शूरा आम्ही वंदिले! :देश गौरवा लावली जीवाची बाजी, शहीद अरूण कुटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:51 PM2018-08-18T15:51:28+5:302018-08-18T15:55:42+5:30
छातीत दोन गोळ्या लागलेल्या, जीव जाणार हे पुरते कळलेले तरीही अरूण कुटे यांच्या हातातील शस्त्र खाली पडले नाही. त्यातून गोळ्या सुटतच होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तानाजीचा अवतारच जणू!
छातीत दोन गोळ्या लागलेल्या, जीव जाणार हे पुरते कळलेले तरीही अरूण कुटे यांच्या हातातील शस्त्र खाली पडले नाही. त्यातून गोळ्या सुटतच होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तानाजीचा अवतारच जणू!
पारनेर शहरपासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावर वडनेर हवेली गाव आहे़ तेथील बबनराव कुटे व शांताबाई कुटे या शेतकरी दांपत्याला चार मुले. सुनील, अरूण, संजय व भाऊसाहेब. घरची परिस्थिती बेताचीच. पण तरीही मुलांना शिकवायचेच असा बबनराव व शांताबाई यांचा ध्यास होता़ सर्वांचे शिक्षण पारनेर येथेच सुरू होते़ अरूणला लहानपणापासूनच सैन्यात जाण्याचेच वेड होते़ त्यामुळे अरूण थेट वडनेर हवेली ते पारनेर असा प्रवास धावत करत असे. त्याशिवाय व्यायामाचेही वेड त्याने लावून घेतले होते. सेनापती बापट विद्यालयात दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने भरतीसाठीच प्रयत्न केले़ मित्रांबरोबर तो नागपूर येथे भरतीसाठी गेला़ पहिल्याच प्रयत्नांत शारीरिक चाचणीत यशस्वी होउन चार जानेवारी २००१ मध्ये तो भरती झाला़ त्याला प्रशिक्षणासाठी बेळगाव येथे पाठवण्यात आले़
कुटुंबाने वाटले पेढे
अरूण सैन्यदलात भरती झाल्याने कुटुंबाने गावात पेढे वाटले़ आपला मुलगा देशसेवेसाठी जात आहे याचा आनंद आई-वडिलांना होता़ मुलगा भरती झाला म्हटल्यावर घरच्यांनी लगेच त्याचा विवाह करण्याचे ठरवले व दोन-तीन मुलीही पाहिल्या़ मात्र सुट्टीवर आल्यावर अरूणने सध्या आपण देशसेवेसाठीच लक्ष देणार आहे, काही काळ सेवा केल्यानंतर लग्नाचा विचार करू असे आई वडिलांना निक्षून सांगितले़ देशप्रेमाच्या त्याच्या भावनेत सध्या तरी कोणालाही स्थान नव्हते. राजस्थानसह देशभरात त्याने अनेक ठिकाणी सेवा केली़ प्रत्येक ठिकाणी तो त्याच्या हसूनखेळून राहण्याच्या स्वभावामुळे प्रसिद्ध होत असे.
पूंछ-राजौरी भागात नियुक्ती
काश्मीरमधील पूंछ-राजौरी भागात पाकिस्तानी अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या होत्या़ भारतीय लष्कराने याठिकाणी आणखी सैन्यदल वाढवण्याचा निर्णय घेतला़ या निर्णयानुसार अरूणसह अनेक जवान राजस्थानवरून पूंछ-राजौरीत पाठवण्यात आले. उंच डोंगराच्या बर्फाळ प्रदेशात तंबू टाकून दररोज सीमारेषेचे रक्षण करण्याचे काम सुरू केले़ एकीकडे देशात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू असताना अरूण व त्यांचे सहकारी जवान देशाच्या पूंछ-राजौरी भागात पाकिस्तानी अतिरेक्यांपासून देशाचे रक्षण करण्याचे काम करीत होते़
सगळे गाव शोकाकुल
चार दिवसांनी अरूण यांचे पार्थिव वडनेर हवेली येथे आणण्यात आले़ यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत पारनेरसह परिसरातील गावांमधून लोक आले होते़ भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अरूण कुटे अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता़ गावातील युवकांनी एकत्र येऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला़ गावाला त्याची आठवण रहावी यासाठी त्यांचे स्मारक तयार करण्याचा विचार पुढे आला. अरूणचे वडील व भावांनीही चांगली साथ दिली़
लोकवर्गणीतून स्मारक
लोकवर्गणीतून पारनेर- म्हसणेफाटा रस्त्यावर वडनेर हवेली रोडवर शहीद जवान अरूण कुटे यांचे चांगले स्मारक उभारले आहे़ त्याचापंचधातूचा अर्धपुतळा आहे़ मध्यंतरी हा पुतळा चोरीला गेला, मात्र नंतर चोरट्यालाही लाज वाटली असावी. त्यानेच तो पुतळा गावात एका ठिकाणी ठेवून दिला. अरूणच्या स्मरणार्थ गावात दरवर्षी सप्ताह आयोजित होतो व त्यात धार्मिक कार्यक्रम होत असतात.
दोन गोळ्या लागूनही अतिरेक्यांशी झुंज
स्वातंत्र्यादिनाच्या कार्यक्रमानंतर पूंछ -राजौरी भागात पाकिस्तानी अतिरेकी घुसखोरी करून भारतीय सैन्यतळावर हल्ला करणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाला समजली. त्यामुळे अरूणसह इतर जवानांकडे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. सगळीकडे टेहळणी पथके तयार करण्यात आली. रात्रीच्या अंधारात बॅटऱ्या लावून लक्ष ठेवले जात असतानाच १९ आॅगस्ट २००३ ला एका बाजूकडून पाकिस्तानी अतिरेक्यांकडून गोळीबार सुरू झाला़ अरूण व त्यांच्या सहकाºयांनी लगेच अतिरेक्यांना प्रत्युत्तर देत गोळीबार केला़ काही अतिरेकी पळून गेले. मात्र त्यांचा हल्ला नियोजनबद्ध होता. लगेच दुसरा गट दुसºया बाजूने सक्रिय झाला़ त्यांच्यावरही भारतीय सैन्याच्या तुकडीने हल्ला चढवला. अरूण त्यात अग्रभागी होता. तुफान गोळीबार सुरू होता. त्यातच दोन गोळ्या अरूणच्या छातीत घुसल्या. तरीही त्याने हातातील शस्त्र खाली पडू दिले नाही. त्याच्या मशिनगनमधून गोळ्यांची फैर निघतच राहिली. मग मात्र एका अतिरेक्याने त्याला बरोबर टिपले. देशासाठी अरूण शहीद झाला.
- शब्दांकन : विनोद गोळे