शूरा आम्ही वंदिले! : संगमनेर तालुक्यातील लढवय्या अण्णासाहेब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:07 PM2018-08-13T13:07:45+5:302018-08-14T09:40:01+5:30
एकोणीस वर्षांपूर्वी झालेल्या कारगील युद्धात भारतीय सैनिकांनी हिमशिखरांवर पराक्रम गाजवला.
एकोणीस वर्षांपूर्वी झालेल्या कारगील युद्धात भारतीय सैनिकांनी हिमशिखरांवर पराक्रम गाजवला. या युद्धात ३० हजार भारतीय जवान लढले. त्यापैकी ५२७ शहीद, तर १३९३ जवान गंभीर जखमी झाले. यात संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील सुपुत्र अण्णासाहेब पांडुरंग कवडे (देशमुख) देशासाठी लढताना शहीद झाले. ते सहा महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या लढाऊ वृत्तीचे आजही अनेकांना स्मरण होते.
अण्णासाहेब लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांची आई लक्ष्मीबाई यांच्यावर अण्णासाहेब व त्यांच्या भावंडांची संगोपनाची जबाबदारी पडली. घरची परिस्थिती बेताची असल्याने अपार कष्ट करण्याशिवाय लक्ष्मीबार्इंना कुठला पर्याय नव्हता. आईला मदत करण्याबरोबरच आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांवर मात करीत अण्णासाहेबांनी त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनीही कष्टाची कामे करण्यास सुरुवात केली. तरूणांना सैन्यदलात भरती करून घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे भारतीय लष्कराचे अधिकारी आले होते. सैन्यदलात भरती होण्याची इच्छा असलेल्या अण्णासाहेबांना त्यांच्या मित्राने याबाबत माहिती दिली. त्या दोघांनीही लगेचच अकोले गाठले. भरतीसाठी तरूणांनी मोठी गर्दी केली होती. विविध शारीरिक क्षमता चाचणी पूर्ण झाल्यानंतर काही तरूणांची सैन्यात भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यात संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील रहिवासी असलेल्या अण्णासाहेब पांडुरंग कवडे यांचा समावेश होता. ७ डिसेंबर १९८३ साली वयाच्या अठराव्या वर्षी अण्णासाहेब सैन्यदलात भरती झाले. शहरात कामासाठी जातो आहे, असा निरोप त्यांनी मित्रांकरवी घरी पाठवला. कोणालाही काहीही न सांगता ते प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी निघून गेले. प्रशिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी घरी आईला पाठविलेल्या पत्रातून खरी हकीकत सांगितली. भारतमातेच्या रक्षणाबरोबरच जन्मदात्या मातेचेही कष्टाचे दिवस संपून चांगले दिवस आले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अण्णासाहेबांचा विवाह सुजाता यांच्यासोबत झाला. त्यांना दोन मुले, एक मुलगी झाली. मुले श्रीकांत व स्वप्नील तर मुलगी रेश्मा अशी त्यांची नावे आहेत.
जम्मू काश्मीर, आसाम, देहरादून, पटियाला आदी ठिकाणी अण्णासाहेबांना देशसेवा करण्याची संधी मिळाली. देहरादून येथे मुलगी रेश्मा हिचा तिसरा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची जम्मू काश्मीर येथे बदली झाली. अण्णासाहेब यांची पत्नी सुजाता आजारी होत्या. लष्करी रूग्णालयात पत्नीला चांगले उपचार मिळावेत म्हणून त्यांनी सुट्टीसाठी अर्जही केला होता. अण्णासाहेब पंधरा वर्षे देशसेवा करून सहा महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते. १९९९ मध्ये पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत घुसखोरी होत असल्याची माहिती गुराख्यांनी भारतीय लष्कराला दिली. त्यानंतर सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. भारत-पाकिस्तानमध्ये कारगील युध्द सुरू झाले. घुसखोरांनी ताबा मिळविलेला प्रदेश भारतीय सैनिक काबीज करीत होते. मे १९९९ मध्ये सुरू झालेले कारगील युद्ध ७७ दिवस चालले. नियंत्रण रेषेपलीकडे घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी सडेतोड प्रतिउत्तर देत २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानच्या चारी मुंड्या चीत केल्या. कारगील विजय दिवस साजरा करीत तिरंगा फडकविण्यात आला. या युद्धात ३० हजार भारतीय जवान लढले, त्यापैकी ५२७ शहीद, तर १३९३ जवान गंभीर जखमी झाले. शहिदांमध्ये संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील अण्णासाहेब पांडुरंग कवडे यांचाही समावेश होता. अण्णासाहेब शहीद झाल्याची माहिती त्यांच्या घरी कळविण्यात आली.
अण्णासाहेबांचे धाकटे बंधू रामकृष्ण कवडे हे अण्णासाहेबांची पत्नी सुजाता यांना घेऊन रेल्वेने जम्मूकडे रवाना झाले. आपण जम्मू काश्मीरकडे का जातो आहे. याची कल्पनाही सुजाता यांना नव्हती. तेथे पोहोचल्यानंतर अण्णासाहेब कारगील युद्धात शहीद झाल्याचे सुजाता यांना सांगण्यात आल्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना धीर देत सावरण्याच्या प्रयत्न करण्यात आला. पण आजही या धक्क्यातून कवडे कुटुंबीय सावरू शकले नाही. भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून अण्णासाहेबांच्या पार्थिवावर जम्मूतच लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकीकडे पतीला वीरमरण आल्याचा अभिमान तर दुसरीकडे कुटुंबातील कर्ता गेल्याचे दु:ख सुजाता यांना होते.
केंद्र सरकारच्या वतीने पाच लाखांची मदत करण्यात आली. निवृत्ती वेतन सुरू झाले. मात्र, कुटुंबातील कर्ता पुरूष गेला होता. त्यानंतर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. तिन्ही मुलांना उच्चशिक्षण देत त्यांच्यावर चांगले संस्कार केले. मात्र, असे असताना अण्णासाहेबांची कायमच उणीव भासत असल्याची खंत वीरमाता लक्ष्मीबाई, वीरपत्नी सुजाता यांनी व्यक्त केली.
शब्दांकन : शेखर पानसरे