आम्हाला तर दररोज पोटाची निवडणूक लढवावी लागते, रखरखत्या उन्हात दगड घडविणाऱ्यांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 05:41 PM2024-04-23T17:41:11+5:302024-04-23T17:42:20+5:30
७५ वर्षीय आजोबा सखाराम सुरे ४१ अंश तापमान असताना भर दुपारी रखरखत्या उन्हात दगड घडवीत असताना बोलत होते.
टाकळी ढोकेश्वर (जि. अहमदनगर) (बबनराव गायके) : बाबा, ‘लोकसभा निवडणुकीचं काय?’ असा प्रश्न विचारला असता ‘आम्हाला तर दररोज पोटाची खळगी भरण्यासाठी पोटाचीच निवडणूक लढवावी लागते. ७५ वर्षीय आजोबा सखाराम सुरे ४१ अंश तापमान असताना भर दुपारी रखरखत्या उन्हात दगड घडवीत असताना बोलत होते.
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील महात्मा फुले चौकात एका पालात अख्खं कुटुंब दगड घडवून त्यापासून पाटा, वरवंटा, दगडी उखळ, जाते, जुनी काळ्याकभिन्न दगडातून तयार होणारी घरगुती वापराची साधने घडवीत होते. येथील सखाराम सुरे यांचे अख्खे कुटुंब भर उन्हातही काम करत होते. त्यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला.
रात्रीच्या वेळी ग्रामपंचायतीच्या खांबाच्या लाईटचा आधार, प्लास्टिकच्या कापडापासून तयार केलेले पाल हेच या कुटुंबाचे रस्त्यावरचे घर होते. वादळ वारा, थंडी, ऊन पाऊस, वावटळ सहन करण्याची क्षमता गेल्या पन्नास वर्षांपासून माझ्यातच आली. पंधरा वर्षांचा असल्यापासून दगड घडवीत आहे. दमलो नाही. थकलो नाही. आताही पंचाहत्तरी गाठली. मात्र अद्यापही माझ्यात ऊर्जा आहे. थोडे कमी दिसते. कमी ऐकू येते. चाळीसगाव (जि.जळगाव) येथे दगडाच्या खाणीत स्वतःच्या हाताने खडकाचा काही भाग तोडून दगडाचे साचे तयार केले. ते साचे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन दगड घडवून वेगवेगळे आकार करून संसार उपयोगी साधने आम्ही करतो. फक्त पावसाळ्यात आम्हाला काम नसते.
दोन सिझन काम आम्ही करतो. मिक्सर, ज्यूसर व नवनवीन अत्याधुनिक साधनांच्या जमान्यात पाटा वरवंटा कोणीही घेत नाही. त्यामुळे मिळेल त्या किमतीत काबाडकष्टाने केलेल्या वस्तू नाईलाजास्तव विकाव्या लागतात. त्यामुळे कष्ट करून फक्त पोटच भरते. भविष्याची पुंजी हातात काही शिल्लक राहत नाही. शेती नाही, उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. घरात सात माणसे आहेत. कष्ट करूनच कुटुंबाचे भागवावे लागते.
सरकारी योजनांचा फायदाच नाही
पोटासाठी भटकंती असते. गरिबांसाठी शासकीय योजनांचे फायदे मिळत नाहीत. आमच्यासारख्यांना सरकारने काही तरी करणे गरजेचे आहे. कालपासून एकही ग्राहक नाही. पण परंपरागत व्यवसाय आहे तो सोडायचा नाही, अशा सत्तरीतील द्रोपदाबाई सुरे व्यथा मांडत होत्या. मतदान करण्यासाठी मात्र गावाला अवश्य जाणार असल्याचे सखाराम सुरे यांनी सांगितले. त्यांची दोन्ही मुले त्यांना साथ देत आहेत.