शूरा आम्ही वंदिले! : संसार अवघा २८ दिवसांचा, रामचंद्र थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 04:02 PM2018-08-18T16:02:04+5:302018-08-18T16:04:54+5:30
लग्न म्हणजे आयुष्यातील केवढा अविस्मरणीय प्रसंग, मात्र त्याच्या स्मृती ताज्या असतानाच रामचंद्र थोरात यांना सैन्याच्या त्यांच्या तुकडीत हजर होण्याचा संदेश मिळाला.
लग्न म्हणजे आयुष्यातील केवढा अविस्मरणीय प्रसंग, मात्र त्याच्या स्मृती ताज्या असतानाच रामचंद्र थोरात यांना सैन्याच्या त्यांच्या तुकडीत हजर होण्याचा संदेश मिळाला. पत्नीला तसेच सोडून ते गेले व हजर झाले. सीमारेषेवर कुंपण घालण्याचे काम करत असतानाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यूने त्यांना गाठले. कुटुंबीय व नवपरिणीत पत्नीला शोकसागरात टाकून ते शहीद झाले.
पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी हे रामचंद्र थोरात यांचे गाव़ वडील भानुदास व आई सिंधुबाई यांचा मोठा मुलगा रामचंद्र व लहान बाळासाहेब अशी दोन मुले़ साधे असणारे हे कुटुंब शेतीवरच अवलंबून होते़ रामचंद्र यांचा जन्म ९ जानेवारी १९८२ मध्ये झाला़ पहिली ते चौथीपर्यंत गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण, नंतर रूईछत्रपती येथे माध्यमिक विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण झाले़ घरची परिस्थिती बेताचीच असल्याने रामचंद्र यांनी दहावीचे शिक्षण झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला नोकरी करून हातभार लागावा म्हणून १९९७ मध्ये आयटीआय मध्ये प्रवेश घेतला़ वर्षभराचे प्रशिक्षण पूर्र्ण झाल्यानंतर काही कामे करून ते घरी पैसे देऊ लागले.
सैन्यात जाण्यासाठी प्रयत्न
त्याचवेळी बरोबरचे काही मित्र सैन्यात भरती होत होते. त्यामुळे आपणही प्रयत्न करावा म्हणून रामचंद्र यांनी धावण्याचा व्यायाम सुरू केला. ठिकठिकाणी होणाऱ्या सैन्यभरतीची ते माहिती घेत. सैन्यात जायचेच या विचाराने ते झपाटून गेले. १४ एप्रिल १९९९ मध्ये त्यांची सैन्यात निवड झाली. पुण्यात प्रशिक्षण देण्यात आले. आयटीआय झाल्यामुळे त्यांची अभियांत्रिकी विभागात निवड झाली, खडकी येथे त्यांना पुन्हा वर्षभराचे त्यांच्या विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले.
विवाहानंतर लगेच तुकडीत हजर
अडीच वर्षे पुणे, आसाम येथे सेवा केल्यानंतर अहमदाबाद येथे नियुक्ती झाली. भाऊ बाळासाहेब यांनाही सैन्यात भरती व्हायचे होते, मात्र दोघेही नको, तू तिथेच राहून शेती कर असा सल्ला रामचंद्र यांनी बंधूंना दिला.अहमदाबाद येथे असतानाचसारोळा कासार येथील रोहिणी यांच्याशी त्यांचा विवाह १ मे २००४ ला झाला. सुटी काढून ते आले होते. विवाहाला काही दिवस झालेले असतानाच त्यांना हजर होण्याचा संदेश आला. अशा वेळी सैनिकांना तक्रार वगैरे करून चालत नाही. रामचंद्र यांचा तर तो स्वभावच नव्हता. त्यामुळेच लहानपणापासून कष्टाची कामे करताना त्यांनी कधीही त्याचा कंटाळा केला नाही. कुटुंबासाठीच सगळे काही करतो आहोत हे ते विसरले नाहीत. तसेच आता देशासाठी करतो आहोत, जावेच लागणार असे सांगून ते लगेच निघाले व हजरही झाले.
सीमारेषेवरच चकमक
भारत पाकिस्तानचे संबंध त्यावेळी ताणले होते. सीमारेषेवर तणाव निर्माण झाला होता. पाकिस्तानी सैन्याच्या पाठिंब्याने अतिरेकी सीमा ओलांडून भारतात प्रवेश करून कारवाया करत असत. हे आक्रमण थांबवण्यासाठी म्हणून सीमारेषेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला. रामचंद्र यांच्या तुकडीवर हे काम सोपवण्यात आले. पलीकडून शत्रू गोळीबार करत असताना हे काम करायचे होते. लपलेले अतिरेकी कधीही हल्ला करण्याची भीती होती. पण रामचंद्र व त्याचे सहकारी सैनिक असल्या भीतीला बळी पडणार नव्हते. त्यांनी कामाला सुरूवात केली. रोज काही अंतर ते कुंपण तयार करत व परत येत. २९ जून २००४ ला ते असेच काम करून परत येत असताना अतिरेक्यांनी त्यांना टिपले. त्यांच्याकडे पाठ असल्यामुळे प्रतिहल्ला करण्याची संधीही रामचंद्र यांना मिळाली नाही. अवघ्या २८ दिवसांचा संसार करून रामचंद्र पत्नी व कुटुंबाला शोकसागरात सोडून शहीद झाले.
कुटुंबाचा धाडसी निर्णय
रोहिणी यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर रामचंद्र यांच्या आईवडिलांनी एक धाडसी निर्णय घेतला. सुनेचे दु:ख त्यांना पहावत नव्हते. फक्त २८ दिवसांचा संसार करून ती पतीला पारखी झाली होती. दोन्ही कुटुंबांनी आपल्या दु:खाला आवर घातला. रोहिणी यांच्यासमोर रामचंद्र यांचे बंधू बाळासाहेब यांच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव दिला. बाळासाहेब व रोहिणी यांनीही होकार देत विवाह केला़ आज रोहिणी व बाळासाहेब यांचे कुटुंब चांगले आहे. मोठी मुलगी ऋतुजा पाचवीला तर मुलगा यश चौथीला आहे़ रामचंद्र यांचे स्मरण करत ते जीवन व्यतित करतात.
लोकवर्गणीतून स्मारक
थोरात कुटुंबीयांनी आपल्या वस्तीवरच रामचंद्र थोरात यांचे स्मारक उभारले आहे़ रामचंद्र शहीद झाल्यानंतर राज्य सरकारने पाच लाख रूपयांची मदत केली व सैन्यातील काही पैसे मिळाले़ पेट्रोल पंप किंवा अन्य कोणत्याही मदतीसाठी त्यांनी ना कधी अर्ज केला ना कोणाचे उंबरठे झिजवले. मुलगा देशासाठी शहीद झाला याचा त्यांना अभिमान आहे.
कुटुंबाचा धाडसी निर्णय
रोहिणी यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर रामचंद्र यांच्या आईवडिलांनी एक धाडसी निर्णय घेतला. सुनेचे दु:ख त्यांना पहावत नव्हते. फक्त २८ दिवसांचा संसार करून ती पतीला पारखी झाली होती. दोन्ही कुटुंबांनी आपल्या दु:खाला आवर घातला. रोहिणी यांच्यासमोर रामचंद्र यांचे बंधू बाळासाहेब यांच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव दिला. बाळासाहेब व रोहिणी यांनीही होकार देत विवाह केला़ आज रोहिणी व बाळासाहेब यांचे कुटुंब चांगले आहे. मोठी मुलगी ऋतुजा पाचवीला तर मुलगा यश चौथीला आहे़ रामचंद्र यांचे स्मरण करत ते जीवन व्यतित करतात.
- शब्दांकन : विनोद गोळे