"आम्ही कोपरगावचे डॉन आहोत, पैसे मागतो का?"; तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल
By सचिन धर्मापुरीकर | Published: November 26, 2023 12:52 PM2023-11-26T12:52:34+5:302023-11-26T12:52:52+5:30
बारच्या कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला : तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल
कोपरगाव (जि. अहमदनगर) : 'आम्हाला ओळखत नाहीस का?, आत्ताच जेलमधून बाहेर आलोत, आम्ही कोपरगावचे डॉन आहोत' असे सूनावत तीन जणांनी खान्या-पिण्याचे बील मागणाऱ्या बियर बारच्या कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला केला. यात कामगार गंभीर जखमी झाला असून त्यांना लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी (दि. २५ नोव्हेंबर) रात्री ११.१५ वाजता घडली.
अक्षय सुरेश शेलार (वय २९, रा. जुनी मामलेदार कचेरी, कोपरगाव) असे जखमी कामगाराचे नाव आहे. अक्षय शेलार हे हॉटेल अशोका या बियर बारमध्ये कर्मचारी आहेत. शनिवारी रात्री शुभम साहेबराव आरगडे (वय २५), अक्षय खंडेराव जगताप (वय २७) व रोहीत छगन साळवे (वय ३१, सर्व रा. कोपरगाव) हे तीघे हॉटेलमध्ये आले. त्यांनी दारू पिली व त्यानंतर जेवण केले. जेवणानंतर बील न देताच ते हॉटेलमधून बाहेर पडत होते. तेव्हा अक्षय शेलार यांनी त्यांना दारू व जेवणाचे बिल मागितले. त्याचा राग तीघांना आला.
'तु आम्हाला ओळखत नाहीस का?, आम्ही आताच जेल मधुन सुटून आलो आहाेत, आम्ही कोपरगावचे डॉन आहोत' असे म्हणुन अक्षय जगताप व रोहीत साळवे यांनी व्यवस्थापक अक्षय शेलार यांना पकडून ठेवले. त्यानंतर शुभम आरगडे याने हॉटेलबाहेर पळत जात स्कूटीच्या डीकीमधून मोठा चाकू काढला व अक्षय शेलार यांच्या पोटावर दोन वार केले. अक्षय शेलार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून तीघेही पळून गेले. जखमी अक्षय शेलार यांना तात्काळ लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. तीथे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी सव्वासहा वाजता तीन आरोपींविरूद्ध भादवि ३०७, ५०४, ५०६, ३४ व भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा
घटनास्थळ असलेल्या हॉटेल अशोकामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक प्रदिप देशमुख, पोलिस उपनिरीक्षक संजय पवार यांनी पंचनामा केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.