उन्हाच्या काहीलीत पक्ष्यांना पाणवठ्यांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:32+5:302021-04-17T04:19:32+5:30
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा ...
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, कृषिदिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान, एक ओंजळ पक्ष्यांसाठी उपक्रमातून धान्याची सोय अशा नवोपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम प्रतिष्ठानकडून केले जात आहे. यावर्षी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन घोरतळे यांनी उन्हातान्हात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी चिमणी - पाखरे पाणवठा हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी एकबुरूजी, काळोबा, पहिलवान वस्ती येथील सुरज घोरतळे, गौतम कासुळे, अमोल ढगे, अशोक घोरतळे, किरण काशिद आदी सवंगड्यांच्या साहाय्याने झाडे - झुडूपे, घरांचे छप्पर, स्लॅब, माळवद आदी ठिकाणी प्लाॅस्टिकच्या कटोऱ्या लटकावून त्यात पाणी व धान्य ठेवले आहे. या कृत्रिम पाणवठ्यातून पक्ष्यांसाठी धान्याची सोय केली आहे. तसेच या दिवसांत पक्ष्यांची पाण्यावाचून होणारी तडफड थांबविण्यासाठी परिसरातील युवकांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम गावोगावी राबवावा, प्रतिष्ठानकडून शक्य ती मदत केली जाईल, असे आवाहन माऊली प्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे.
........
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यावाचून पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात तडफडून मृत्यू होत असतात. अशावेळी माणुसकीच्या नात्याने पक्ष्यांचा मृत्यूदर रोखण्यासाठी असे कृत्रिम पाणवठे उभारणे गरजेचे आहे.
- सचिन घोरतळे, अध्यक्ष, माऊली प्रतिष्ठान, बोधेगाव.
................
फोटो -बोधेगाव
बोधेगाव येथील पहिलवान वस्ती याठिकाणी चिमणी - पाखरं पाणवठा उपक्रम राबवताना शाळकरी मुलगा सुरज घोरतळे.