मंजूर कामांचेच आम्ही नारळ फोडतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:23 AM2021-09-26T04:23:51+5:302021-09-26T04:23:51+5:30
लाडजळगाव : खोटे बोलून राजकारण करणे हा आमचा धंदा नाही. जे काम मंजूर आहे त्याच कामाचे नारळ आम्ही फोडतो. ...
लाडजळगाव : खोटे बोलून राजकारण करणे हा आमचा धंदा नाही. जे काम मंजूर आहे त्याच कामाचे नारळ आम्ही फोडतो. उगाचच पोतेभर नारळ फोडून आम्ही पुढे जात नाही, असा चिमटा जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी विरोधकांना काढला.
थाटे (ता. शेवगाव) येथे जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर जिल्हा वार्षिक योजना २०२०-२१ अंतर्गत थाटे ते केदार वस्ती या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच मनसुख केदार होते. यावेळी रामनाथ महाराज शास्त्री, जि. प. सदस्या हर्षदा काकडे, प्रा. सखाराम घावटे, उपसरपंच बाबासाहेब मरकड, चेडे चांदगावचे सरपंच भाऊसाहेब कणसे, हरिश्चंद्र निजवे, शिवाजी कणसे, परमेश्वर गोंधळी, रामेश्वर चेडे, बाबासाहेब गोंधळी, योगेश देशमुख, नवनाथ खेडकर, मारुती वाघ, जालिंदर घावटे, सखाराम कसबे, कल्याण ससाणे, पांडुरंग चव्हाण, भाऊसाहेब निजवे, शंकर हुंबे आदी उपस्थित होते.
काकडे म्हणाले की, आम्ही खोटी आश्वासन देत नाहीत. कापूस उत्पादकांसाठी काही ना काही करणार असे सांगितले होते. त्यानुसार कापूस उत्पादकांसाठी मोठा प्रकल्प उभा केला आहे. माझे स्वप्न मोठे आहे. मी कोणत्याही पक्षात नाही. सर्वसामान्य जनता हाच माझा पक्ष आहे.
हर्षदा काकडे म्हणाल्या, यापूर्वीही या रस्त्याच्या खडीकरण कामासाठी निधी दिला होता. आता डांबरीकरण कामाचा प्रारंभ आपण करत आहोत. पावन गणपती संस्थान देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
----
२५ लाडजळगाव
थाटे (ता. शेवगाव) येथे रस्ता कामाचा प्रारंभ करताना ॲड. शिवाजीराव काकडे, हर्षदा काकडे व इतर.