‘हम सब एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 08:05 PM2018-04-15T20:05:31+5:302018-04-16T10:00:00+5:30
न कळत्या वयात त्यांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल फिरावे लागे. कधी छावणीत आपल्या पशुधनासोबत मुक्काम करावा लागे. दुष्काळाचे चटके बालवयात सोसावे लागणारे चिमुकले हात सुट्टीची मौजमजा सोडून गावाच्या जलसंधारण कामाच्या श्रमदानासाठी झटत आहेत.
योगेश गुंड
केडगाव : न कळत्या वयात त्यांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल फिरावे लागे. कधी छावणीत आपल्या पशुधनासोबत मुक्काम करावा लागे. दुष्काळाचे चटके बालवयात सोसावे लागणारे चिमुकले हात सुट्टीची मौजमजा सोडून गावाच्या जलसंधारण कामाच्या श्रमदानासाठी झटत आहेत. नगर तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधून सध्या चिमुकले दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी श्रमदानात आपला खारीचा वाटा उचलत आहेत.
दुष्काळी नगर तालुक्याचे चित्र जलयुक्त योजनेमुळे आता काहीशे बदलत आहेत. मात्र सरकारी योजनेवर अवलंबून न राहता लोकसहभाग वाढवून काही गावांनी दुष्काळ मुक्तीच्या दिशेने पाउल टाकले आहे. जलसंधारणच्या कामात अनेक गावांनी भाग घेऊन गाव पाणीदार करण्याचा चंग बांधला आहे. सध्या पाणी फौंडेशनची वॉटर कप स्पर्धा सुरु आहे. नगर तालुक्यातील जवळपास ५२ गावांनी यात सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले. मात्र प्रत्यक्षात २५ गावानीच काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या गावांनी काम सुरु केले पण सध्या पाच-ते सहा गावेच यात तग धरून उभे आहेत. गावातील नद्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, समतल चर, बांध बंधीस्ती, दगडांचे बांध घालणे आदी कामे करून गावातील पाण्याचा थेंब न थेंब गावातच साठवण्यासाठी हि गावे आता अंग झटकून काम करत आहेत. यात मांजरसूंबा, डोंगरगण, सारोळा कासार हि गावे आघाडीवर आहेत.
दुष्काळी नगर तालुक्यात शालेय विद्यार्थी आता या जलसंधारण चळवळीत उतरले आहेत. कधीकाळी पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे मैलोमैल पाण्यासाठी हिंडणारे मुले तर कधी आपल्या पशुधनासाठी छावणीत मुक्काम करणारे हे चिमुकले आता भल्या सकाळी आणि संध्याकाळी गावातील श्रमदानासाठी आपला खारीचा वाटा उचलत आहेत. उन्हाळी सुट्टी असल्याने शालेय विध्यार्थी मोठ्या संख्येने गावातील मोठ्यांच्या खांद्याला खांदा लाऊन श्रमदान करण्याचे काम करत आहेत. यातून गावातील समतलचर, दगडी बांध घालणे अशी कामे करून मुलांनी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आपल्या सुट्टीवर पाणी सोडले आहे. सुट्टीतील मौजमजा सोडून, मामाच्या गावाची गंमत सोडून हे शाळकरी चिमुकले हात आता गावाला पाणीदार करण्यासाठी श्रमदान करताना दिसत आहेत. मांजरसुंबा व सारोळा कासार आणि डोंगरगण या गावातील मुलांचे हे श्रमदान गावातील मोठ्यांना लाजवणारे आहे. गावाला बक्षीस मिळवून देण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न वाखाण्याजोगे आहेत.
श्रमदानाच्या ठिकाणीच पहिला वाढदिवस साजरा
श्रमदानाच्या सातव्या दिवशी सारोळा कासार येथे अनोखा उपक्रम साजरा झाला. वरद संदीप कडूस याचा पहिला वाढदिवस श्रमदानाच्या ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी हैप्पी बर्थडे ऐवजी हम सब एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उपसरपंच दत्तात्रय कडूस यांनी सर्व टीम ला ११०० रुपयांची देणगी दिली. केकच्या अवती भोवती मेणबत्ती ऐवजी टिकाव, घमेले, फावडे ठेवण्यात आले होते.
वॉटर कप स्पर्धेत आमच्या गावाने सहभाग घेतला. आम्ही सर्व मुले आनंदाने श्रमदानासाठी रोज जातो. आम्ही शाळेत १२ हजार रोपे लाऊन रोपवाटिका तयार केली आहे. उन्हात खेळायला जाऊ नको म्हणणारे आमचे आई वडील श्रमदानासाठी आम्हला अडवत नाहीत. - यश हारदे, विद्यार्थी, इयत्ता ६ वी, सारोळा कासार