शूरा आम्ही वंदिले! : व्हिक्टोरिया क्रॉस, नामदेव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 11:47 AM2018-08-15T11:47:53+5:302018-08-15T11:53:16+5:30

दुसऱ्या महायुध्दात ब्रिटिशांसाठी जे भारतीय सैनिक लढले त्यापैकी नऊ भारतीयांना अतुलनीय शौर्याबद्दल ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा इंग्लंडचा सर्वोच्च सन्मान मिळाला.

We shouted! : Victoria Cross, Namdev Jadhav | शूरा आम्ही वंदिले! : व्हिक्टोरिया क्रॉस, नामदेव जाधव

शूरा आम्ही वंदिले! : व्हिक्टोरिया क्रॉस, नामदेव जाधव

दुसऱ्या महायुध्दात ब्रिटिशांसाठी जे भारतीय सैनिक लढले त्यापैकी नऊ भारतीयांना अतुलनीय शौर्याबद्दल ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा इंग्लंडचा सर्वोच्च सन्मान मिळाला. त्यात संगमनेर तालुक्यातील नामदेव जाधव यांचा समावेश होता. राणी एलिझाबेथ यांच्या राज्यारोहण सोहळ्यास जाधव यांना ‘शाही पाहुणे’ म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या राजवटीतही असे जिगरबाज भारतीय होते.
 नामदेव जाधव, निमजच्या (ता.संगमनेर) एका सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा. घरच्या गरिबीमुळे शिक्षण घेता न आलेला. शाळेचे तोंड सुद्धा पहायला मिळाले नाही. त्यावेळी दुस-याच्या शेतात काम करणं आणि एरव्ही प्रवरेच्या पात्रात पोहायला जाणे हा त्याचा जीवनक्रम बनला. हळूहळू तो पट्टीचा पोहणारा बनला. त्यांच्या स्वप्नातही नव्हते, हे पोहण्याचे कौशल्यच एक दिवस आपले जीवन संपूर्ण बदलून टाकणार आहे. इतर मुले लष्करात भरती होतात म्हणून हाही एक दिवस पोटासाठी लष्करात गेला. १९४४-४५ मध्ये ट्रेनिंग पूर्ण झाले आणि लगेचच त्यांच्या कंपनीला इटलीतील सिनोई नदीकाठच्या जर्मन लष्करावर हल्ला करण्याचा हुकूम मिळाला. ती तारीख होती ९ एप्रिल १९४५. १८-११-१९२१ रोजी जन्मलेल्या या शिपाई गड्याचे त्यावेळी वय होते २४ वर्षांचे. अजून लग्नही झाले नव्हते. त्यामुळे घरचे पाश नव्हते. तारुण्याची मस्ती मात्र पराक्रम गाजवायला सूचना देत होती. तशात या हुन्नरी शिपाई गड्याला प्रत्यक्ष रणभूमीवर जाण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या आयुष्याचे अक्षरश: सोने झाले.
इटलीचा अनोखा प्रदेश. अनोळखी वातावरण. पण नामदेव जाधव बावरला नाही. सिनोई नदीच्या दोन्ही बाजू ४० फूट उंचीच्या. नदीला ४-५ फूट खोल पाणी. नदीच्या दुसºया तीरावर जर्मन सैन्याचे कंपनीची छावणी होती.जर्मन सैन्याचा अलिकडच्या तीरावर असलेल्या ५ मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या कंपनीवर मशिनगन्समधून आग ओकणे चालू होते. पूर्वेच्या बाजूला जर्मन सैन्याने सुरूंग पेरून रस्ता बंद करून टाकला होता. सर्व बाजूंनी त्यांनी मोर्चेबांधणी केली होती.
शिपाई नामदेव जाधव ५ मराठा लाईट इन्फंट्री या कंपनीचा दूत म्हणून काम करीत होता. या कंपनीला मदत म्हणून ३/१५ पंजाब आणि १ जयपूर याही कंपनीचे सैनिक शस्त्रसज्ज होते. मेजर विंटर, मेजर क्रॉफर्ड, मेजर व्हॅन इनगेन आणि मेजर हॉवर्ड, मेजर व्हॅन इनगेन आणि मेजर हॉवर्ड हे लष्करी अधिकारी नेतृत्व करीत होते. नदी ओलांडण्याचा हुकूम सुटताच पलीकडून जर्मन सैन्य आग ओकू लागले. अनेक जण हुतात्मा झाले. कित्येक जायबंदी आणि जखमी झाले. याही अवस्थेत मेजर क्रॉफर्डच्या नेतृत्वाखाली नामदेव जाधवसह सैनिकांनी नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला.
नदी ओलांडताना शत्रूने ३ मशिनगन्समधून गोळीबार केला. त्यात कंपनी कमांडर आणि ३ सैनिक जखमी झाले. इतर मारले गेले. सभोवताली आपले सैनिक मेलेले आहेत, उरलेले जखमी झालेले आहेत, कंपनी कमांडरही जखमी झालेला आहे, एखादा हतबल झाला असता पण परक्या मुलखात मदतीची जराही शक्यता नसताना मशिनगन्समधील गोळ्यांच्या रूपाने मृत्यूचे तांडव चालू असताना नामदेव जाधव जराही विचलित झाला नाही. उलट हाच आपल्या कसोटीचा प्रसंग आहे, अशा इर्षेने तो झपाटला. निमजला प्रवरेच्या पात्रात तो लीलया पैलतीर गाठायचा. ते कौशल्य इथे कामी आले. जखमी कंपनी कमांडर आणि सैनिकांना पाठीवर घेऊन पाण्यातून तो अलीकडे आला. मोठ्या कौशल्याने जमिनीत पेरलेले सुरंगही त्याने टाळले. मशिनगन्समधून गोळ्यांचा पाऊस पडत असताना त्याने अशा तीन खेपा केल्या. पण त्याने त्याची पर्वा केली नाही त्यात तो स्वत: ही जखमी झाला त्यामुळे आता तो मशिनगनही चालवू शकत नव्हता आणि शत्रूने तर त्याच्या तीनही कंपन्यांना नेस्तनाबूत केले होते.
पण तो डगमगला नाही. त्याने ग्रेनेड (हातबॉम्ब)चा वापर करून शत्रूच्या मशिनगन्स नष्ट केल्या. स्वत:कडच्या ग्रेनेड संपल्यावर पुन्हा रांगत जाऊन आपल्या ठाण्यावरून आणखी ग्रेनेड आणल्या. अखेरच्या शत्रूच्या सर्व मशिनगन्स नष्ट केल्या. शत्रूचा प्रतिकार संपला. त्याचा मारा संपल्यावर नामदेव जाधव उंच ठिकाणी गेला आणि ‘बोल शिवाजी महाराज की जय’ अशी जोरदार विजयश्रीची आरोळी ठोकली.
नामदेव जाधव मराठा लाईट इन्फंट्रीत भरती झालेला एक सामान्य शिपाई, पण त्याने असामान्य धैर्य दाखवून अतुलनीय पराक्रम केला आणि कंपनी कमांडरसह जखमी सैनिकांचे प्राण तर वाचवलेच पण आपल्या कंपन्यांची आगेकूच करण्यास मोठीच मदत केली. त्यांच्या शौर्यामुळे इटलीतील सिनोईचा जर्मन सैन्याचा प्रतिकार मोडून पडला. स्वत:चे प्राण धोक्यात घालून त्याने केलेल्या असामान्य पराक्रमाबद्दल १९ जून १९४५ मध्ये ब्रिटिश लष्करातला व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च सन्मान त्याला देण्यात आला. दुसºया महायुद्धात ९ भारतीयांना हा सन्मान मिळाला. त्यात दोन महाराष्टÑीयन होते. एक नाईक यशवंतराव घाटगे. (त्यांना मरणोत्तर मिळाला) आणि दुसरे नामदेव जाधव. व्हिक्टोरिया क्रॉसच्या सन्मानाने नामदेव जाधव फुगून गेले नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यात गर्व आला नाही. तोच साधेपणा, त्याच सवयी, तोच प्रेमळपणा शेवटपर्यंत कायम राहिला. १९४६-४७ च्या सुमारास शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन रेल्वेने श्रीरामपूरहून जाताना थोडा वेळ थांबून त्यांनी नामदेव जाधवांचा सत्कार केला आणि श्रीरामपूरला जाधवनगर नाव देण्याची इच्छा व्यक्त केली. पण या निर्लोभी माणसाने अतिशय नम्रपणे त्याला नकार देऊन सांगितले की, तुम्हाला द्यायचेच असेल तर आता भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य द्या. १९५३ मध्ये राणी एलिझाबेथचा शाही राज्यारोहण सोहळा झाला. नामदेव जाधव यांना ‘शाही पाहुणे’ म्हणून निमंत्रित केले होते. २ आॅगस्ट १९८४ रोजी पुणे येथील वानवडी हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. तोपर्यंत दर दोन वर्षांनी दोन व्यक्तीसह त्यांना इंग्लंडच्या राणीच्या स्वागत समारंभास बोलवीत असत.
निवृत्तीनंतर जाधव हे अकोले तालुक्यातील वीरगाव येथे मुलीकडे राहत होते. ठरवलेच असते तर व्हिक्टोरिया क्रॉसच्या भांडवलावर ते भरपूर संपत्ती कमावू शकले असते, पण मुळातच हा मनुष्य निर्मोही, शांत. तो अखेरपर्यंत शांततेचे जीवन जगला. एखाद्या सामान्य माणसासारखे त्यांचे असामान्यत्व त्यांनाही कधी जाणवले नाही आणि तुम्हा आम्हाला सुद्धा. त्याची कदर केली ती फक्त ब्रिटिशांनी.

- शब्दांकन : प्रा. विठ्ठल शेवाळे

 

Web Title: We shouted! : Victoria Cross, Namdev Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.