आम्हाला नाही कोरोनाची भीती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:14 AM2021-03-29T04:14:18+5:302021-03-29T04:14:18+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील मार्चअखेरच्या दि.२८ आठवडे बाजारात विक्रेते व ग्राहकांची उदंड गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी ...
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील मार्चअखेरच्या दि.२८ आठवडे बाजारात विक्रेते व ग्राहकांची उदंड गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी ‘आम्हाला नाही कोरोनाची भीती’, अशा आवेशात लोक वावरत असल्याचे चित्र होते. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.
कोरोना शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात पाय पसरत असताना लोक मात्र निर्धास्त आहेत. काळजी घेतली तर सरकारला सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच आठवडी बाजार बंद करण्याची गरज पडणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २९ पासून दि. १५ एप्रिलपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा परिणाम विसापूर येथील आठवडी बाजारात दिसून आला. लोकांनी नेहमीपेक्षा या वेळी शेवटचा बाजार म्हणून बाजारहाट करण्यासाठी जास्त गर्दी केली होती. काही लोक मास्क लावून कोरोनापासून बचाव करण्यासाठी जागरूक असल्याचे दिसून आले. कोरोनाची आम्हाला कोणीही भीती नसल्याच्या आविर्भावात वावरत होते. विक्रेतेही सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करायला तयार नाहीत.
--
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता
पुढील काही दिवस आठवडी बाजार बंद राहणार असल्याने आपण मोठ्या कष्टाने पिकविलेला भाजीपाला कोठे विकायचा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. १५ एप्रिलपर्यंत आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी डेटलाइन दिली आहे. मात्र, त्यात पुढे वाढ झाली तर काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यावेळीही उन्हाळ्यात शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सामना तर करावा लागणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे.
--
२८ विसापूर
विसापूर आठवडी बाजारात ग्रामस्थांची झालेली गर्दी.