शूरा आम्ही वंदिले! : जब तक थी साँस लडे वो, बाबासाहेब वाघमारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 01:15 PM2018-08-16T13:15:37+5:302018-08-16T14:13:56+5:30
२३ नोव्हेंबर १९९९ सालची ती पहाट़ काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील मुच्छफनी गावात पहाटे ५ वाजता लष्कराची गस्त सुरु होती़ अचानक पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला.
२३ नोव्हेंबर १९९९ सालची ती पहाट़ काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील मुच्छफनी गावात पहाटे ५ वाजता लष्कराची गस्त सुरु होती़ अचानक पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. भारतीय जवानांनीही अतिरेक्यांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात अग्रभागी होते आपल्या जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील बाबासाहेब वाघमारे़ त्यांच्या बंदुकीने अनेक अतिरेक्यांचा वेध घेत त्यांना ठार केले़ काही अतिरेक्यांनी पळ काढला. अतिरेकी पळत असल्याचं पाहून बाबासाहेब वाघमारे यांनी अतिरेक्यांचा पाठलाग केला. त्यावेळी इतर सैन्य बरेच मागे राहिले होते़ हे अतिरेक्यांनी पाहिले आणि त्यांनी लपून बाबासाहेब वाघमारे यांच्यावर जोरदार गोळीबार केला़ त्या गोळीबारानं बाबासाहेब यांच्या डोक्याचा वेध घेतला. काही कळण्याच्या आत ते खाली कोसळले. ‘भारतमाता की जय’ म्हणत त्यांनी मृत्यूला कवटाळलं.
बायजामाता देवीच्या मंदिरामुळे पुनीत झालेलं नगर तालुक्यातील जेऊर हे गाव. नगरची जलदायिनी असणारी सीना नदी याच परिसरात उगम पावते. नगर-औरंगाबाद रस्त्यालगत मोठ्या लोकसंख्येचं हे गाव. गावाच्या आसपास लहान-मोठ्या अशा १२ वाड्या. याच गावातील मातीत भारतमातेचा एक शूर वीर जन्मला. त्याने देशाची सेवा करताना आपल्या प्राणाची आहुती दिली. तो शूर जवान म्हणजे बाबासाहेब वाघमारे.
जेऊर गावातील गुणाजी व सुभद्रा यांच्या संसारवेलीवर बाबासाहेब यांच्या रूपाने पराक्रमी, धाडसी, वीर बालकाने जन्म घेतला. बाबासाहेबांचा जन्म १५ जून १९७२ रोजी जेऊर गावात झाला. वडील गुणाजीराव हे देखील भारतमातेच्या रक्षणासाठी लष्करात होते. अनेक वर्षांची सेवा करून ते सेवानिवृत्त झाले. लष्करात जाऊन देशसेवा करण्याची या घराण्याची परंपराच होती. लहानपणापासून सीमेवरील लढाई, तोफगोळ्यांचा मारा, भारतीय जवानांच्या पराक्रमाच्या कथा बाबासाहेब ऐकत आले.
जेऊर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत व नंतर रयतच्या संतूकनाथ विद्यालयात बाबासाहेब यांचं शिक्षण झालं. परंतु लष्करात भरती होण्याची आस लागल्याने त्यांचं मन शिक्षणात रमत नव्हतं. त्यांचे दोन मित्र लष्करात भरती झाले होते. यामुळे बाबासाहेबांना कधी भरती होतोय, असं झालं होतं. त्यांचा सराव सुरु होता. जिथं लष्कर भरती असेल तिथं ते जाऊ लागले. याच प्रयत्नांना ५ डिसेंबर १९९४ ला यश आलं. ते नगर येथे झालेल्या भरतीत पात्र ठरले. त्यांचं प्र्रशिक्षणही नगरच्याच एमआयआरसीमध्ये झालं. त्यामुळे घरापासून खूप दूर आहोत, असं कधी त्यांना वाटलंच नाही. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांची पोस्टिंग होणार होती. त्यापूर्वी त्यांना एक महिन्याची सुट्टी मिळाली. सर्व मित्रांसोबत तसेच कुटुंबासोबत महिना घालवल्यानंतर ते पुन्हा सेवेत रूजू झाले. त्यानंतर बाबासाहेब यांना राजस्थानमधील गंगानगर येथे डिसेंबर १९९५ मध्ये पाठवण्यात आले.
भारत श्ाांंतताप्रिय देश असला तरी आपल्या शेजारील देश शांत नव्हते. आणि आपल्या देशात शांतता असावी असंही त्यांना वाटत नव्हतं. शेजारी राष्ट्राकडून काहीतरी कुरापती सुरूच होत्या. देशात घुसखोर पाठवून अशांतता निर्माण करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे सुरूच होते. पाकिस्तानने आपला चेहरा दाखवण्यास सुरुवात केली. निष्पाप लोकांचा बळी घेणे, भारताच्या लष्करी स्थानावर हल्ले करणं सुरु झालं. भारताने अनेकदा समज देऊनही सीमेवर असे प्रकार सुरूच होते.
भारतीय जवानांचा आता संयम सुटत होता. त्यांनी रणशिंग फुंकलं. २६ मे १९९६ पासून भारत-पाकिस्तान युद्धाला तोंड फुटलं. याच दरम्यान बाबासाहेब सुट्टीवर घरी आले होते. मात्र सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्याने ते पुन्हा सीमेवर परतले. ७ डिसेंबर १९९६ रोजी त्यांची बदली काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झाली. बडगाम हा उंच डोंगरदऱ्यांमध्ये विखुरलेला आणि वर्षातून ९ महिने बर्फाने अच्छादलेला भाग़ १ मीटरपेक्षा दूरचं दिसत नाही, इतक्या दाट धुक्यांनी झाकोळलेला हा प्रदेश घनदाट जंगलाने व्यापलेला आहे़ म्हणूनच पाकिस्तानातून आलेले अतिरेकी छुपे हल्ले करण्यासाठी या भागाचा वापर करीत.
२२ नोव्हेंबर १९९९ रोजी रात्री ३५ राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांची बडगाम जिल्ह्यातील मुछफनी या गावात गस्त सुरू होती. याच भागात भारतीय सैन्याची एक चौकी होती़ मात्र, हिमवर्षावामुळे हिवाळ्यात येथून सैन्य माघारी घेतले जात होते़ याचा फायदा उठवून पाकिस्तानी अतिरेक्यांनी या परिसराचा ताबा घेतला होता़ त्यामुळे या भागात लष्कराने पुन्हा गस्त सुरु केली होती़ बाबासाहेब यांच्यासह काही सैनिकांची एक तुकडी चौकीजवळून अतिरेक्यांची टेहळणी करीत होती़ बर्फाच्छादित डोंगरात घुसलेले अतिरेकी बाबासाहेब व त्यांच्या युनिटने टिपले. सर्व जवान डोळ्यात तेल घालून या भागात गस्त घालत होते़
२२ नोव्हेंबरची काळ रात्र संपून २३ नोव्हेंबरच्या पहाटेचे ५ वाजले होते़ काही तासांत सूर्यकिरणे पडणार होती. बाबासाहेब मोठ्या धाडसाने एक एक अतिरेकी शोधून यमसदनी धाडत होते. त्यामुळे चवताळलेल्या काही अतिरेक्यांनी भारतीय जवानांच्या चौकीवरच अचानक हल्ला केला. आपल्या सैनिकांनी लगेच प्रतिहल्ला चढवला. भारतीय जवानांनी आक्रमकपणे हल्ला करुन काही अतिरेक्यांना कंठस्नान घातले तर काही अतिरेक्यांनी पळ काढला. ते पळत असल्याचे पाहून बाबासाहेब यांनी रायफल्ससह अतिरेक्यांचा पाठलाग सुरु केला़ पळतापळताही ते अतिरेक्यांवर गोळीबार करायचे़ बाबासाहेब यांचे सहकारी मागे राहिले होते़ बर्फाळ डोंगरात अंधुकशा प्रकाशात बाबासाहेब अतिरेक्यांना शोधत होते़ त्याचवेळी लपलेल्या अतिरेक्यांनी बाबासाहेब यांच्यावर गोळीबार केला. त्या गोळीबाराने बाबासाहेब यांच्या डोक्याचा वेध घेतला. काही कळण्याच्या आत बाबासाहेब खाली कोसळले. ‘भारत माता की जय’ म्हणत त्यांनी मृत्यूला कवटाळले. अतिरेक्यांना कंठस्नान घालणारे बाबासाहेब धारातीर्थी पडले होते. दीड वर्षापूर्वीच त्यांचा विवाह शीलाबार्इंशी झाला होता अन् दीड वर्षातच त्यांचं कुंकू नियतीने पुसून टाकलं. बाबासाहेब धारातीर्थी पडल्याचे कळताच सा-या गावात बंद पाळण्यात आला. गावातील सर्व व्यवहार आपसूक बंद झाले. शीलाबार्इंचा जोडीदार लढता लढता कायमचा निघून गेला होता. रडूनरडून आटलेल्या डोळ्यात आता फक्त आठवणी उरल्या आहेत.
२१ फैरींची सलामी
२६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री बाबासाहेब यांचं पार्थिव तिरंग्यात लपेटून जेऊर गावात आणण्यात आलं. दुसºया दिवशी सकाळी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांची आई व पत्नी यांच्या रडण्याने हजारोंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. २१ बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. पाक अतिरेक्यांना सळो की पळो करून सोडणा-या एका शूर वीराचा अंत झाला होता. त्यांचा पराक्रम मात्र आजही अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.
शब्दांकन : योगेश गुंड