शूरा आम्ही वंदिले! : वीर उतरला रणी, गोरक्षनाथ भालसिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 12:14 PM2018-08-16T12:14:48+5:302018-08-16T12:24:15+5:30
‘उल्फा’ (युनायटेड लिबरेशन फ्रंट आॅफ आसाम) विरोधात लढण्यासाठी भारतीय लष्कराने आॅपरेशन रिन्हो युनिट तयार केले
‘उल्फा’ (युनायटेड लिबरेशन फ्रंट आॅफ आसाम) विरोधात लढण्यासाठी भारतीय लष्कराने आॅपरेशन रिन्हो युनिट तयार केले. उल्फा नक्षलवाद्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी गोरक्षनाथ व त्यांचे सहकारी जंगलातून फिरत होते. नक्षलवाद्यांनी मार्गावर बॉम्ब पेरून ठेवले होते. त्यावर वजन पडले की ते फुटायचे. जिप्सी गाडीत गोरक्षनाथ व त्यांचे ७ ते ८ जवान होते. पुढच्या सीटवर बसलेले गोरक्षनाथ यांच्या गाडीचे टायर त्या बॉम्बवरून गेले. क्षणार्धात गाडीचा स्फोट झाला. त्यामुळे गाडीने पेट घेतला. स्फोट एवढा शक्तिशाली होता की गाडीची राख झाली. यात गोरक्षनाथ गंभीर जखमी झाले. गोरक्षनाथ यांच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले. परंतु दुर्दैवाने ८ आॅगस्ट १९९८ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
नगर तालुक्यातील सर्वात मोठे गाव वाळकी. खरे वाळकीचा बाजार फक्त जिल्ह्यातच नाहीतर राज्यात प्रसिध्द आहे. या मातीने अनेक शूर जवान देशाच्या रक्षणासाठी दिले. मात्र यातील काहींना वीरमरण येऊन ते देशासाठी शहीद झाले. त्यांचे हौतात्म्य मात्र सदैव स्मरणात राहिल असेच आहे. यातीलच एक नाव म्हणजे गोरक्षनाथ हरिभाऊ भालसिंग.
हरिभाऊ यांच्याकडे तुटपुंजी जमीन. त्यात त्यांना चार अपत्ये. दोन मुली, एक मंदाबाई , दुसरी कांताबाई. यानंतर गोरक्षनाथ या शूर वीराचा जन्म झाला. त्यांच्यानंतर अनिल यांचा जन्म झाला. गोरक्षनाथ यांचा जन्म १२ डिसेंबर १९७२ ला झाला. तेव्हा देशात भयंकर दुष्काळ पडला होता. खाण्यासाठी धान्य नव्हते. हरिभाऊ यांच्याकडे असलेल्या थोड्याशा जमिनीवर कुटुंबाचा गाडा सुरू होता. तुटपुंज्या उत्पन्नावर आर्थिक गणिताचा मेळ बसत नव्हता. अत्यंत हलाखीच्या स्थितीत हे कुटुंब आपली गुजराण करीत होते.
लहानपणापासून गोरक्षनाथ हे वडिलांना शेतीकामात मदत करत. शेती नांगरणे, बैलगाडी जुंपणे, नांगर धरणे, मोट हाकणे अशी शेतकऱ्यांच्या पोरांना करावी लागणारी सारी कामे ते व त्यांचा लहान भाऊ अनिल हे करत. शेतीतील कामामुळे ते अंगपिंडाने धडधाकट होते. घरची गरिबी असली तरी हरिभाऊ यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला. खरे तर त्याकाळी घेतलेला हा निर्णय त्यांचा मनाचा मोठेपणा ठरला. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण गावातील रयतच्या हायस्कूलमध्ये झाले. नंतर १२ वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी नगर कॉलेजला पूर्ण केले. फक्त शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही, काहीतरी वेगळा मार्ग शोधला पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता. दुसरीकडे देशभक्तीची आसही होतीच. लष्कर भरती त्यांना आपल्याकडे आकर्षित करत होती. लष्करात भरती झालो तर देशसेवाही घडेल आणि घरच्यांना आर्थिक हातभार लागेल अशी खूणगाठ मनाशी बांधून त्यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.
गोरक्षनाथ यांनी लष्कर भरतीसाठी कसून सराव सुरु केला. कुठेही कमी पडणार नाही या इराद्याने ते मनापासून सराव करू लागले. त्याचा फायदा लगेच त्यांना झालाही. पुणे येथे २७ फेब्रुवारी १९९१ रोजी झालेल्या लष्कर भरतीत पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले. त्यानंतर लष्कराचे प्रशिक्षण पुण्यातच सुरु झाले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना आसाम येथे पहिली पोस्टिंग मिळाली. आपल्या माणसापासून कोसो दूर ते देशसेवा करत होते. यानंतर काही दिवसांनी त्यांचा विवाह अंभोरा (ता. आष्टी, जि. बीड) येथील वंदनातार्इंशी झाला. सुखी संसार व्यवस्थित सुरु झाला. गोरक्षनाथ सुट्टीवर आले की, त्यांचे कुटुंब, मित्र परिवार, भाऊबंद त्यांच्याभोवती जमायचे. मग गोरक्षनाथ त्यांना लष्करी शिस्त, तेथील काही प्रसंग यावर चर्चा करायचे. गोरक्षनाथ यांचा स्वभाव तसा शांत व संयमी पण मोठा जिद्दी होता. जे मनात आणले ते करून दाखवायचेच, हा त्यांचा बाणा होता. महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी म्हणजे २ आॅक्टोबर रोजी त्यांना पुत्ररत्न झाले. घरच्यांचा आनंदाला उधाण आले. कुटुंबाने त्यांचे नाव प्रवीण ठेवले. आपल्या बाळाला खूप शिकवून मोठे करायचे असे स्वप्न गोरक्षनाथ व वंदनाताई पाहू लागले.
आसाम राज्यातील नलबाडी जिल्ह्यात त्यांची पोस्टिंग झाली. आसाम राज्यात नक्षलवादी संघटना खूपच सक्रिय होत्या. आपली दहशत कायम ठेवण्यासाठी ते लोकांना ओलीस ठेवून आपल्या मागण्या पूर्ण करून घेत. निष्पाप लोकांचा बळी घेणे, महिलांवर अत्याचार करणे, स्थानिकांची घरे पेटवणे अशी कामे ते करत. भारताच्या पूर्व भागात ‘उल्फा’ ही नक्षलवादी संघटना सक्रिय होती. सशस्र असणाºया या उग्रवादी संघटनेने आसामवर कित्येक वेळा हल्ले केले. भारत सरकारने यांच्याशी लढण्याचे प्रयत्न सुरु केले होते.
‘उल्फा’च्या विरोधात लढण्यासाठी भारतीय लष्कराने आॅपरेशन रिन्होचे युनिट तयार केले. हे युनिट देशाच्या दुश्मनांचा खात्मा करण्यासाठी सज्ज झाले. डोंगराळ भाग, उंच सखल टेकड्या, दूरवर पसरलेले घनदाट जंगल, जंगलातील हिंस्र प्राणी, उंच वाढणारे सरकांड्या गवताचे विविध प्रकार अशा नलबाडी जिल्ह्यात हे आॅपरेशन करायचे होते. उल्फा नक्षलवाद्यांनी भारतीय लष्कराविरोधात युद्ध पुकारले. उल्फा नक्षलवाद्यांना कायमचा धडा शिकवण्यासाठी गोरक्षनाथ व त्यांचे सहकारी जंगलातून फिरत होते. नक्षलवाद्यांनी मार्गावर बॉम्ब पेरून ठेवण्यात आले होते. त्यावर वजन पडले की ते फुटायचे. जिप्सी गाडीत गोरक्षनाथ व त्यांचे ७ ते ८ जवान होते. पुढच्या सीटवर बसलेले गोरक्षनाथ यांच्या गाडीचे टायर त्या पेरलेल्या बॉम्बवरून गेले. क्षणार्धात गाडीचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे गाडीने पेट घेतला. स्फोट एवढा शक्तीशाली होता की गाडीची राख झाली. यात गोरक्षनाथ गंभीर जखमी झाले. गोरक्षनाथ यांच्यावर दोन दिवस उपचार करण्यात आले. परंतु दुर्दैवाने ८ आॅगस्ट १९९८ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. हा जवान भारतमातेच्या रक्षणासाठी कुर्बान झाला होता. घटनेनंतर वाळकी गावात ४ ते ५ दिवसांनी तार आली. गावावर एकच शोककळा पसरली. गावाचा जवान देशासाठी कामी आला. सर्वत्र हळहळ आणि अश्रूंचे बांध फुटत होते. गोरक्षनाथ यांच्या पत्नी वंदनाताई यांना तर शोक अनावर झाला. प्रवीण अवघा १० महिन्यांचा होता. १० आॅगस्ट रोजी त्यांचे पार्थिव वाळकी गावात आणण्यात आले. हजारो लोकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. गावात शुकशुकाट झाला. गावातील सर्व व्यवहार बंद करण्यात आले. सजवलेल्या वाहनातून तिरंग्यात लपटलेल्या गोरक्षनाथ यांची अंत्ययात्रा सुरु झाली. चौकाचौकात गोरक्षनाथ भालसिंग अमर रहे, ‘भारत माता की जय’ चा नारा सुरु होता. लष्कराने मानवंदना दिली तेव्हा हजारोंच्या जनसमुदायाला रडू आवरता आले नाही.
वंदनाताई यांचा जीवनाचा आधार संपला होता. परंतु डोंगराएवढे दु:ख पचवून त्यांनी आपल्या १० महिन्यांच्या प्रवीणला मोठ्या जिद्दीने लहानाचा मोठा केला. वीर पत्नीने दाखवलेली ही जिद्द वाखाणण्याजोगी ठरली.
शब्दांकन : योगेश गुंड