शूरा आम्ही वंदिले! : शत्रूंच्या मनात धडकी भरविणारा जवान, मारूती जावळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:16 PM2018-08-18T13:16:50+5:302018-08-18T13:19:57+5:30
१९७१ च्या भारत-पाक युद्धात काश्मीर खोऱ्यात शत्रूंच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात पाच किलोमीटर अंतरावर जाऊन मारूती जावळे यांनी माईन्स पेरले
१९७१ च्या भारत-पाक युद्धात काश्मीर खोऱ्यात शत्रूंच्या ताब्यात असलेल्या प्रदेशात पाच किलोमीटर अंतरावर जाऊन मारूती जावळे यांनी माईन्स पेरले. मारूती यांचा पराक्रम शत्रूंच्या मनात धडकी भरवणारा होता. युद्धात त्यांनी अनेक शत्रूंना यमसदनी पाठविले़ शत्रूच्या प्रदेशात भारतमातेच्या रक्षणासाठी कामगिरी करत असताना मारूती जावळे यांना वयाच्या अवघ्या २१ वर्षी वीरगती प्राप्त झाली़
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील व तालुक्याच्या एका टोकाला असलेल्या कोल्हार येथे मारूती रामभाऊ जावळे यांचा १जानेवारी १९५० रोजी शेतकरी कुटुंबात जन्म झाला. रामभाऊ व समाबाई या दाम्पत्यांना मारूती यांच्यासह लक्ष्मण हा एक मुलगा व कडूबाई ही मुलगी़ मारूतीचे प्राथमिक शिक्षण कोल्हार येथे झाले़ त्यानंतर चौथी ते दहावीपर्यंतचे शिक्षण शिराळ येथे झाले. मारूती हे लहानपणापासूनच अंगाने धडधाकट होते़ आर्मीविषयी त्यांना विशेष आकर्षण होते़ दहावीचे शिक्षण झाल्यानंतर १३ जानेवारी १९७१ रोजी वयाच्या २१ व्या वर्षी ते सैन्यदलात भरती झाले़ मारूती हे सैन्यदलात भरती झाले तेव्हा जावळे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. घरातील एका मुलाला सरकारी नोकरी लागल्याने घरी आनंदाचे वातावरण होते. आता सुखाचे दिवस येतील अशी सर्वांची भावना होती. मारूती यांची बॉम्बे इंजिनिअरींग ग्रूप पुणे येथे ट्रेनिंग झाली त्यानंतर ते रेडिओ आॅपरेटर म्हणून व जम्मू काश्मीर येथे छांबा सेक्टरला रूजू झाले़ १९७१ च्या दरम्यान बांगला मुक्ती भारत-पाक युद्धाला प्रारंभ झाला होता़ या काळात सर्व सैन्यदल सतर्क करण्यात आले होते़ त्या काळात शत्रूच्या प्रदेशात घुसून त्यांची ठिकाणे शोधून रणनिती ठरविण्यात रेडिओ आॅपरेटरची मोठी जबाबदारी होती़ छांबा सेक्टरला मारूती यांची नियुक्ती असताना शत्रूच्या प्रदेशात जाऊन त्या ठिकाणी माईन्स पेरण्याची जबाबदारी मारूती आणि त्यांच्या सहका-यांवर होती़ ही कामगिरी बजावत असताना १४ डिसेंबर १९७१ रोजी मारूती जावळे यांना वीरगती प्राप्त झाली.
भरती झाल्यानंतर मारूती आपल्या गावातील मित्रांना पत्रे पाठवित असे़ त्या प्रत्येक पत्रातून त्यांची देशभक्ती जाणवते. एके दिवशी मारूती यांच्या आईने गावातील महादेव पालवे गुरूजी यांना पत्र लिहिण्यास सांगितले़ आईने विचारले की सुट्टीवर आल्यावर लग्न करायचे आहे़ मारूती यांनी पत्राचे उत्तर लिहितांना म्हटले आहे की, सध्या माझ्यासमोर शत्रूला हरविणे हाच उद्देश आहे. तो सफल झाल्यावर लग्नाचे पाहू. विशेष म्हणजे सदर पत्र मारूती यांनी ११ डिसेंबर रोजी लिहिलेले होते आणि १४ डिसेंबर रोजी ते शहीद झाले़
कोल्हार येथे शहीद मारूती जावळे यांच्या घरी वीरमाता समाबाई , भाऊ लक्ष्मण जावळे व त्यांच्या वहिनी रहातात. वीरमातेने वयाची शंभरी ओलांडली आहे़ बंधू लक्ष्मण शेती करतात़ आमची परिस्थिती खूपच गरिबीची होती आई-वडील मोलमजुरी करून प्रपंचाचा गाडा चालवित होते. मुलगा सैन्यदलात भरती झाल्याने आई-वडील खूपच समाधानी होते़ मोलमजुरीचे फळ मिळाले असे आई वडिलांना वाटत होते. परंतु हे सर्व औटघटकाचे ठरले. माझा बंधू शत्रंूशी लढताना शहीद झाला याचा आम्हाला सर्व कुटुंबीयांना व ग्रामस्थांना अभिमान असल्याचे लक्ष्मण सांगतात.
मारूती शहीद झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे १७ डिसेंबर रोजी गावात तार आली परंतु ही बातमी जावळे यांच्या घरी देण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती़ सगळ्या गावात ही बातमी पसरली गावातील लोक घोळक्याने मारूतरावाच्या घरी जाऊ लागले अंत्यसंस्कार तिकडेच झाले होते. आई समाबाई ओक्साबोक्सी रडू लागल्या. वडिलांना तर आभाळ फाटल्यागत झाले.१९ डिसेंबर रोजी तीन लष्करी जवान मारूतरावांच्या अस्थी घेऊन गावात आले. त्या पोटाशी धरून आई समाबाई धाय मोकलून रडू लागल्या. वडिलांच्या तोंडातून शब्दच फुटच नव्हते़ गावात एकदम सन्नाटा पसरला होता. जिता -जागता मुलगा पाठविला होता आणि हे काय असे मातेच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हते. घटना कळाल्यानंतर अनेक दिवस त्या मातेने अन्नाचा कण सुध्दा घेतला नव्हता.
ग्रामस्थांनी बांधले स्मारक
मारूती शहीद झाल्यानंतर गावक-यांनी गावात त्यांचे स्मारक बांधले़ या ठिकाणी दरवर्षी त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो़ दोन वर्षांपूर्वी जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन व कोल्हार ग्रामस्थांच्या वतीने मारूती यांच्या स्मारकाला उजाळा देत त्याचे भव्य स्वरूप करण्यात आले़ कोल्हार या गावात ३५ माजी सैनिक व सध्या ४५ जवान कार्यरत आहेत. देशसेवेसाठी झोकून दिलेले हे गाव आहे असे बोलले जाते.
शब्दांकन : उमेश कुलकर्णी