श्रीगोंदा में बेहत्तर इंन्सानियत हमने देखी..!; उत्तरप्रदेशातील युवकाच्या भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:41 PM2020-05-11T12:41:03+5:302020-05-11T12:41:58+5:30
लॉकडाऊनमध्ये आम्ही पायी उत्तरप्रदेशकडे जात असताना निमगाव खलू चेक पोस्टवर पकडलो गेलो. त्यावेळी खूप घाबरलो. पण श्रीगोंदा येथील निवारा केंद्रात आम्हाला घरच्यासारखे प्रेम दिले. भोजन दिले. मैने इंन्सानियत किताब पढी थी.. लेकीन उससे बेहत्तर इंन्सानियत हमन श्रीगोंदा हमने देखी.. अशी भावना उत्तरप्रदेशातील युवक मोहम्मद आसिफ यांंनी व्यक्त केली.
बाळासाहेब काकडे/
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : लॉकडाऊनमध्ये आम्ही पायी उत्तरप्रदेशकडे जात असताना निमगाव खलू चेक पोस्टवर पकडलो गेलो. त्यावेळी खूप घाबरलो. पण श्रीगोंदा येथील निवारा केंद्रात आम्हाला घरच्यासारखे प्रेम दिले. भोजन दिले. मैने इंन्सानियत किताब पढी थी.. लेकीन उससे बेहत्तर इंन्सानियत हमन श्रीगोंदा हमने देखी.. अशी भावना उत्तरप्रदेशातील युवक मोहम्मद आसिफ यांंनी व्यक्त केली. यावेळी आसिफ याला डोळ्यातील आनंदाश्रू लपविता आले नाहीत.
मोहम्मद असीफ हा मूळ उत्तरप्रदेशमधील आहे. तो पुणे येथे आयटीचे प्रशिक्षण घेत आहे. पुण्यावरून तो व त्याचे सहकारी मित्र दौंडला पायी आले.परंतु त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू चेक पोस्टवर पोलिसांनी पकडले. पोलिसांनी त्यांना श्रीगोंदा येथील महानिवारा केंद्रात आणले होते.
मोहम्मद असिफ पुढे म्हणाला, पोलिसांनी पकडले. त्यावेळी आम्ही खूप घाबरलेले होतो. प्रशासनाने महादजी शिंदे विद्यालयात आमची घराच्यासारखी व्यवस्था केली. चहा, नाष्टा, जेवण वेळेवर आणि पिण्यास फिल्टर पाणी होते. तहसीलदार महेंद्र महाजन साहेब व इतरांनी आमची आस्थेने विचारपूस करीत होते. जेवण बनविणारे खूपच चांगली माणसे होती. या ठिकाणी पापा, माँ सारखे प्रेम मिळाले. भविष्यात कुणावर संकट आले तर मी पुढच्या रांगेत उभा राहील व माझे कर्तव्य बजावेल. ही शिकवण येथे मिळाली आहे. देवाच्या रुपाने काम करणारे प्रशासकीय अधिकारी, येथील नागरिकांना माझा आदरपूर्वक सलाम आहे.
६४४ मजूर लखनऊला रवाना
लॉकडॉऊनमुळे श्रीगोंदा तालुक्यात अडकलेले सुमारे साडेसहा हजार नागरिक अडकले होते. त्यामध्ये उत्तरप्रदेश राज्यातील ६४४ मजूर होते. रविवारी (दि.१० मे) तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या उपस्थितीत १३ बस करून त्यांना नगरला रेल्वे स्टेशनवर पाठविण्यात आले. हे विशेष रेल्वेने लखनऊला रवाना झाले. या सर्व मजुरांना फूड पॅकेट, पाणी, बिस्कीट, भेळ देण्यात आली. यावेळी तहसीलदार महेंद्र महाजन, निवासी तहसीलदार डॉ. योगिता ढोले, श्रीगोंदा आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे, पुरवठा विभागाचे दत्तात्रय सांळुके, मंडलाधिकारी प्रशांत कांबळे, तलाठी कृष्णा गुजर, गणेश मुसळे, रवी लष्करे यांनी त्यांना निरोप दिला.