हवामान खाते भरकटले
By Admin | Published: June 27, 2016 12:55 AM2016-06-27T00:55:27+5:302016-06-27T01:01:25+5:30
अहमदनगर : बदलत्या हवामानाचा वेध घेण्यात प्रशासकीय यंत्रणाही अपयशी ठरली असून, हवामान खात्याचे अंदाज चुकत चालले आहेत
अहमदनगर : बदलत्या हवामानाचा वेध घेण्यात प्रशासकीय यंत्रणाही अपयशी ठरली असून, हवामान खात्याचे अंदाज चुकत चालले आहेत, असे सांगून राज्याचे हवामान खाते भरकटले आहे, अशी स्पष्टोक्ती देत दुरुस्तीच्या दिशेने सरकार पावले उचलत आहे, अशी सारवासारव पालकमंत्री तथा राज्याचे कृषी व पर्यटन मंत्री राम शिंदे यांनी रविवारी येथे केली़
जिल्हा कृषी विभाग कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने माउली संकुल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़ कृषी विभागाचे विभागीय संचालक विजयकुमार इंगळे, पतसंस्थेचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर, उपाध्यक्ष सुभाष खेमनार, कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे आदी यावेळी उपस्थित होते़ राज्यातील हवामान खात्याने वेळोवेळी जाहीर केलेले अंदाज आणि प्रत्यक्ष पडणाऱ्या पावसावर शिंदे यांनी प्रकाश टाकला़ ते म्हणाले, राज्यात तीव्र दुष्काळानंतर पावसाला सुरुवात झाली़ हवामान खात्याने गेल्या एप्रिल महिन्यांत यंदा २५ ते ३१ टक्के जास्त पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता़ आता हेच हवामान खाते १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करत आहे, म्हणजे ६ टक्के इतकाच जास्त पाऊस पडेल, असा त्यांचा अंदाज आहे, असे सांगून एकाच मालकाच्या दोन वाटण्यांचे उदाहरण शिंदे यांनी दिले़ एका वाटणीत जर पाऊस पडला तर दुसऱ्या वाटणीत पडेलच, असे नाही, असेही ते म्हणाले़
इतर देशांच्या तुलनेत हवामानाचा वेध घेण्यात आपण कमी पडत आहोत़ त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे़ त्यामुळे हवामान खात्यात मोठे बदल भविष्यात करण्यात येणार आहे़ अत्याधुनिक हवामान केंद्र उभारण्याच्या दिशेने सरकार पावले उचलत आहे़ त्यासाठी कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे़ त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला जाणार असून, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर कृषीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ बाचकर यांनी तर आभार रुपाली काळे यांनी मानले़ जिल्ह्यातील कृषी विभागातून सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़
(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि प्रवेश प्रक्रिया यावर भाष्य करत नीटच्या निर्णयामुळे बरेच ‘नीट’ झाले आहेत, असे सांगून शिंदे यांनी राज्यातील शिक्षणसम्राटांवरही निशाणा साधला़