शूरा आम्ही वंदिले! : पाकिस्तानला धूळ चारणारा योद्धा, नायक एकनाथ कर्डिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:46 PM2018-08-13T12:46:12+5:302018-08-14T09:00:00+5:30
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात एकनाथ कर्डिले यांनी साहसी पराक्रम गाजवला.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात एकनाथ कर्डिले यांनी साहसी पराक्रम गाजवला. बांगलादेशातील घनघोर लढाईत त्यांनी चमकदार कामगिरी केली. शत्रूच्या रणगाड्यांचा मारा पावसाच्या जोरदार सरीसारखा चालू असताना देखील आपल्या सैन्याचा बचाव करण्यासाठी ते शत्रूचा रणगाडा बंद करण्याचे काम करत होते. मात्र हे करताना शत्रूच्या माऱ्याने त्यांची पुरती चाळण झाली होती. त्यांच्या या बहादुरीमुळे अनेक सैनिकांचा जीव वाचला. पण ते स्वत:ला वाचवू शकले नाहीत. आपले सैन्य वाचवता वाचवता ते शहीद होऊन देशाच्या कामी आले.
गर तालुक्यातील बु-हाणनगर हे जगदंबा देवीच्या आशीर्वादाने पुनीत झालेले गाव. गावात देवीचे मोठे मंदिर आहे. हे गाव पहिलवानांसाठीही अनेकांच्या परिचयाचे आहे. ३० ते ४० वर्षांपूर्वी या गावात अनेक नामवंत पहिलवान होते. गावातील शेतकरी कुटुंबातील महिपती कर्डिले हे देखील कुस्तीचे शौकिन. आपल्या मुलांनी पहिलवानकी करावी अशी त्यांची सतत इच्छा असायची. झालेही तसेच. त्यांचे पुत्र एकनाथराव लहानपणापासून कुस्तीकडे वळले. जोर-बैठका मारायच्या आणि कुस्ती खेळायची असेच त्यांचे बालपण होते.
सन १९६० मध्ये त्यांचा विवाह नेवासा तालुक्यातील कौसाबाई यांच्याशी झाला. त्यांच्यात खरे तर १० वर्षांचे अंतर. पण कौसाबाई यांचे वडील दशरथराव मोरे हे देखील कुस्तीचे शौकिन, म्हणून महिपती कर्डिले आणि त्यांच्यात दोस्ती होती. हीच दोस्ती नंतर नात्यात परावर्तित झाली. मोरे यांची कन्या कर्डिले यांच्या घरात आली. एकनाथराव यांचे कुस्तीवरील प्रेम सुरूच होते. ते घरात सर्वात लहान त्यामुळे सर्वांचे लाडके होते. चरवीभर दूध, खारीक खोब-याचा लाडू, बदाम असा त्यांचा पौष्टिक आहार होता. खरे तर त्यांना फक्त कुस्तीच खेळायची होती, मात्र घरच्यांनी त्यांचा विरोध असताना देखील त्यांचा विवाह करून दिला. यामुळे एकनाथराव काहीसे नाराज झाले होते. त्यांना या गोष्टीचा राग आला होता. याच रागाच्या भरात त्यांनी लष्करात भरती होण्याचे ठरविले. पिळदार शरीरयष्टी, धष्टपुष्ट आणि उंच बांधा असल्यामुळे त्यांचे घर सोडून सैन्यात जाणे त्यांच्या आईला खूप जिव्हारी लागले. काही दिवसांतच एकनाथराव यांचे मातृछत्र हरपले. पत्नी कौसाबाई खूप लहान होत्या. पण एकनाथरावांनी आपली इच्छा पूर्ण केलीच. अखेर ते सैन्यात भरती झाले. त्यांना नंतर दोन अपत्ये झाली. संसार सुरु झाला होता. पहिला मुलगा संजय आणि दुसरी मुलगी सरला. त्यांचा संसार असा सुखाचा सुरु होता. देशसेवेतून निवृत्त होण्यास आता फक्त तीन वर्षे उरली होती. सैन्यात असताना त्यांनी एकदाही आपल्या पत्नीला आपल्या सोबत नेले नव्हते. यामुळे आता सेवा संपत आल्याने आपले वडील, पत्नी, मुलांना घेऊन एकदा फिरवून आणावे आणि सेवानिवृत्ती घ्यावी असा विचार त्यांच्या डोक्यात होता. सरला ही त्यांची कन्या जेमतेम ६ महिन्यांची असताना ते परत हजर होण्यासाठी सैन्यात गेले. सरलाचा जन्म झाल्यानंतर एकनाथराव यांची बढती होऊन त्यांना नाईक हा हुद्दा मिळाला. त्यामुळे ते सतत म्हणत ‘माझी सरला लक्ष्मी आहे.’ ते आपल्या पत्नीला नेहमी म्हणत, ‘मी सैन्यातून निवृत्त झाल्यावर आपण छोटेसे घर बांधू, मुलांच्या भविष्याकडे लक्ष देऊ, आतापर्यंत तुला संसाराचे सुख देता आले नाही ते आता यापुढे देईल.’
एकनाथराव आपली राहिलेली सेवा पूर्ण करण्यासाठी सैन्यात रूजू झाले. बेळगाव, आसाम, जम्मू काश्मीर, नागालँड, चंदिगड या विविध ठिकाणी त्यांनी सेवा केली. या सर्व ठिकाणी त्यांनी आपली धमक दाखवली. शत्रूवर अनेकदा चढाया करून त्यांनी देशाचे रक्षण केले होते. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना अनेक पदके आणि सन्मान मिळाले. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी साहसी पराक्रम गाजवला. बांगलादेशातील घनघोर लढाईत त्यांनी चमकदार कामगिरी केली. शत्रूच्या रणगाड्यांचा मारा पावसाच्या जोरदार सरीसारखा चालू असताना देखील आपल्या सैन्याचा बचाव करण्यासाठी ते शत्रूचा रणगाडा बंद करण्याचे काम करत होते. मात्र हे शौर्य गाजवत असताना त्यांच्या शरीराची पुरती चाळण झाली होती. त्यांच्या या बहादुरीमुळे अनेक सैनिकांचा जीव वाचला. पण ते स्वत:ला वाचवू शकले नाहीत. आपले सैन्य वाचवता वाचवता ते स्वत: मात्र देशाच्या कामी आले. त्यांना या यु्द्धात वीरमरण आले.
एकनाथराव यांना भारत-पाक लढाईत वीरमरण आले ही बातमी त्यांच्या मूळ गावी म्हणजे बु-हाणनगर येथे खूप उशिरा समजली. त्या काळात तातडीच्या बातम्या या तार संदेश यंत्रणेमार्फत कळवल्या जात होत्या. गावात तार आली. पण इंग्रजी भाषेत होती आणि इंग्रजी वाचणारा कोणीच नव्हता. त्यामुळे काहीच समजायला तयार नव्हते. शेवटी गावात असणाºया एका परिचारिकेला इंग्रजी येत असल्याचे कळले. तिला तार वाचण्यासाठी देण्यात आली. सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. परिचारिकेने तार वाचायला सुरुवात केली आणि एकनाथराव यांच्या वीरमरणानंतर तब्बल १३ दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी त्यातून साºयांना कळाली. कौसाबाई यांना तर ही बातमीच खरी वाटली नाही. आपले धनी नक्की परत येतील याचा त्यांना विश्वास होता. त्यांचे पार्थिव घरी आणलेच नाही. त्यामुळे या बातमीवर त्यांचा विश्वास बसणे कठीण होते. एकनाथराव यांचा अंत्यविधी सैन्यदलातील सैनिकांनीच केला. इकडे कौसाबाई मात्र माझे धनी नक्की येतील, अशी भाबडी आशा घेऊन बसल्या होत्या. नंतर मात्र त्यांचे सांत्वन करण्यासाठी सैन्यातील लोक घरी येऊ लागले. त्यावेळी त्यांना या बातमीचे गांभीर्य कळू लागले. सुखी संसाराचे स्वप्न पाहत असताना त्यांचा संसार अर्ध्यावर मोडला होता. त्यावेळी संजय हा अडीच वर्षांचा आणि सरला अवघी ९ महिन्यांची होती. एकनाथराव वर्षातून एक-दोन महिने सुट्टीवर येत. या दोन महिन्यांच्या आठवणी घेऊन कौसाबाई वर्षभर दिवस काढत. आतातर ही वाट पाहणे बंद झाले होते. कौसाबाई यांना घरच्यांनी धीर दिला. त्यांनी मोठ्या जिद्दीने मुलांना वाढवले. आता मुलगा संजय पाटबंधारे खात्यात नोकरीस लागला होता. मुलगी अंगणवाडी सेविका झाली. पण त्यांना आपल्या शूर वडिलांचा चेहराच आठवत नाही. पुढे मुलगा संजय यांचे अपघाती निधन झाले पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, नातवाकडे पाहून त्यांनी यातून स्वत:ला सावरले.
मरणोत्तर वीरचक्र पदकाने सन्मान
एकनाथराव यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल त्यांचा मरणोत्तर वीरचक्र या मानाच्या पदकाने सन्मान करण्यात आला. तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांनी हे पदक स्वीकारले़ त्यांचे स्मारक बु-हाणनगर येथे उभारण्यात आले.
दोन महिन्यांचे मंगळसूत्र
कौसाबाई सांगतात माझ्या गळ्यात फक्त एक काळी पोत होती. तेव्हा एकनाथराव यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी मोडून मला एक तोळ्याचे मंगळसूत्र केले. पण माझे हे पहिले मंगळसूत्र खूप दिवस घालता आले नाही. दोन महिन्यांतच त्यांना वीरमरण आले. यामुळे मला ते कायमचे काढून टाकावे लागले.
पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या...
प्रिय श्रीमती कौशल्या,
मागील आठवड्यात आपल्या राष्ट्राने स्वातंत्र्यावर आणि गौरवावर आलेले आव्हान परतून लावले. कारण आपली जनता निश्चयी आणि एकत्रित होती. परंतु आपले युद्धातील यश हे मुख्यत्वे आपल्या भूदल, नौदल, हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलातील जवानांच्या धैर्य आणि शौर्यामुळे होते. त्यांनी सिद्ध केले की, केवळ बलिदानानेच स्वातंत्र्य सुरक्षित ठेवले जाऊ शकते. आपल्या शूरवीरांनी आपल्या सध्याच्या आणि भावी पिढीसाठी अभिमान व गर्व आणला आहे. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचा धक्का सहन करावा लागला आहे. ही पोकळी कधीच भरून येणार नाही. मी तुमचे दु:ख, वेदना समजू शकते. मी हे पत्र हुतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी, माझी तीव्र सहानुभूती तुमच्या प्रती व्यक्त करण्यासाठी आणि तुम्ही या जगात एकाकी नाहीत हे दर्शवण्यासाठी लिहित आहे. संपूर्ण भारतातील जनता तुमच्या दु:खात सहभागी आहे. या दु:खाच्या सत्वपरीक्षेच्या काळात तुमचे दु:ख कमी करण्यासाठी आमच्या केंद्र आणि राज्य शासनाने काही योजना सुरु केल्या आहेत. जर तुम्हाला या योजनेसंदर्भात काही विशेष अडचणी असतील किंवा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विलंब होत असेल तर कृपा करून मला कळवा. या योजनेच्या अंमलबजावणीची आपण वाट पाहत असाल तरी मला आवर्जून कळवा. ज्या जवानांनी देशासाठी प्राण वेचले त्यांच्या कुटुंबांना मदत करणे आमच्या सिटीझन सेन्ट्रल कौन्सिलची जबाबदारी आहे. - आपली विश्वासू, इंदिरा गांधी, पंतप्रधान, भारत सरकार
शब्दांकन : योगेश गुंड