध्ये पाणी सोडण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत. त्यामुळे येडगाव धरणातून कुकडीचे ३ एप्रिलनंतर सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुकडी प्रकल्पात अवघे १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. येडगाव धरणाने तर तळ गाठला त्यामुळे कुकडीचा पाणी प्रश्न थेट राजकिय आखाड्यात आला. माणिकडोहचे पाणी येडगाव धरणामध्ये सोडले तर आम्ही जलसमाधी होऊ असा इशारा पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी नेत्यांनी दिला होता. त्यामुळे नगर जिल्ह्याला पाणी मिळणार कीनाही यावर असा प्रश्न उपस्थित झाला होता.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्री देवेंद्र यांनी नगरकरांना पाणी देणे आवश्यक आहे त्यामुळे आपण सहकार्य करावे असे दिलीप वळसे व शरद सोनवणे यांना सांगितले. पोलिस बंदोबस्तात माणिकडोह व पिंपळगाव जोगे धरणाचे पाणी सोडावे असे आदेश दिले. त्यामुळे राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात केल्या आहेत. माणिकडोहचे पाणी येडगाव धरणामध्ये शनिवारी उशीरा सोडले तर पिंपळगाव जोगे आवर्तन पूर्ण होताच काही तासातच पिंपळगाव जोगे धरणाच्या मृत साठ्याातून येडगाव मध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.