शूरा आम्ही वंदिले! : १९७१ च्या युध्दातील हिरो, गंगाधर कोहोकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 04:45 PM2018-08-18T16:45:20+5:302018-08-18T16:47:31+5:30
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पत्र आलं. आपले पती गंगाधर कोहोकडे हे देशाचे रक्षण करताना शहीद झाले आहेत. त्यांच्या निस्सीम देशसेवेचा आदर्श नेहमी राहील़
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पत्र आलं. आपले पती गंगाधर कोहोकडे हे देशाचे रक्षण करताना शहीद झाले आहेत. त्यांच्या निस्सीम देशसेवेचा आदर्श नेहमी राहील़ आपल्या पतींनी केलेल्या देशसेवेला सलाम़ आपल्या घरातील दोन व्यक्तींना शासनाच्या वतीने नोकरी देण्यात येईल़ आधी ते शहीद झाल्याची तार मिळाली आणि नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पत्राने पती आपले देशसेवेसाठी शहीद झाल्याचं पत्नी शशीकला यांना कळालं. पण अंत्यविधीसाठी त्यांचं पार्थिवही मिळालं नाही़
रनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील रामा कोहोकडे यांच्या कुटुंबात गंगाधर यांचा जन्म झाला़ रामा कोहोकडे यांना सोळा एकर शेती होती़ त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता़ आई, वडील, एक भाऊ असं गंगाधर कोहोकडे यांचं कुटुंब़ पाचवीपर्यंत शिकल्यानंतर त्यांनी सैन्यात भरती व्हायचा ध्यास घेतला. त्याप्रमाणे सैन्यात भरतीही झाले़ भरती झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत त्यांचा विवाह निंबवी येथील शशीकला बाळकृष्ण शिर्के यांच्याशी १९६८ मध्ये झाला.
१९६७ मध्ये भारत-पाक युद्ध झाल्यानंतर देशभरात सगळीकडे सैन्यदलात बदल करण्यात आले होते़ शिवाय सैनिकांना वर्षातून दोनदा मिळणाऱ्या सुट्ट्या रद्द करून थेट वर्ष-दोन वर्षांनंतर सुट्ट्या देण्यात येत होत्या़ या फेरबदलात नारायणगव्हाण येथील जवान गंगाधर कोहोकडे यांना जम्मू-काश्मीर सीमेवर बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते़ त्यांनी तिथं अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. आपलं सर्वस्वच देशसेवेसाठी अर्पण केल्याचं ते नेहमी घरी सांगत असायचे.
दरम्यान १९७० साली भारत-पाकिस्तान सीमेवर सतत दोन्ही सैनिकांमध्ये संघर्ष होत होता़ कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी परिस्थिती भारत-पाकिस्तान व भारत - पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) सीमेवर निर्माण झाली होती़ त्यामुळे सैनिकांच्या सर्व सुट्ट्या रद्द करून जवानांना तत्काळ युनिटमध्ये पाचारण करण्यात आले़ पाकिस्तानमधून पूर्व पाकिस्तान वेगळा करुन बांगलादेशाच्या स्वतंत्र निर्मितीसाठी बांगलादेशाला सहकार्य करण्याची भूमिका भारतीय लष्कराने घेतली होती़
ते १९७१ चे साल होते़ गंगाधर बैलपोळ्यासाठी सुट्टीवर आले होते़ साधारणत: वर्षभरानंतर ते घरी आले होते़ बैल पोळ्याचा सण झाला आणि त्यांना तार आली की तत्काळ ड्यूटीवर हजर व्हावे़ गंगाधर यांनी घर सोडलं आणि ड्यूटीवर हजर झाले़ नोव्हेंबर १९७१ मध्ये पाकिस्तानच्या पूर्व भागात गंगाधर यांच्यासह सुमारे तीन हजार जवानांची तुकडी पाठवण्यात आली होती़ त्याआधी गंगाधर यांचा पगार झाल्यानंतर त्यांनी तातडीने आपली पत्नी शशीकला यांना पगाराची मनिआॅर्डर पाठवली. शशीकला यांना ३ डिसेंबरला ती मनिआॅर्डर मिळाली़ त्याच दिवशी पूर्व पाकिस्तानजवळ भारत व पाकिस्तानी सैन्यामध्ये युद्ध सुरु झाले़ दिवसभर धुमश्चक्री होऊन पाकिस्तानी सैन्याचे तळ उद्ध्वस्त करण्यात भारतीय जवानांना यश आलं होतं. त्यामुळे सायंकाळी भारतीय लष्कराने पुढील कारवाई थांबवली होती़ दुसरा दिवसही पुन्हा युद्धानेच सुरु झाला़ सायंकाळपर्यंत पाकिस्तान बराच बॅकफूटवर गेला होता़ ४ डिसेंबर १९७१ रोजी गंगाधर व त्यांचे सहकारी रात्री जेवण करून पुन्हा गस्त घालण्यात व्यस्त होते़ ५ डिसेंबरच्या पहाटे चार वाजेपर्यंत सर्वत्र शांतता होती़ मात्र, चार वाजण्याच्या सुमारास अचानक भारतीय लष्कराच्या तळावरच पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला़ अंधाºया रात्रीत कुठून गोळीबार होतोय? हेच समजेनासे झाले. त्यामुळे भारतीय जवानांनी गोळीबाराच्या आवाजांच्या दिशेने फायरिंग सुरु केली़ गंगाधर कोहोकडे हे गनर असल्यामुळे फायरिंग करण्यात ते सर्वांच्या पुढे होते़ त्याचवेळी पाकिस्तानी सैन्याने थेट भारतीय सैनिकांच्या तळावरच बाँब फेकण्यास सुरूवात केली. अन् या बाँबहल्ल्यात नारायणगव्हाणचे गंगाधर कोहोकडे यांच्यासह अनेक भारतीय जवान शहीद झाले.
आमच्या हाती काहीच लागलं नाही
श्रावणातल्या पोळ्याला ते सुट्टी घेऊन आले होते़ तार मिळताच ते सैन्यात हजर झाले़ पुन्हा आलेच नाहीत़ ते शहीद झाले़ पण त्यांच्या अंत्यविधीसाठी घरच्या मंडळींना पार्थिवसुद्धा पहायला मिळालं नाही, असे सांगताना वयाची सत्तरी गाठलेल्या वीरपत्नी शशीकला यांचे डोळे पाणावले़ आमच्या हाताला काहीच लागलं नाही, असं त्या डोळे पुसतच सांगत होत्या.
वीरपत्नी शशीकला आजींचा खडतर प्रवास
घरी शेती असल्याने त्या घरी शेती करीत होत्या़ घरातील वाटणीत आठ एकर शेती होती़ त्यात कुकडी कालव्यासाठी पाच एकर गेल्याने अवघी तीन एकर शेती कोहोकडे यांना राहिली होती़ पती शहीद झाल्यावेळेस शशीकला या सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या़ तर सुनीता ही मुलगी अवघ्या दोन वर्षांची होती़ पतीच्या निधनाने आघात झालेल्या शशीकला यांना साथ देण्यासाठी त्यांची आई त्यांच्यासोबत बरीच वर्षे थांबल्या़ दुसरी मुलगी झाली़ तिचं नाव अनिता ठेवलं. शशीकला यांना अवघी दरमहा एकशे तीस रूपये पेन्शन तसेच केंद्र सरकारचे पाच हजार व राज्य सरकारचे पाच हजार असे दहा हजार रूपये मिळाले़ एकशे तीस रूपयांची दरमहा पेन्शन व शेती करीत शशीकला यांनी दोन मुलींना मोठं केलं़ सैन्यदलाकडून शशीकला यांना बोलावणं आलं होतं. शिवणकाम शिकवून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्याचे आश्वासन सैन्यदलाने त्यांना दिले होते़ परंतु वीरपत्नी शशीकला यांनी गावात, नारायणगव्हाणमध्येच राहणं पसंत केलं. या वीरपत्नीने वयाची सत्तरी ओलांडून ७१ व्या वर्षात पदार्पण केलंय. पण आजही त्या स्वत: शेतात काम करीत आहेत. मोठी मुलगी सुनीता निवृत्ती बढे या मुंबईत तर अनिता संतोष सात्रस या न्हावरा (पुणे) इथं असतात. अधूनमधून मुलींकडे जाऊन आल्यानंतर आपलं एकांगी जीवन त्या जगत आहेत.
गावातील रस्त्याला गंगाधर कोहोकडे यांचं नाव
१९७२ च्या सुमारास गावात शहीद जवान गंगाधर कोहोकडे यांचं स्मारक बांधण्याचा प्रयत्न काही ग्रामस्थांनी केला होता. पण जागेबाबत एकमत झालं नव्हतं. त्यामुळे स्मारक तसंच राहून गेलं. अलिकडच्या काळात सरपंच सुरेश बोºहुडे यांनी शहीद जवान गंगाधर कोहोकडे मार्ग असं नाव गावातील रस्त्याला दिलं आहे. गावातील शाळांमध्ये कोहोकडे यांच्या वीरगती दिनी विविध स्पर्धा घेतल्या जातात़ यानिमित्ताने सुरेश बोºहुडे मित्र मंडळाच्या वतीने शशीकला कोहोकडे यांचा गौरवही करण्यात आला.
- शब्दांकन : विनोद गोळे