शूरा आम्ही वंदिले! : कारगीलचा जिगरबाज अंकुश जवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:08 PM2018-08-13T15:08:57+5:302018-08-14T09:50:00+5:30
सैन्यातून निवृत्त होण्याला अवघे दोन महिने राहिलेले. शेती करण्याचा मानस घरच्यांबरोबर व्यक्त केलेला. अशा वेळी कोणीही, कसलाही धोका पत्करणार नाही,
सैन्यातून निवृत्त होण्याला अवघे दोन महिने राहिलेले. शेती करण्याचा मानस घरच्यांबरोबर व्यक्त केलेला. अशा वेळी कोणीही, कसलाही धोका पत्करणार नाही, पण अंकुश यांची गोष्टच निराळी. ते खरेखुरे जिगरबाज होते. धाडस त्यांच्या वृत्तीतच होते. शत्रूची गोळी एकदा कपाळाला स्पर्श करून गेली तरी त्यांना कशाचीही भीती वाटत नव्हती. त्यामुळे शत्रू वरून आग ओततोय व त्यांनी खालून गस्त घालण्याचे काम बिनधास्तपणे स्वीकारले.
कारगीलजवळचा लिंबू-लेह मार्ग. ३० आॅक्टोबर १९९९. कारगीलवरून पाकिस्तानने युद्ध पुकारलेले. युद्धभूमिवरची सगळी परिस्थिती त्यांना अनुकूल. भारतीय जवान खाली व पाकिस्तानी वरच्या बाजूला. पण अशा स्थितीला घाबरला तो भारतीय जवान कसला. अंकुश जवकही तसेच होते. निडर व बिनधास्त. वरिष्ठांनी त्यांच्या तुकडीला या मार्गावर गस्त घालण्यासाठी पाठवले. जोखमीचे काम, गाठ थेट प्राणांशीच, कारण वरून गोळी आली की थेट छातीचाच वेध घेणार.
गस्त घालत गोळीबार
ही सगळी माहिती असतानाही अंकुश व त्यांचे सहकारी गस्त घालण्याचे काम चोख बजावत होते. वरच्या बाजूने होणारा गोळीबार चुकवत त्यांना प्रत्युत्तर देत त्यांचे काम सुरू होते. पाकिस्तानी सैनिकांनी या भागात भू सुरूंग पेरून ठेवले होते. तेही पहावे लागत होते. ते सापडले की निकामी करायचे, वाट तयार करायची हेही काम करावे लागत होते. गस्त सुरूच होती. तेवढ्यात वरच्या बाजूने गोळीबार सुरू झाला. अंकुश व त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले.
भू सुरूंगाने घेतला घास
गोळीबार सुरू असतानाच भारतीय सैनिक पुढे जात होते. जात असताना भू सुरूंग पाहण्याकडे दुर्लक्ष झाले. अंकुशचा पाय बरोबर एका सुरूंगावर पडला. सेवेतून निवृत्त होण्यास अवघे दोन महिने शिल्लक असताना अंकुश जवक शहीद झाले. त्यांनी घरी आई अनुसुया ,पत्नी कल्पना व मुलगा सुदर्शन यांना शब्द दिला होता की आता घरी येऊन शेतीची, घराची सर्व कामे पाहणार. त्यामुळे घरचे खूश होते. वाट पहात होते. त्यांच्यावर अंकुश यांचे पार्थिव पाहण्याची वेळ आली.
देशासाठी शहीद
हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिरंग्यात लपेटलेले अंकुश यांचे पार्थिव रांजणगावमध्ये आणण्यात आले़ त्यावेळी जवक यांच्या कुटुंबाला शोक आवरत नव्हता. देशासाठी मुलगा शहीद झाला. क्वचितच कोणाच्या वाट्याला येते असे मरण त्याला मिळाले. त्यांच्या मरणावर शोक करणे म्हणजे शहीद असण्याचा अवमान करणे अशी त्यांची समजूत घालण्यात आली. अंकुश यांच्याकडून सैन्याच्या देशप्रेमाच्या गोष्टी ऐकणा-या त्यांच्या कुटुंबालाही हे पटले. अंकुश यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सैन्यात जाण्याचा ध्यास
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद हे अंकुश यांचे गाव़ तेथील शेतकरी दादाभाऊ जवक व अनुसुयाबाई जवक यांच्या कुटुंबात अंकुश यांचा १ जून १९६७ मध्ये जन्म झाला, अंकुश यांना दोन भाऊ व तीन बहिणी असा परिवार होता. अंकुश ६ महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अंकुश यांचे शिक्षण गावातील मराठी शाळेत व नंतर गावातील महाविद्यालयात झाले. गावातील अनेकजण सैन्यात होते. अंकुश यांनी सैन्यात जाण्याचा निर्णयच नव्हे तर ध्यास घेतला. पुण्यातील सैन्यभरतीमध्ये ३१ आॅक्टोबर १९९९ मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आपला मुलगा देशसेवेसाठी चाललाय याचा अनुसुयाबार्इंना अभिमान वाटला. रांजणगाव जवळीलच कल्पना खोसे यांच्याबरोबर अंकुश यांचा विवाह १९ मे १९८६ मध्ये झाला.
लान्सनायकपदी बढती
अंकुश यांनी विवाहानंतर आहे त्याच पदावर सैन्यात काम करण्याऐवजी आणखी परीक्षा देऊन पुढे जायचे असे ठरवले. १९८८ मध्ये त्यांची बदली राजस्थान मधील पोटा या ठिकाणी झाली. त्यांनी तेथेच लान्सनायकसाठी लष्कराची अंतर्गत परीक्षा दिली. ते परीक्षा पास होऊन लान्सनायक झाले. तीन वर्षे त्यांनी याच ठिकाणी सेवा केली. या दरम्यान त्यांना एक मुलगाही झाला. नंतर अंकुश हे आसाममधील गुवाहाटी भागात सेवेसाठी गेले.
स्मारक करायचे राहिलेच
अंकुश जवक शहीद झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने त्यांना मदत केली. सैन्यदलाच्या वतीनेही मदत झाली. ग्रामस्थांकडून अंकुश यांचे स्मारक गावात उभे रहावे यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र काही ना काही कारणाने ते मागे पडत गेले. नंतर ते राहूनच गेले. कल्पना जवक सध्या सुपा येथे राहतात़ मुलगा सुदर्शन हा पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करीत आहे तर पूजा बीसीएसचे शिक्षण घेऊन विवाह होऊन शिरूर येथे आहे़ आता गावातील शिक्षक शहीद दिनी गावात विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कार्यक्रम ठेवत असतात़ त्यादिवशी जिगरबाज अंकुश यांचे स्मरण केले जाते.
पाकिस्तानी अतिरेक्यांबरोबर लढा
सन १९९५ च्या दरम्यान काश्मीरमधील कारगील भागात पाकिस्तानी अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या होत्या़ त्यामुळे अंकुश यांच्यासह काही जवानांची टीम कारगील येथे पाठवण्यात आली़ तेव्हापासून ते तिथेच होते. उंचच उंच बर्फाळ डोंगरांच्या रांगात पाकिस्तानी अतिरेकी डोंगरावर व भारतीय सैन्य पायथ्याशी अशी परिस्थिती असताना अंकुश यांच्यासह भारतीय जवानांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले़ त्याची त्यांना सवयच झाली होती. त्यामुळेच त्यांच्यावर गस्त घालण्याचे काम सोपवण्यात आले होते. एकदा तर पाकिस्तानी अतिरेक्यांबरोबर युध्द करीत असताना एक गोळी अंकुश यांच्या कपाळाजवळून लागून गेली, त्यात ते जखमी झाले पण त्यांनी त्याही परिस्थितीत लढा देत दोन पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते.
शब्दांकन - विनोद गोळे