शेतातच होतेय टरबुजाची माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:44+5:302021-04-25T04:19:44+5:30
लोणी : वाढत्या उन्हाची दाहकता शरीराला लाहीलाही करून जाते. त्यासाठी अनेक जण उन्हाळी पीक असलेल्या टरबुजाचे सेवन करतात. मात्र, ...
लोणी : वाढत्या उन्हाची दाहकता शरीराला लाहीलाही करून जाते. त्यासाठी अनेक जण उन्हाळी पीक असलेल्या टरबुजाचे सेवन करतात. मात्र, कोरोनाच्या सावटाने बाजारपेठ बंद असल्याने सध्या टरबूज शेतातच सडत आहेत.
थंड फळ म्हणून टरबुजाला मोठी मागणी असते. परंतु मागील एका वर्षापासून कोरोना संक्रमण काळात टरबुजाच्या शेतीचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. सध्या बाजारपेठा बंद असल्याने शेतात टरबूज पडून आहेत. त्यामुळे सर्व टरबूज खराब होण्याच्या मार्गावर आहेत. राहाता तालुक्यात यावर्षी १५०ते २०० एकर शेतजमिनीवर टरबुजाची लागवड करण्यात आली आहे. परंतु मागील एका वर्षापासून कोरोना संक्रमणात वाढ झाल्याने ही टरबूज शेती नुकसानीत आली आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शेतातील टरबूज कुठे विक्री करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. टरबुजाची शेती ही महाग आहे. बी- बियाणांपासून तर फळाची वाढ होईपर्यंत शेतकऱ्यांना टरबुजाला जपावे लागते. कीड लागू नये म्हणून अनेक रासायनिक द्रव्यांचा वापर करावा लागतो. ही सर्व रासायनिक औषधे महागडी आहेत. सध्या लागवडीचा खर्चसुद्धा या टरबूज उत्पादनातून निघत नाही. सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे. पर्यायाने या टरबुजांना बाजारपेठ मिळणे बंद झाले आहे. सध्या शेतामध्ये वेलींना मोठ्या प्रमाणात टरबूज लागले आहेत. उष्णतेमुळे हे सर्व टरबूज काही दिवस असेच राहिले तर खराब होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
...........
१
महिन्यापूर्वी टरबुजाच्या वेली कळी अवस्थेत असताना अचानक तापमान वाढले त्यामुळे अनेक ठिकाणच्या टरबूजवेली करपून गेल्या तर काही ठिकाणी वेलीच्या कळ्यांची गळ झाली. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.त्यातच पुढे कडक लाॅकडाऊन सुरू झाल्याने उत्पादित झालेला माल ग्राहकांअभावी शेतातच राहिला आणि करपून गेला.
........
आर्थिक मदत करावी
लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत, तर काही ठिकाणी मर्यादित वेळा दिल्याने टरबूज विक्रीची समस्या निर्माण झाली आहे. सध्या शेतात टरबूज मोठ्या प्रमाणात लागले आहेत. टरबूज खरेदी करणारे व्यापारी कोरोनामुळे धजावत नाहीत. त्यामुळे शेतातील टरबुजांची विक्री कुठे करावी, असा प्रश्न आहे. लागवडीचा खर्चही यावर्षी निघाला नाही. त्यामुळे शासनाने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
- डॉ.शिवनाथ घोरपडे,
शेतकरी, पिंपरी निर्मळ, ता. राहाता
(फोटो आहे)