केडगाव निवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर केल्याने आमचा पराभव : खासदार दिलीप गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 04:40 PM2018-04-12T16:40:28+5:302018-04-12T16:42:46+5:30
केडगाव पोटनिवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर करून मतदारांना प्रलोभन दाखवले. भाजपने मात्र लोकशाही मार्गाने निवडणूक लढवली, परिणामी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे सांगत खासदार दिलीप गांधी यांनी केडगाव हत्याकांडाचा निषेध व्यक्त केला.
अहमदनगर : केडगाव पोटनिवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर करून मतदारांना प्रलोभन दाखवले. भाजपने मात्र लोकशाही मार्गाने निवडणूक लढवली, परिणामी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे सांगत खासदार दिलीप गांधी यांनी केडगाव हत्याकांडाचा निषेध व्यक्त केला.
भाजपने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण, धरणे आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गांधी बोलत होेते. केडगावमध्ये झालेले दुहेरी हत्याकांड, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेला हल्ला या दोन्ही घटना निषेधार्थ आहेत. नगरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात असे कृत्य घडते ही खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचाही या घटनेशी संबंध असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले होते, यावर गांधी यांनी याचा इन्कार करत अशा फोल वक्तव्याची आम्ही दखल घेत नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. या घटनेत भाजपचेही आमदार अटकेत आहेत, असे विचारता, त्यांना अटक नव्हे, तर ते स्वत: पोलिसांत हजर झाले आहेत. पोलीस योग्य तो तपास करतील, त्यानंतर ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होणारच आहे, असा विश्वास गांधी यांनी व्यक्त केला.