शूरा आम्ही वंदिले! : गाजवले १९७१ चे युद्ध, आसाराम तनपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:31 AM2018-08-16T11:31:57+5:302018-08-16T11:37:39+5:30
१९७१ चे भारत-पाक युद्ध. हवाई हल्ल्यासह भारताच्या तोफखान्यावर दोन्ही बाजूंनी शत्रूचे हल्ले सुरु होते. ढाका भागात देशसेवा करत असताना आसाराम तनपुरे यांना शत्रूच्या दोन गोळ्या लागल्या.
१९७१ चे भारत-पाक युद्ध. हवाई हल्ल्यासह भारताच्या तोफखान्यावर दोन्ही बाजूंनी शत्रूचे हल्ले सुरु होते. ढाका भागात देशसेवा करत असताना आसाराम तनपुरे यांना शत्रूच्या दोन गोळ्या लागल्या. परंतु तरीही त्यांनी जागा सोडली नाही. ज्या शत्रूने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तो समोर दिसत होता. त्याला जीवंत सोडून आसाराम जीव सोडणार नव्हते. त्यांनी अंगातील सर्व शक्ती एकवटून शत्रूच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी थेट शत्रूच्या कपाळातून आरपार गेली. शत्रू जागेवरच गारद झाला. मात्र, आसाराम तनपुरे यांचा देहही भारतमातेच्या कुशीत अलगद विसावला़़़ भातोडीचा जवान देशाच्या कामी आला.
भातोडी पारगावची ऐतिहासिक लढाई सर्वांनाच माहीत आहे. येथे शहाजी महाराजांनी जो पराक्रम केला त्याची इतिहासाने नोंद घेतलीे. ७०० वर्षांपासून जुने असणारे नृसिंह मंदिर, तसेच पडझड झालेल्या अनेक जुन्या वास्तू येथे पहावयास मिळतात. मराठवाडा आणि नगर जिल्ह्याची सीमारेषा अशीही भातोडीची ओळख़ इतिहासातही भातोडीचा उल्लेख मराठवाड्याचे प्रवेशद्वार असा आढळतो़ शहाजी महाराज आणि त्यांचे बंधू शरिफजी यांनी जे शौर्य या मातीत गाजवले त्याच भातोडी पारगावच्या मातीत एका शूर जवानाचे रक्त देश रक्षणासाठी सळसळत होते. तो जवान म्हणजे आसाराम तनपुरे.
हिरव्यागार डोंगराच्या कुशीत पारगाव भातोडी हे गाव वसलेले. चाँदबिबी महालावरून या गावाचे अप्रतिम दृश्य पहावयास मिळते. याच गावात पाटीलबा तनपुरे व गोधाबाई यांच्या पोटी १ जून १९४२ या दिवशी आसाराम यांचा जन्म झाला. खरे तर हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. पाटीलबा यांना काही शेती होती. त्यातच जे पिकेल त्यावर कुटुंबाची गुजराण सुरू होती. पाटीलबा यांना चार अपत्ये. आसाराम हे सर्वात मोठे, त्यानंतर यशवंत, दिनकर आणि सर्वात लहान अंजनाबाई.
आसाराम यांचे प्राथमिक शिक्षण भातोडी पारगाव येथेच झाले. पण त्याकाळी माध्यमिक शिक्षणाची गावाकडे सोय नव्हती. कॉलेजचे शिक्षण तर खूप लांबची गोष्ट होती. चौथीनंतर गावात शिक्षण नसल्याने आसाराम यांनी शाळा सोडून दिली. ते वडिलांना शेतीकामात मदत करू लागले. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून हे कुटुंब सुखाचे दोन घास खात. त्याकाळी आजच्यासारखी यांत्रिक शेती नसायची. सर्व कामे घरातील माणसांनाच करावी लागत. बैलांवर शेती होती. अगदी शेतीला पाणी देण्यासाठी बैल जोडून मोट लावून पाणी दिले जायचे. शेती करण्यापेक्षा आपण लष्करात भरती होऊन मातृभूमीची सेवा करावी, असा विचार आसाराम यांच्या मनात डोकाऊ लागला.
सन १९६२ साली नगरच्या जिल्हा सैनिक बोर्डाने घेतलेल्या भरतीत आसाराम भरती झाले. घरातील मोठा भाऊ लष्करात भरती झाल्याने लहान भावंडे आनंदाने नाचू लागली. आई-वडिलांनाही आनंद झाला. भरती झाल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण बेळगाव या ठिकाणी झाले. ट्रेनिंग पूर्ण करून ते आपल्या गावी परतले. येताना त्यांनी आपल्या लहान भावंडांसाठी कपडे आणले, ते पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. कारण घरातील साºयांची जबाबदारी आता आसाराम यांच्यावर आली होती.
रजा संपल्यावर ते पुन्हा बेळगावला हजर झाले. तेथून त्यांना हैदराबाद येथे पोस्टिंग मिळाली. तेथे त्यांना काही वर्ष मायभूमीची सेवा करण्याची संधी मिळाली. दरम्यानच्या काळात त्यांचा विवाह पिंपळगाव लांडगा येथील मालतीबाई यांच्याशी झाला. हे गाव पारगावपासून हाकेच्या अंतरावर आहे. दोघांचा सुखी संसार सुरु झाला. घरातील सारी जबाबदारी ते पार पाडीत होते.
सन १९७१ साल उजाडले. ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या १३ दिवसांच्या कालावधीत चाललेल्या भारत-पाकिस्तानच्या युद्धात आपले हजारो जवान शहीद झाले होते. या युद्धाला पाकिस्तानी सैनिकांनी सुरुवात केली होती. भारताच्या ११ हवाई अड्ड्यांवर पाकिस्तानने हल्ला करून ते नष्ट केले. इतिहासात या युद्धाला लहान स्वरूपाचे महायुद्ध संबोधले गेले. पुढे यावर काही हिंदी चित्रपटही निघाले. त्यातील सर्वात लोकप्रिय असणारा ‘बॉर्डर’ हा सिनेमा खूप गाजला. यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी भारताच्या पूर्व व पश्चिम घाट या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी हल्ले चढवले. याच काळात आसाराम यांची बदली जम्मू काश्मीर येथे झाली. तेथून त्यांना भारताच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी बांगलादेश-भारताच्या सीमेवर पाठवण्यात आले. आसाराम निधड्या छातीने पाकिस्तानी सैनिकांचा मुकाबला करू लागले. हवाई हल्ल्यासह भारताच्या तोफखान्यावर दोन्ही बाजूंनी शत्रूचे हल्ले सुरु होते. ढाका भागात देशसेवा करत असताना आसाराम यांना शत्रूच्या दोन गोळ्या लागल्या. परंतु तरीही त्यांनी जागा सोडली नाही. ज्या शत्रूने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तो समोर दिसत होता. त्याला जीवंत सोडून आसाराम जीव सोडणार नव्हते. अंगातील सर्व बळ एकवटून त्यांनी शत्रूच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यातील एक गोळी थेट शत्रूच्या कपाळातून आरपार गेली. शत्रू जागेवरच गारद झाला. त्यानंतरच आसाराम यांनी आपला श्वास सोडला. त्यांचा देह भारतमातेच्या कुशीत अलगद विसावला गेला. सन १९७१ च्या युद्धात भारताची खूप मोठी हानी झाली. त्यात ७ मराठा लाईट इन्फट्रीमध्ये असणारे आसाराम यांच्यासह त्यांच्या युनिटमधील काही जवान शहीद झाले होते.
सत्तरी ओलांडलेल्या मालतीबाई एकट्याच
आसाराम यांच्या निधनाची तार ७ दिवसांनी त्यांच्या मूळ गावी पारगाव येथे आली. गावात एकच रडारड सुरु झाली. सर्वांनाच शोक अनावर होत होता. ग्रामस्थांनी सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले होते. लहान भावंडे एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. हजारो लोक जमा झाले. वीरपत्नी मालतीबाई यांना तर भानही राहिले नव्हते. ज्या साथीदारासोबत सात जन्म राहण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या, तो साथीदार अवघ्या वर्षभरात सोडून गेला होता. त्यामुळे त्यांना अपत्यही नव्हते. आता मालतीबार्इंनी सत्तरी ओलांडली आहे. आपल्या पुतण्याकडे त्या केडगावला राहतात.
- शब्दांकन : योगेश गुंड