संपदा, यूएनडीपीचे काम सरपंचांनी बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 02:22 PM2019-09-14T14:22:42+5:302019-09-14T14:23:28+5:30
महिला सक्षमीकरणासाठी एकात्मिक उपजिविका प्रकल्पावर दहा गावात काम करणा-या संपदा ट्रस्ट व यूएनडीपी या संस्थेने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती मिळेपर्यंत या गावातील या संस्थांनी काम बंद ठेवावे, अशी मागणी १० गावातील सरपंचांनी प्रकल्प अधिका-यांकडे केली. ही कामे शुक्रवारपासून सरपंचांनी बंद पाडली आहेत.
करंजी : महिला सक्षमीकरणासाठी एकात्मिक उपजिविका प्रकल्पावर दहा गावात काम करणा-या संपदा ट्रस्ट व यूएनडीपी या संस्थेने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती मिळेपर्यंत या गावातील या संस्थांनी काम बंद ठेवावे, अशी मागणी १० गावातील सरपंचांनी प्रकल्प अधिका-यांकडे केली. ही कामे शुक्रवारपासून सरपंचांनी बंद पाडली आहेत.
सीएसआरडी फंड खर्च करण्यासाठी एल अॅण्ड टी कंपनीने डोंगराळ भागातील दगडवाडी, भोसे, वैजूबाभूळगाव, खांडगाव, जोहारवाडी, लोहसर, डोंगरवाडी, गितेवाडी, डमाळवाडी आदी १० गावांची निवड केली. येथे साडेतेरा कोटी रुपयांचा निधी म्हणजे एका गावास १ कोटी ३५ लाखांचा निधी खर्च करण्यासाठी संपदा ट्रस्ट व यूएनडीपी या संस्थांची नेमणूक केली होती. मात्र दोन वर्षात या संस्थांनी गावच्या सरपंचांना कामाचे स्वरूप व माहिती कधीही दिली नाही. या संस्थांनी गेल्या दोन वर्षात या गावात महिला सक्षमीकरणासाठी केलेली कामे व त्याचा खर्च यांचा कुठेही ताळमेळ बसत नसल्याने या संस्थांनी केलेली कामे संशयास्पद असल्याचा सरपंचांचा आरोप आहे.
या कामांची सर्व माहिती आम्हाला आठ दिवसात मिळाली पाहिजे, तोपर्यंत या दहा गावातील या प्रकल्पाचे काम थांबविण्याची मागणी अनिल गिते यांच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे या गावातील सरपंचांनी करून करंजी येथील कार्यालयात प्रकल्प अधिकाºयांना निवेदन दिले.
यावेळी सरपंच अनिल गिते, रावसाहेब गुंजाळ, प्रदीप टेमकर, अंबादास डमाळे, बापूसाहेब गोरे, जनार्दन गिते, वैभव गिते, उद्धव गिते, भाऊसाहेब पोटे, रावसाहेब वाढेकर, डॉ. गिते, राजेंद्र दगडखैर, संपदा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक अनिरूद्ध मिरीकर, यूएनएनडीपीचे प्रकल्प अधिकारी शरद पंत यांच्यासह सर्व सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंचांना माहिती देऊ..
या भागातील १० गावात संपदा ट्रस्टमार्फत काम चालू आहे. या गावात केलेल्या कामांची माहिती येत्या आठ दिवसात आपण या सर्व गावच्या सरपंचांना देवू, असे संपदा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक अनिरुद्ध मिरीकर, यूएनडीपीचे प्रकल्प अधिकारी शरद पंत यांनी सांगितले.