शूरा आम्ही वंदिले! : चांडगावच्या भूमिपुत्राने देशासाठी ठेवला देह, मधुकर म्हस्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:50 PM2018-08-18T12:50:07+5:302018-08-18T13:10:25+5:30
सीमेवरच्या जवानांचा रोजचा दिवस सुरु होतो तो कोणत्या ना कोणत्या चकमकींनी़ प्राण तळहातावर घेऊनच हे जवान सीमेवर तैनात असतात.
सीमेवरच्या जवानांचा रोजचा दिवस सुरु होतो तो कोणत्या ना कोणत्या चकमकींनी़ प्राण तळहातावर घेऊनच हे जवान सीमेवर तैनात असतात. अतिरेकी कोणत्या पद्धतीने हल्ला करतील, याचा काही नेम नसतो़ अतिरेक्यांचा हल्ला बंदुका, बाँम्ब वर्षाव या पद्धतीनेच होईल, असा कयास साफ चुकीचा ठरतो. अतिरेकी बेफाम गाडी चालवूनही जवानांचा जीव घेतात. अशाच एका घटनेत चांडगाव येथील भूमिपुत्राने देशासाठी देह ठेवला.
चांडगाव, ता. श्रीगोंदा येथील शेतकरी सखाराम व मालनबाई म्हस्के यांच्या पोटी ६ एप्रिल १९८१ रोजी मधुकरचा जन्म झाला. त्या अगोदरची कन्या छाया आणि दिलीप ही मुले. सखाराम व मालनबाई यांनी पोटाला चिमटा घेत तिघांना शाळेत घातले मधुकरची उंची सहा फूट आणि अंगात चित्त्याची चपळता होती. कबड्डीची मैदाने गाजविण्यासाठी एक आज्ञाधारक खिलाडू वृत्तीचा मुलगा म्हणून मधुकर सर्वांना परिचित. दहावी पास झाला आणि श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात प्रवेश घेतला. एकच ड्रेस अंगावर. बसचा पास काढण्याची परिस्थिती नव्हती. अशा परिस्थितीत जुन्या सायकलची दुरुस्ती करुन मधुकरने कॉलेजसाठी खडतर प्रवास सुरू केला. तो अकरावी पास झाला. बारावीत असताना कोपरगावला ११० इंजिनिअर रेजिमेंटची सैन्यभरती निघाली. मधुकर रेल्वेने कोपरगावला गेला. मोठ्या जिद्दीने त्याने ती भरती पूर्ण केली व १७ जानेवारी २००१ रोजी तो सैन्यात भरती झाला. पुणे येथील अभियांत्रिकी विभागात चालक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले. मधुकरचा रणभूमिवरील लढा सुरू झाला. आज्ञाधारक सैनिक म्हणून अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. लान्सनायक म्हणून बढती मिळाली. मधुकर म्हस्के हा पहाडी भागात सैनिक वाहन चालविण्यासाठी एक्सपर्ट होता.
म्हस्के परिवाराची परिस्थिती बदलली. आई-वडिलांनी मधुकरचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. जिजाराम म्हस्के व घारगावचे हरिभाऊ थिटे यांनी मध्यस्थी केली. घारगाव येथील भिमाजी व संजना थिटे यांची दहावी पास झालेली मुलगी मोहिनी हिच्याबरोबर ११ मे २००६ रोजी विवाह झाला. वैवाहिक जीवनाचा प्रवास सुरू झाला. आई-वडिलांना शेतीत काम करण्यासाठी मदत व्हावी, या भावनेतून मोहिनीला चांडगावला ठेवले. पण मोहिनीशी दररोज मोबाईल संपर्क होता.
जवानाच्या घरात अंकिताच्या रुपाने कन्या पुष्प उमलले. मधुकरला खूप आनंद झाला. त्यानंतर मधुकर यांनी कुटुंबाला पश्चिम बंगालला नेले. नेपाळची त्यांनी सफर केली. मात्र दररोज धावपळ पाहून मोहिनीने चांडगावला येणे पसंत केले. त्यानंतर पुन्हा मधुकरबरोबर जाण्याचा योग आला नाही. आदित्य हा मुलगा झाला. पाच महिन्यानंतर आदित्यला भेटण्यासाठी मधुकर घरी आले. त्यावेळी बाप-लेकांची भेट झाली. पण ही भेट शेवटची ठरली.
काश्मीरमधील सियाचीनमध्ये अतिरेकी घुसले होते. त्यांना शोधण्याची मोहीम सुरू झाली. परिसरात बर्फ असल्याने रस्ते शोधणे अवघड होते. हवामानात धुके आणि बर्फाळ परिस्थितीमुळे रस्ताच दिसत नव्हता. अशा परिस्थितीत मधुकर सैनिकी गाडी घेऊन निघाले. गाडीत सात जणांची टीम होती. बर्फाळ रस्त्यावरून जात असताना दरीत गाडी गेली. २८ जानेवारी २०१० रोजी मधुकर म्हस्के व सुभेदार मेवासिंग हे जवान शहीद झाले.
चांडगावचा भूमिपुत्र शहीद झाला, यावर गावकºयांचा विश्वास बसत नव्हता. टीव्हीवर बातमी आली. चांडगाव परिसरात दु:खाची सुनामी पसरली. लष्करी इतमामात मधुकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘मधुकर अमर रहे.. जय जवान.. भारतमाता की जय’ अशा घोषणा आसमंतात घुमल्या. आजही म्हस्के परिवाराच्या कानी या घोषणा ताज्या आहेत.
चटणी, भाकरी आणि शाळा
चटणी, भाकरी घेऊन माझं लेकरू शाळा शिकलं. अंगात घालायला एकच सदरा होता. पायात चप्पल नव्हती. सायकलवर शाळा केली. गावात साºयांचा लाडका होता. गावी आला की शेजाºया-पाजाºयांना भेटत. माझी कधीच मर्जी मोडली नाही. पण लेकरू गेलं, दहा वर्षे झाली. त्याला पोळ्या फार आवडायच्या. सणसूद आला की लेकराची आठवण येते, अशी माहिती देताना वीरमाता मालनबार्इंचा ऊर भरुन आला.
रोज फोटोला वंदन
सुट्टीला आले की, मला ते लिंब काढणे आणि खुरपणीची कामे करण्यासाठी मदत करायचे. आई-वडिलांची आज्ञा कधी मोडली नाही. त्यांनी कसलीच इच्छा आई-वडिलांकडे व्यक्त केली नाही. मला नेपाळला नेले. चहाचे मळे दाखविले. मोठी जंगलं दाखविली. परंतु ती पहिली आणि शेवटची सफर ठरली. मुले चांडगावमधील मराठी शाळेत आहेत. सर्व काही ठिक आहे, पण त्यांच्या आठवणीविना आजही दिवस जात नाही. आजही रोज त्यांच्या फोटोला वंदन केले की, दिवसभर उभं राहण्याची मला हिंमत मिळते, असे सांगत वीरपत्नी मोहिनीतार्इंच्या अश्रूंचा बांध फुटला.
स्मारक व्हावे
गावची जत्रा आली की, दोन-दोन तमाशे होतात. त्यातून मारामाºया होतात. मधुकर म्हस्के यांचे गावात स्मारक व्हावे, अशी मागणी अनेकदा केली. पण कोणी दखल घेतली नाही. गावातील मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे स्मारक व्हावे, अशी अंतर्मनातील भावना वीरपत्नी मोहिनीतार्इंनी व्यक्त केली.
- शब्दांकन : बाळासाहेब काकडे