जगण्याची ओढ आम्हा मरु देत नाही; लोणीव्यंकनाथच्या माळावर उतरलेल्या वडार समाजाच्या जिद्दीला सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 07:07 PM2017-12-06T19:07:57+5:302017-12-06T19:10:43+5:30
‘यांत्रिकीकरणामुळे वडार समाजाचे पाटा-वरवंटा घडविण्याचे काम थांबले. माती काम संपले. विहीर खोदाईचे काम आटले आणि अवघा संसार उघड्यावर आला. पोटासाठी रोज एक गाव तुडविण्याची वेळ आली. त्यामुळे मुलेही शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिली. समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. पण जगण्याची ओढ मरु देत नाही’, आवंढा गिळत सुनीता पवार सांगत होत्या.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : ‘यांत्रिकीकरणामुळे वडार समाजाचे पाटा-वरवंटा घडविण्याचे काम थांबले. माती काम संपले. विहीर खोदाईचे काम आटले आणि अवघा संसार उघड्यावर आला. ऊन, वारा, थंडीचा मारा झेलू लागला. पोटासाठी रोज एक गाव तुडविण्याची वेळ आली. त्यामुळे मुलेही शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिली. श्रमाला देव मानणा-या वडार समाजाच्या रोजगारावर यांत्रिकीकरणाचा वरवंट फिरला. समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. पण जगण्याची ओढ मरु देत नाही’, आवंढा गिळत सुनीता पवार सांगत होत्या.
लोणीव्यंकनाथ-हंगेवाडी परिसरातल्या उघड्या-बोडख्या माळरानावर वडार समाजातील १५ कुटुंबाचा काफिला उतरला आहे. त्यातीलच या सुनीता पवार. ‘लोकमत’ने या कुटूंबाला कोठून आलात, कोठे चाललात असे विचारले तर सुनीता पवार, लक्ष्मण पवार, मनोज पवार त्यांची कहाणी सांगू लागले. ते मुळचे कर्जत तालुक्यातील मिरजगावचे. पोटासाठी हाताला मिळेल या आशेने ते लहान मुलांसह लोणीव्यंकनाथ-हंगेवाडी परिसरात आले. वाढती बेकारी व बेरोजगारीने त्यांचा संसार उघड्यावर आणला आहे.
मिरजगावात वडार समाजाची संख्या मोठी आहे. बहुतेक कुंटूबांना गावात स्वत:चा निवारा नाही. फक्त मतदानकार्ड, आधारकार्ड आणि रेशनकार्ड आहे. गावात काम नाही. त्यामुळे या कुंटुबांना हाताला काम शोधत वर्षातील आठ महिने राज्यभर भटकावे लागते. पोटाची लढाई लढता लढता मुलांचे भविष्य उद्धवस्त होत असल्याची खंत सुनीता पवार यांनी व्यक्त केली. आमच्या १५ कुटूंबात ३६ मुले आहेत. शासनाचा शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आमच्यापर्यंत सर्व शिक्षा अभियानाची टीम पोहचत नाही, असे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत.
आमची मुलं जून ते नोव्हेंबर या महिन्यात मिरजगावला शाळेत जातात. नंतर आठ महिने आमच्या मागे भटकंती करतात. त्यामुळे हातात लेखणीऐवजी टीकाव अन् फावडे येते़ हाताला फोड येतात. फुटतात. येथूनच सुरु होतो, त्यांचा वेदना पचवण्याचा प्रवास. पुढे काहीजण व्यवसनाच्या आहारी जातात. टीकेचे धनी होतात. पण त्यांच्या वेदना, त्यांचा वनवास कोणाला कळला आहे का, असा सुन्न करणारा प्रश्न मनोज पवार उपस्थित करतो.
मुल शिकली पाहिजेत
माझे शिक्षण पाचवीपर्यंत पुण्यात झाले आणि वडिलांनी रामदास पवार यांच्याशी विवाह लावून दिला. आम्ही पोटासाठी भटकतो. मुलं थंडी, वा-यात आमच्याबरोबर कुडकुडतात. पोटात तुटते. पण काय करणार? आमच्या मुलांना शासनाने शिकविले पाहिजे एवढीच इच्छा आहे, असे सुनीता पवार यांनी सांगितले.
... तरच पुढची पिढी जगेल
आम्हला ना जमीन-जुमला, ना इमला. कष्ट करणे आणि जीवन जगणे हेच आमच्या प्राक्तनात लिहिलेले आहे. रोजगाराचे मार्ग बदलले आहेत. आता मुलांना शिक्षण मिळाले तरच पुढची पिढी तरू शकते, असे मनोज विठ्ठल पवार म्हणाले.
पाच-सहा हजाराला मिळणारे गाढव आता पन्नास हजाराला झाले आहे. त्यामुळे महागाचे गाढव घेऊन माती वाहने परवडत नाही. यांत्रिकीकरणामुळे तो धंदाही संपला. गाढव आमची लक्ष्मी आहे. पण ती पुजायलाही मिळत नाही.
-लक्ष्मण पवार