हळगावची हॉटस्पॉटकडे वाटचाल, कोरोनाने १८ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:43+5:302021-05-09T04:21:43+5:30
जामखेड : तालुक्यातील हळगावची वाटचाल आता हाॅटस्पाॅटच्या दिशेने होऊ लागली आहे. मागील अकरा दिवसात गावातील १८ जणांचे मृत्यू झाल्याने ...
जामखेड : तालुक्यातील हळगावची वाटचाल आता हाॅटस्पाॅटच्या दिशेने होऊ लागली आहे. मागील अकरा दिवसात गावातील १८ जणांचे मृत्यू झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. लिंबाचे आगार असलेल्या हळगावमध्ये आता कठोर उपाययोजना राबवण्यासाठी गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यांनी संपूर्ण गावाची कोरोना तपासणीसाठी मोहीम हाती घेऊन शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात १७० जणांचे घशातील स्वॅबची (आरटीपीसीआर) तपासणी केली आहे.
आमदार रोहित पवार यांनी गुरुवार जामखेड येथे आले असता हळगाव व नायगाव या ठिकाणी कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता या संपूर्ण गावांची घशातील स्वॅब घेऊन तपासणीचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गटविकास अधिकारी परशुराम कोकणी शुक्रवारी स्वत: दुपारपर्यंत हळगावमध्ये तळ ठोकून होते. यावेळी ग्रामसेविका नीलिमा कुबसंगे, उपसरपंच अशोक रंधवे, सत्तार शेख, धनंजय ढवळे, आबासाहेब ढवळे, आरोग्यसेविका नागरगोजे, संजीवनी बारस्करसह आशा सेविका यावेळी उपस्थित होत्या.
परशुराम कोकणी यांनी कोरोना स्थिती रोखण्यासाठी संपूर्ण गावाची घशातील स्वॅब तपासणी आयोजित केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:हून तपासणी करावी. नागरिकांनी घाबरून न जाता तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले. या आवाहनास ग्रामस्थांनी प्रतिसाद देत १०० जणांचे स्वॅब नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. शनिवारी ७० जणांचे स्वॅब नमुने घेतले आहेत. दोन दिवसात १७० जणांचे स्वॅब तपासले आहेत व त्यांना अहवाल येईपर्यंत घरीच विलगीकरण राहण्यासाठी सांगितले आहे.
---
गावातील सर्व गल्ल्या बंद..
येथे दुसऱ्या लाटेत १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ग्रामपंचायतीने गावातील सर्व गल्ल्यांना जोडणारे रस्ते आता बांबू टाकून बंद केले आहेत. गावात सध्या दहा दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू आहे. हा कर्फ्यू १४ मे पर्यंत चालणार आहे. गावातील सर्व व्यवहार ठप्प आहेत.